व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अध्याय आठ

निराशाजनक परिस्थितींतही तो टिकून राहिला

निराशाजनक परिस्थितींतही तो टिकून राहिला

१. सबंध शिलो दुःखसागरात का बुडालं आहे?

शमुवेलाचं मन त्याच्या लोकांसाठी हळहळत आहे. खरंतर, सबंध शिलो नगर दुःखसागरात बुडालं आहे. घराघरांत स्त्रिया व मुलं आक्रोश करत आहेत. कुणी आपल्या वडिलांसाठी, कुणी पतीसाठी, कुणी तरुण मुलांसाठी, तर कुणी भावांसाठी रडत आहे. आता ते कधीच घरी परत येणार नाहीत, हे त्यांना माहीत आहे. कारण, पलिष्ट्यांसोबत झालेल्या एका लढाईत इस्राएली लोकांचा जबरदस्त पराभव होऊन, जवळजवळ ३०,००० सैनिकांना आपला प्राण गमवावा लागला. याच्या काही काळाआधीच आणखी एका युद्धात इस्राएलचे ४,००० सैनिक मारले गेले होते.—१ शमु. ४:१, २, १०.

२, ३. एकापाठोपाठ एक आलेल्या कोणत्या संकटांमुळं शिलोची प्रतिष्ठा नाहीशी झाली?

हे तर फक्त एकच संकट होतं. शिलोवर एकापाठोपाठ एक अशी अनेक संकटं आली होती. काही काळाआधी एलीची दुष्ट मुलं, हफनी व फिनहास हे पवित्र कराराचा कोश शिलोतून घेऊन गेले होते. यहोवा त्याच्या लोकांमध्ये आहे, असं सूचित करणारा हा पवित्र कोश सहसा निवासमंडपाच्या परमपवित्र स्थानात ठेवला जायचा. हा कोश चमत्कारिक रीत्या आपल्याला लढाईत विजय मिळवून देईल, असं समजून लोकांनी तो लढाईच्या मैदानात नेला. पण, असा विचार करणं मूर्खपणाचं होतं. त्यांना विजय तर मिळालाच नाही; उलट, पलिष्ट्यांनी तो कोश ताब्यात घेऊन हफनी व फिनहास यांना ठार मारलं.—१ शमु. ४:३-११.

निवासमंडपात ठेवण्यात आलेला तो पवित्र कराराचा कोश, खरंतर शतकानुशतके शिलोची शान होता! पण, आता तो कोश शिलोमध्ये राहिला नव्हता. ही बातमी ऐकताच, ९८ वर्षांचा एली आपल्या आसनावरून मागे पडून मरण पावला. त्याच दिवशी विधवा झालेली एलीची सूनही, मुलाला जन्म देताना मरण पावली. मरण्यापूर्वी ती म्हणाली: “इस्राएलाचे वैभव गेले आहे, कारण देवाचा कोश नेला आहे.” खरोखर, शिलोची प्रतिष्ठा कायमची नाहीशी झाली होती.—१ शमु. ४:१२-२२.

४. या अध्यायात आपण काय पाहणार आहोत?

या अत्यंत निराशाजनक घटनांना शमुवेलानं कसं तोंड दिलं? इस्राएली लोक यहोवाचं संरक्षण आणि कृपादृष्टी गमावून बसले होते. मग अशा परिस्थितीतही, शमुवेल आपला विश्वास मजबूत ठेवून त्या लोकांना मदत करू शकला का? आज आपल्या सर्वांच्या जीवनातही अनेकदा कठीण व निराशाजनक प्रसंग येतात; या घटनांमुळं आपल्या विश्वासाची परीक्षा होते. त्यामुळं, शमुवेलाकडून आपल्याला आणखी काय शिकता येईल, हे आता आपण पाहू.

त्याने “नीतिमत्त्व आचरले”

५, ६. मधल्या वीस वर्षांच्या काळातही शमुवेल देवाच्या लोकांसाठी कार्य करत होता, हे आपण कशावरून म्हणू शकतो?

इथपासून पुढं बायबलचा अहवाल आपल्याला शमुवेलाबद्दल फारसं काही सांगत नाही. त्याऐवजी, तो आपलं लक्ष पवित्र कोशाकडे वेधतो. पलिष्ट्यांनी कोश ताब्यात घेतल्यामुळं त्यांना कोणकोणत्या संकटांना तोंड द्यावं लागलं, आणि कशा प्रकारे त्यांना तो नाइलाजानं इस्राएली लोकांना परत करावा लागला, याविषयी अहवाल आपल्याला सांगतो. मग, पुन्हा एकदा शमुवेलाचा उल्लेख येतो, तो सुमारे २० वर्षांनंतर. (१ शमु. ७:२) या मधल्या काळात शमुवेल काय करत होता? याबाबत, आपल्याला अंदाज बांधायची गरज नाही.

भयंकर दुःखाला व निराशेला तोंड द्यायला शमुवेल आपल्या लोकांना कशी मदत करू शकला?

बायबलमध्ये सांगितलं आहे, की “शमुवेलाने आपल्या आयुष्यभर इस्राएलाचा न्याय इन्साफ केला.” (१ शमु. ७:१५-१७) तो दरवर्षी इस्राएलातील तीन शहरांना भेट देत असे. त्या शहरांत जाऊन तो लोकांचे प्रश्न व वाद सोडवायचा. मग तो आपल्या गावी म्हणजेच रामाला परतत असे. यावरून दिसून येतं, की शमुवेल सतत देवाच्या लोकांसाठी कार्य करत राहिला. नक्कीच, त्या वीस वर्षांच्या काळातही तो स्वस्थ बसला नसेल.

बायबलच्या अहवालात वीस वर्षांपर्यंत शमुवेलाचा उल्लेख नसला, तरी तो यहोवाची सेवा करत राहिला असेल अशी खात्री आपण बाळगू शकतो

७, ८. (क) शमुवेलानं लोकांना काय सांगितलं? (ख) शमुवेलानं दिलेल्या आश्वासनाला लोकांनी कसा प्रतिसाद दिला?

एलीच्या मुलांच्या दुष्ट, अनैतिक वागणुकीमुळे लोकांचा विश्वास कमकुवत झाला होता. बरेच लोक तर मूर्तिपूजेकडेही वळले होते. या लोकांना आध्यात्मिक रीत्या साहाय्य करण्यासाठी शमुवेलानं वीस वर्षं अथक प्रयत्न केले. शेवटी, तो त्यांना म्हणाला: “देवाकडे पुन्हा वळण्याची तुमची खरोखरीची इच्छा असेल, तर तुम्ही अन्य देव व अष्टारोथ मूर्तींचा त्याग करा; आणि केवळ देवाच्याच आज्ञा पाळण्याचा दृढ निश्चय करा; म्हणजे मग पलिष्ट्यांच्या हातातून तो तुम्हाला सोडवेल.”—१ शमु. ७:३, सुबोधभाषांतर.

पलिष्ट्यांनी इस्राएली लोकांना सळो की पळो करून सोडलं होतं. त्यांच्या सैन्याला पराभूत केल्यानंतर, त्यांच्यावर अत्याचार करण्यासाठी पलिष्ट्यांना जणू मोकळं रान मिळालं होतं. पण शमुवेलानं लोकांना आश्वासन दिलं, की ते यहोवाकडे वळल्यास त्यांची पलिष्ट्यांच्या हातातून सुटका होईल. मग, लोकांनी शमुवेलाचं ऐकलं का? हो, त्यांनी आपल्या सर्व मूर्ती नष्ट केल्या आणि ते फक्त यहोवाची “उपासना करू लागले.” हे पाहून शमुवेलाला किती आनंद झाला असेल! त्यानं जेरूसलेमच्या उत्तरेकडील डोंगराळ प्रदेशात मिस्पा नावाच्या एका नगरात, सर्व इस्राएली लोकांना बोलावलं. तिथं जाऊन लोकांनी उपवास केला आणि आपण केलेल्या मूर्तिपूजेबद्दल पश्‍चात्ताप केला.—१ शमुवेल ७:४-६ वाचा.

यहोवाचे लोक पश्‍चात्ताप करून उपासनेसाठी मिस्पा इथं जमले, त्या वेळी त्यांचा संहार करण्याची ही चांगली संधी आहे असं पलिष्ट्यांना वाटलं

९. पलिष्ट्यांनी कोणत्या संधीचा फायदा घेतला, आणि तेव्हा देवाच्या लोकांनी काय केलं?

पण, सर्व इस्राएली लोक एकत्र येणार हे ऐकल्यावर, त्यांचा नाश करण्याची ही चांगली संधी आहे असं पलिष्ट्यांना वाटलं. म्हणून, त्यांनी मिस्पाला आपलं सैन्य पाठवलं. पलिष्टी लोक आपल्यावर हल्ला करणार आहेत हे समजल्यावर इस्राएली लोकांचा थरकाप उडाला. त्यांनी शमुवेलाला आपल्यासाठी प्रार्थना करण्याची विनंती केली. शमुवेलानं त्यांच्या विनंतीनुसार प्रार्थना केली आणि यज्ञसुद्धा अर्पण केला. तो पवित्र विधी सुरू असताना, पलिष्टी सैन्यानं मिस्पावर आक्रमण केलं. तेव्हा यहोवानं शमुवेलाच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं. “त्या दिवशी परमेश्वराने प्रचंड गर्जना करून पलिष्ट्यांस घाबरे केले.” (१ शमु. ७:७-१०) त्या गर्जनेतून जणू यहोवा आपला क्रोध व्यक्त करत होता.

१०, ११. (क) पलिष्ट्यांविरुद्ध यहोवानं केलेली गर्जना सर्वसाधारण नव्हती, असं का म्हणता येईल? (ख) मिस्पा इथं झालेल्या लढाईचा परिणाम काय झाला?

१० अर्थात, पलिष्टी सैनिक वीज कडाडल्यावर भीतीनं आईच्या पदरात तोंड लपवणारी लहान मुलं नव्हती. तर, ते युद्धात कसलेले दांडगे सैनिक होते. पण, गर्जना ऐकून पलिष्टी घाबरले असं अहवालात म्हटलं आहे. त्याअर्थी, नक्कीच ती सर्वसाधारण गर्जना नसावी. पण, नेमकं कशामुळं पलिष्टी इतके घाबरले होते? गर्जनेच्या “प्रचंड” मोठ्या आवाजामुळं? निरभ्र आकाशातून अचानक ती गर्जना झाल्यामुळं? की, डोंगरांतून तो आवाज घुमू लागल्यामुळं? आपल्याला माहीत नाही. पण, त्यांच्या काळजाचा थरकाप उडाला एवढं मात्र खरं. त्यांनी त्या प्रकारची गर्जना कधीच ऐकली नव्हती. ते पूर्णपणे गोंधळून गेले. मग, इस्राएली लोकांनी मिस्पातून बाहेर पडून पलिष्टी सैन्याचा धुव्वा उडवला. त्यांनी जेरूसलेमच्या दक्षिण-पश्‍चिम दिशेला असलेल्या एका ठिकाणापर्यंत, अनेक मैल त्यांचा पाठलाग केला. अशा रीतीनं, शिकार करायला निघालेले पलिष्टी स्वतःच शिकार बनले.—१ शमु. ७:११.

११ ती लढाई इस्राएलच्या इतिहासाला कलाटणी देणारी ठरली. यानंतर शमुवेलानं इस्राएलवर न्यायाधीश म्हणून कार्य केलं, त्या संपूर्ण काळात पलिष्ट्यांनी पुन्हा कधीच इस्राएली लोकांवर हल्ला केला नाही. देवाच्या लोकांनी एकापाठोपाठ एक शहर पलिष्ट्यांकडून पुन्हा ताब्यात घेतलं.—१ शमु. ७:१३, १४.

१२. शमुवेलाने “नीतिमत्त्व आचरले” ते कोणत्या अर्थाने, आणि कोणत्या गुणांमुळं त्याला असं करणं शक्य झालं?

१२ कित्येक शतकानंतर, पौलाने शमुवेलाचा उल्लेख अशा इतर विश्वासू न्यायाधीश व संदेष्ट्यांसोबत केला, ज्यांनी “नीतिमत्त्व आचरले.” (इब्री ११:३२, ३३) खरोखर, शमुवेलानं नेहमी देवाच्या नजरेत जे योग्य तेच केलं आणि इतरांनाही असं करण्याचं त्यानं प्रोत्साहन दिलं. त्याला हे कशामुळं शक्य झालं? कारण तो नेहमी धीरानं यहोवावर विसंबून राहिला. म्हणजेच, निराशाजनक परिस्थितींतही तो आपलं काम विश्वासूपणे करत राहिला. तसंच, त्यानं उपकारांची जाणीव ठेवली. मिस्पा इथं विजय मिळाल्यानंतर, यहोवानं आपल्या लोकांना कशा प्रकारे साहाय्य केलं, याची सर्वांना आठवण राहावी म्हणून शमुवेलानं एक स्मारक उभारलं.—१ शमु. ७:१२.

१३. (क) शमुवेलाचं अनुकरण करायचं असल्यास आपण कोणते गुण विकसित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे? (ख) हे गुण केव्हा विकसित करणं योग्य ठरेल असं तुम्हाला वाटतं?

१३ तुम्हालाही शमुवेलाप्रमाणे ‘नीतिमत्त्व आचरण्याची’ इच्छा आहे का? असल्यास, शमुवेलाच्या धीराचं, तसंच विनम्र आणि उपकारांची जाणीव ठेवण्याच्या त्याच्या मनोवृत्तीचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करा. (१ पेत्र ५:६, वाचा.) आणि आपल्यापैकी असं कोण आहे ज्याला या चांगल्या गुणांची गरज नाही? शमुवेलानं अगदी लहानपणीच हे सर्व गुण विकसित केल्यामुळं त्याला अनेक आशीर्वाद मिळाले. आणि पुढील जीवनातही अत्यंत निराशाजनक परिस्थितींना तोंड द्यायला त्याला यामुळं मदत मिळाली.

“तुमच्या मार्गाने तुमचे पुत्र चालत नाहीत”

१४, १५. (क) “वृद्ध” झाल्यानंतर शमुवेलाला कोणत्या घोर निराशेला तोंड द्यावं लागलं? (ख) एलीप्रमाणे पित्याची जबाबदारी पार पाडण्यात शमुवेल अपयशी ठरला का? स्पष्ट करा.

१४ यानंतर जेव्हा आपण अहवालात शमुवेलाबद्दल वाचतो, तेव्हा तो “वृद्ध” झाला होता. त्याला एव्हाना प्रौढ झालेली दोन मुलंसुद्धा होती. योएल आणि अबीया. शमुवेलाची ही मुलं त्याला न्यायनिवाडा करण्याच्या कामात साहाय्य करायची आणि शमुवेलानं त्यांच्यावर बऱ्याच जबाबदाऱ्यादेखील सोपवल्या होत्या. पण, दुःखाची गोष्ट म्हणजे त्यांच्या बाबतीत शमुवेलाचा अपेक्षाभंग झाला. शमुवेल स्वतः प्रामाणिक आणि सात्त्विक वृत्तीचा असला, तरीसुद्धा त्याची मुलं मात्र तशी नव्हती. आपला स्वार्थ साधण्यासाठी ते चुकीचा न्याय करायचे आणि लोकांकडून लाच घ्यायचे.—१ शमु. ८:१-३.

१५ एके दिवशी, इस्राएलमधील वडीलधारी माणसं शमुवेलाजवळ त्याच्या मुलांविषयी तक्रार करण्यासाठी आली. ते शमुवेलाला म्हणाले, “तुमच्या मार्गाने तुमचे पुत्र चालत नाहीत.” (१ शमु. ८:४, ५) आपली मुलं काय करत आहेत याची शमुवेलाला आधीच कल्पना असावी का? अहवालात हे सांगितलेलं नाही. पण एलीप्रमाणे, पित्याची जबाबदारी पार पाडण्यात शमुवेल अपयशी ठरला, असं म्हणता येणार नाही. कारण, आपल्या दुष्ट मुलांना ताडन न केल्याबद्दल आणि देवापेक्षा त्यांचा अधिक आदर केल्याबद्दल, यहोवानं एलीला दोषी ठरवलं होतं आणि त्याला शिक्षादेखील दिली होती. (१ शमु. २:२७-२९) पण, शमुवेलाला मात्र यहोवानं कधीही असा दोष लावला नाही.

शमुवेलाच्या दोन मुलांनी त्याची घोर निराशा केली तेव्हा त्यानं त्या परिस्थितीला कसं तोंड दिलं?

१६. (क) बंडखोर मुलांच्या आईवडिलांना कोणत्या भावनांना तोंड द्यावं लागतं? (ख) शमुवेलाच्या उदाहरणातून आईवडिलांना कशा प्रकारे सांत्वन व मदत मिळू शकते?

१६ आपल्या मुलांच्या दुष्ट आणि अन्यायी वागणुकीबद्दल समजल्यावर शमुवेलाला किती दुःख झालं असेल, किती लाजिरवाणं वाटलं असेल आणि तो किती चिंतित व निराश झाला असेल, याची आपण कल्पना करू शकतो. अहवालात जरी याबद्दल स्पष्टपणे सांगितलेलं नसलं, तरी आजच्या काळातले आईवडील त्याच्या भावना चांगल्या प्रकारे समजू शकतात. या शेवटल्या काळात, आईवडिलांच्या अधिकाराविरुद्ध बंड करण्याची प्रवृत्ती सर्वत्र दिसून येते. (२ तीमथ्य ३:१-५ वाचा.) जे आईवडील अशा प्रकारच्या निराशेला व दुःखाला आज तोंड देत आहेत, त्यांना शमुवेलाच्या उदाहरणातून बरंच मार्गदर्शन आणि सांत्वनसुद्धा मिळेल. आपल्या मुलांच्या वाईट वागणुकीमुळं शमुवेलानं कधीही योग्य आणि सात्त्विक मार्गानं चालण्याचं सोडलं नाही. आईवडिलांनी हे नेहमी आठवणीत ठेवलं पाहिजे, की मुलांना मार्गदर्शन करून आणि त्यांना वळण लावण्याचा प्रयत्न करूनही त्यांच्या मनाचं परिवर्तन झालं नाही, तरीसुद्धा आपल्या स्वतःच्या उदाहरणातून ते त्यांना बरंच काही शिकवू शकतात. शिवाय, शमुवेलाप्रमाणे हे आईवडील सात्त्विक मार्गावर टिकून राहिल्यास त्यांच्या स्वर्गीय पित्याला, यहोवाला त्यांच्याविषयी नक्कीच अभिमान वाटेल.

“आम्हावर एक राजा नेमा”

१७. इस्राएलच्या वडीलधाऱ्यांनी शमुवेलाकडे कोणती मागणी केली, आणि शमुवेलाला याविषयी कसं वाटलं?

१७ आपल्या लोभी व स्वार्थी वागणुकीचे किती गंभीर परिणाम होतील, याची कदाचित शमुवेलाच्या मुलांना कल्पनाही नसावी. कारण, इस्राएलच्या वडीलधाऱ्यांनी शमुवेलाकडे जाऊन म्हटलं: “आता इतर सर्व राष्ट्रांप्रमाणे आमचा न्यायइन्साफ करावयास आम्हावर एक राजा नेमा.” लोकांनी अशी मागणी केली तेव्हा ते आपला धिक्कार करत आहेत, असं शमुवेलाला वाटलं असावं का? कारण शेवटी, त्यानं कित्येक दशकांपासून यहोवाच्या वतीनं या लोकांचा न्यायनिवाडा केला होता. पण, आता आपला न्यायाधीश म्हणून त्यांना शमुवेलासारखा केवळ एक संदेष्टा नको होता; तर, आजूबाजूच्या सर्व राष्ट्रांप्रमाणेच त्यांनाही एक राजा हवा होता! मग, त्यांची ही मागणी ऐकून शमुवेलाला कसं वाटलं? अहवालात सांगितलं आहे, की “हे शमुवेलला ठीक वाटले नाही.”—१ शमु. ८:५, ६, ईझी-टू-रीड व्हर्शन.

१८. यहोवानं शमुवेलाला कशा प्रकारे सांत्वन दिलं, आणि इस्राएली लोक किती गंभीर चूक करत होते हे त्यानं कसं स्पष्ट केलं?

१८ शमुवेलानं ही गोष्ट प्रार्थनेत यहोवापुढं मांडली, तेव्हा यहोवानं काय म्हटलं याकडे लक्ष द्या: “लोक जे तुला सांगत आहेत ते सगळे ऐक; कारण त्यात ते तुझा धिक्कार करत नाहीत, तर मी त्यांचा राजा नसावे म्हणून ते माझाच धिक्कार करत आहेत.” यहोवाचे हे शब्द ऐकून शमुवेलाला सांत्वन तर मिळालं, पण, या शब्दांवरून हेही दिसून आलं की ते लोक सर्वसमर्थ देवाचा घोर अपमान करत होते. यहोवा देवाला नाकारून एका मानवी राजाची मागणी केल्यामुळं इस्राएली लोकांना मोठी किंमत मोजावी लागेल, अशी ताकीद त्यांना देण्यास यहोवानं शमुवेलाला सांगितलं. शमुवेलानं यहोवाच्या सांगण्यानुसार लोकांना ही ताकीद दिली, तरीसुद्धा त्यांनी त्याचं काहीही ऐकलं नाही. ते म्हणाले: “नाही, नाही, आमच्यावर राजा पाहिजेच.” आजपर्यंत नेहमीच यहोवा देवाच्या आज्ञांचं पालन करत आलेल्या शमुवेलानं, यावेळीही त्याच्या आज्ञेनुसार केलं आणि यहोवानं निवडलेल्या राजाचा अभिषेक केला.—१ शमु. ८:७-१९.

१९, २०. (क) शौलाला इस्राएलचा राजा म्हणून अभिषिक्त करण्यास यहोवानं सांगितलं, तेव्हा शमुवेलानं या आज्ञेचं कशा प्रकारे पालन केलं? (ख) शमुवेल कशा प्रकारे पुढंही यहोवाच्या लोकांना मदत करत राहिला?

१९ शमुवेलानं कोणत्या मनोवृत्तीनं देवाच्या आज्ञांचं पालन केलं? मनात राग बाळगून, किंवा फक्त कर्तव्य म्हणून त्यानं असं केलं का? निराशा किंवा नाराजी यांसारख्या नकारात्मक भावनांना त्यानं आपल्या मनात घर करू दिलं का? शमुवेलाच्या ठिकाणी दुसरा कोणता मनुष्य असता, तर कदाचित त्यानं तसं केलं असतं. पण शमुवेलानं मात्र शौलाचा अभिषेक केला, आणि तो यहोवानं निवडलेला आहे हे त्यानं मान्य केलं. त्यानं शौलाचं चुंबन घेतलं आणि याद्वारे आपण नव्या राजाचं स्वागत करत आहोत आणि त्याच्या अधीन आहोत हे दाखवलं. तसंच, तो लोकांना म्हणाला: “परमेश्वराने ज्यास निवडले त्यास तुम्ही पाहत आहा ना? सर्व लोकांमध्ये त्याच्या बरोबरीचा कोणी नाही.”—१ शमु. १०:१, २४.

२० यहोवानं निवडलेल्या मनुष्याच्या कमतरतांवर नाही, तर त्याच्या चांगल्या गुणांवर शमुवेलानं लक्ष केंद्रित केलं. तसंच स्वतःच्या बाबतीत, त्यानं चंचल मनाच्या लोकांचं आपल्याविषयी काय मत आहे याकडे लक्ष दिलं नाही. उलट, देव आपल्या आजवरच्या विश्वासू सेवेबद्दल संतुष्ट आहे, यावर त्यानं लक्ष केंद्रित केलं. (१ शमु. १२:१-४) यासोबतच, शमुवेल आपलं काम विश्वासूपणे करत राहिला. देवाच्या लोकांना त्यांच्यापुढे असलेल्या आध्यात्मिक धोक्यांविषयी मार्गदर्शन करण्याचं आणि यहोवाला विश्वासू राहण्यास त्यांना प्रोत्साहन देण्याचं त्यानं सोडलं नाही. त्यानं दिलेल्या मार्गदर्शनामुळं लोकांच्या मनाचं परिवर्तन घडून आलं आणि त्यांनी शमुवेलाला आपल्या वतीनं प्रार्थना करण्याची विनंती केली. तेव्हा शमुवेलानं या हृदयस्पर्शी शब्दांत त्यांना उत्तर दिलं: “तुम्हासाठी प्रार्थना करावयाची सोडून देणे हा परमेश्वराचा अपराध माझ्या हातून न घडो; मी तुम्हास चांगला व सरळ मार्ग दाखवितो.”—१ शमु. १२:२१-२४.

शमुवेलाचं उदाहरण याची आठवण करून देतं, की आपण कधीही मनात हेवा किंवा नाराजी बाळगू नये

२१. एखादा विशेषाधिकार तुमच्याऐवजी दुसऱ्या कोणाला मिळाल्यामुळं निराश वाटल्यास, शमुवेलाच्या उदाहरणातून तुम्हाला कशा प्रकारे मदत मिळू शकते?

२१ एखादी जबाबदारी किंवा विशेषाधिकार तुमच्याऐवजी दुसऱ्या कोणाला देण्यात आल्यामुळं, तुम्ही कधी निराश झाला आहात का? शमुवेलाचं उदाहरण आपल्याला अतिशय प्रभावीपणे याची आठवण करून देतं, की आपण कधीही मनात हेवा किंवा नाराजी बाळगू नये. (नीतिसूत्रे १४:३० वाचा.) यहोवाच्या सेवेत त्याच्या प्रत्येक विश्वासू सेवकाला करण्यासारखं भरपूर, आनंददायक काम आहे.

“तू त्याच्यासाठी कोठवर शोक करत राहणार?”

२२. शमुवेलानं सुरुवातीला शौलाच्या चांगल्या गुणांकडे लक्ष देण्याचं ठरवलं हे योग्य का होतं?

२२ शमुवेलानं शौलाच्या चांगल्या गुणांकडे लक्ष देण्याचं ठरवलं हे योग्यच होतं, कारण शौल खरोखरच एक उल्लेखनीय मनुष्य होता. तो उंचापुरा आणि देखणा तर होताच, पण धैर्यवान व हुशार, आणि सुरुवातीला नम्र आणि विनयशीलसुद्धा होता. (१ शमु. १०:२२, २३, २७) अशा चांगल्या गुणांसोबत शौलाजवळ असलेली आणखी एक मौल्यवान देणगी म्हणजे इच्छास्वातंत्र्य, अर्थात जीवनात हवा तो मार्ग निवडण्याचं आणि स्वतःचे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य. (अनु. ३०:१९) या देणगीचा शौलानं योग्य वापर केला का?

२३. शौलाच्या व्यक्तिमत्त्वातून सर्वात आधी कोणता चांगला गुण नाहीसा झाला, आणि तो दिवसेंदिवस कशा प्रकारे गर्विष्ठपणे वागू लागला?

२३ सत्ता आली की सत्त्व जातं, असं म्हणतात. आणि सहसा जो सद्गुण सर्वात आधी नाहीसा होतो तो म्हणजे नम्रता. दुःखाची गोष्ट म्हणजे, शौलाच्या बाबतीतही असंच घडलं. राजा बनल्यावर लवकरच तो गर्विष्ठपणे वागू लागला. शमुवेलानं कळवलेल्या यहोवाच्या आदेशांचं तो उल्लंघन करू लागला. एकदा तर, जो यज्ञबली शमुवेलानं द्यायचा होता, तो उतावळेपणानं शौलानं स्वतःच अर्पण केला. यासाठी शमुवेलानं शौलाला ताडन केलं आणि त्याच्या घराण्याकडून राजपद काढून घेतलं जाईल, असं भाकीत केलं. पण, हे ताडन स्वीकारण्याऐवजी, शौलानं पुढं आणखी मोठ्या प्रमाणात यहोवाच्या आज्ञांचं उल्लंघन केलं.—१ शमु. १३:८, ९, १३, १४.

२४. (क) अमालेक्यांशी झालेल्या युद्धाच्या वेळी शौलानं कशा प्रकारे यहोवाच्या आज्ञांचं उल्लंघन केलं? (ख) शौलाला ताडन करण्यात आलं, तेव्हा त्यानं काय केलं आणि यहोवाचा निर्णय काय होता?

२४ शमुवेलाद्वारे यहोवानं शौलाला अमालेकी लोकांविरुद्ध युद्ध करण्यास सांगितलं. तसंच, अमालेक्यांचा दुष्ट राजा अगाग याला जिवे मारावं, असंही त्यानं सांगितलं. पण, शौलानं अगागाला जिवंत ठेवलं. तसंच, अमालेक्यांच्या सर्व संपत्तीचा नाश करण्याऐवजी, त्यातील चांगल्या वस्तू त्यानं राखून ठेवल्या. शमुवेलानं जेव्हा शौलाची चूक त्याच्या लक्षात आणून दिली, तेव्हा त्याच्या प्रतिक्रियेवरून तो आता किती बदलला होता, हे स्पष्ट दिसून आलं. मिळालेलं ताडन नम्रपणे स्वीकारण्याऐवजी तो निमित्तं सांगून आपल्या वागणुकीबद्दल सफाई देऊ लागला. तसंच, उडवाउडवीची उत्तरं देत तो लोकांवर दोष ढकलण्याचा प्रयत्न करू लागला. शमुवेलानं त्याला ताडन केलं तेव्हा, आपण खरंतर यहोवाला बली अर्पण करण्यासाठी लुटीतली जनावरं राखून ठेवली होती, असं म्हणून शौलानं स्वतःच्या वागणुकीचं समर्थनच केलं. त्या वेळी, शमुवेलानं त्याला जे उत्तर दिलं ते सर्वांना सुपरिचित आहे. तो म्हणाला: “पाहा, यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे.” शमुवेलानं निर्भयपणे त्याला खडसावलं आणि यहोवाचा निर्णय त्याला कळवला: शौलाकडून राजपद काढून घेतलं जाईल आणि त्याच्यापेक्षा चांगल्या मनुष्याला दिलं जाईल. *१ शमु. १५:१-३३.

२५, २६. (क) शमुवेलानं शौलासाठी शोक का केला, आणि यहोवानं आपल्या संदेष्ट्याला कशा प्रकारे समजावलं? (ख) इशायाच्या घरी गेल्यावर शमुवेलाला कोणता महत्त्वाचा धडा शिकायला मिळाला?

२५ शौलानं केलेल्या या अपराधांमुळं शमुवेलाला मनस्वी दुःख झालं. तो रात्रभर याविषयी यहोवाचा धावा करत राहिला. इतकंच काय, तर तो शौलासाठी शोक करत राहिला. शौलामध्ये किती काही करण्याची क्षमता आहे, हे शमुवेलाला माहीत होतं. त्याच्याकडून शमुवेलाला बऱ्याच अपेक्षाही होत्या. पण त्या सर्व आता धुळीस मिळाल्या होत्या. एकेकाळी तो ज्या शौलाला ओळखत होता, तो माणूस आता पूर्णपणे बदलला होता. त्याच्यामध्ये आता कोणतेही चांगले गुण राहिले नव्हते आणि त्यानं यहोवाकडे पाठ फिरवली होती. शमुवेलानं पुन्हा कधीही शौलाची भेट घेतली नाही. पण, काही काळानं यहोवानं प्रेमळपणे शमुवेलाला समजावलं: “मी शौलास इस्राएलाच्या राजपदावरून झुगारून दिले आहे, तर तू त्याच्यासाठी कोठवर शोक करत राहणार? शिंगात तेल भरून चल; मी तुला इशाय बेथलेहेमकर याजकडे पाठवतो; कारण मी त्याच्या एका पुत्रास माझ्याकरता राजा निवडले आहे.”—१ शमु. १५:३४, ३५; १६:१.

२६ अपरिपूर्ण मानव यहोवाला नेहमी एकनिष्ठ राहतातच असं नाही. पण, यामुळं यहोवाचा उद्देश पूर्ण व्हायचा थांबत नाही. जर एखादा मनुष्य अविश्वासू ठरला, तर आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी यहोवा दुसऱ्या एखाद्या मनुष्याला निवडू शकतो. त्यामुळं, शेवटी शमुवेलानं शौलासाठी दुःख करण्याचं सोडून दिलं. यहोवाच्या सांगण्यावरून, तो बेथलेहेम इथं इशायाच्या घरी गेला. तिथं त्याची इशायाच्या रुबाबदार व देखण्या व्यक्तिमत्त्वाच्या मुलांशी भेट झाली. पण, केवळ त्यांच्या शारीरिक स्वरूपावर जाऊ नकोस, अशी यहोवानं सुरुवातीलाच शमुवेलाला आठवण करून दिली. (१ शमुवेल १६:७ वाचा.) शेवटी, शमुवेल इशायाच्या सर्वात धाकट्या मुलाला भेटला आणि हाच होता यहोवानं निवडलेला नवा राजा, दावीद.

यहोवा आपल्याला कोणत्याही निराशाजनक परिस्थितीतून सावरण्यास व तिच्यावर मात करण्यास साहाय्य करू शकतो; तसंच, त्या परिस्थितीचं तो आशीर्वादात रूपांतर करू शकतो, हे शमुवेलाला शिकायला मिळालं

२७. (क) शमुवेलाचा विश्वास कशा प्रकारे वाढत गेला? (ख) शमुवेलाच्या उदाहरणाबद्दल तुमच्या काय भावना आहेत?

२७ शौलाऐवजी दाविदाला राजा म्हणून निवडण्याचा यहोवाचा निर्णय किती योग्य होता, हे शमुवेलाला त्याच्या जीवनाच्या शेवटल्या काही वर्षांत अगदी स्पष्टपणे दिसून आलं. कारण, पुढेपुढे शौलाचं आचरण अगदी खालच्या थराला गेलं. मत्सरानं पेटून तो दाविदाच्या जिवावर उठला आणि त्यानं धर्मत्यागसुद्धा केला. दुसरीकडे पाहता, दाविदानं मात्र धैर्य, सात्त्विकता, विश्वास आणि एकनिष्ठा यांसारखे प्रशंसनीय गुण दाखवले. शमुवेलाच्या आयुष्याचा सूर्य मावळताना, त्याचा विश्वास दिवसेंदिवस अधिकच तेजस्वी होत गेला. शमुवेलाला आपल्या अनुभवातून हे शिकायला मिळालं, की जीवनात कितीही मोठ्या निराशेला तोंड द्यावं लागलं, तरी यहोवा आपल्याला त्या परिस्थितीतून सावरण्यास, तिच्यावर मात करण्यास साहाय्य करू शकतो; तसंच, त्या परिस्थितीचं आशीर्वादात रूपांतर करायलाही तो समर्थ आहे. शेवटी, शमुवेलाचा मृत्यू झाला आणि अशा रीतीनं, जवळजवळ एक शतक विश्वासूपणे सेवा केलेला यहोवाचा हा अतिशय उल्लेखनीय सेवक काळाच्या पडद्याआड गेला. संपूर्ण इस्राएल राष्ट्रानं त्याच्या मृत्यूचा शोक केला. त्या विश्वासू संदेष्ट्याच्या जाण्यानं त्यांना किती दुःख झालं असेल, याची आपण केवळ कल्पना करू शकतो! आजही, यहोवाच्या सेवकांनी स्वतःला हा प्रश्न विचारला पाहिजे, ‘मलाही शमुवेलासारखा विश्वास दाखवता येईल का?’

^ परि. 24 शमुवेलानं स्वतः अगागाचा वध केला. तो दुष्ट राजा आणि त्याचं घराणं दयेस पात्र नव्हते. अनेक शतकांनंतर, अगागाच्या वंशजांपैकी, “हामान अगागी” हा होता. त्यानं देवाच्या लोकांचा समूळ नाश करण्याचा कट रचला होता.—एस्तेर ८:३; याच पुस्तकातील अध्याय १५ आणि १६ देखील पाहा.