व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अध्याय बावीस

परीक्षाप्रसंगांतही त्यानं एकनिष्ठा सोडली नाही

परीक्षाप्रसंगांतही त्यानं एकनिष्ठा सोडली नाही

१, २. सभास्थानात येशूचं बोलणं ऐकणाऱ्या लोकांबद्दल पेत्राला काय वाटत होतं, पण काय घडलं?

कफर्णहूमातील सभास्थानातलं दृश्य. येशूचं बोलणं ऐकणाऱ्या लोकांच्या चेहऱ्यांकडे पेत्र मोठ्या उत्सुकतेनं पाहत होता. कफर्णहूम हे खरंतर पेत्राचंच गाव. तिथंच, म्हणजे गालील समुद्राच्या उत्तरेकडील किनाऱ्यावर त्याचा मासेमारीचा व्यवसाय होता; पेत्राचे बरेच मित्र, नातेवाईक आणि त्याच्या व्यवसायातील ओळखीचे लोक इथंच राहत होते. आपल्याप्रमाणेच आपल्या गावातले लोकसुद्धा, येशू हाच मसीहा असल्याचं ओळखतील आणि या सर्वात महान शिक्षकाकडून देवाच्या राज्याबद्दल शिकण्यास उत्सुक असतील, असं पेत्राला नक्कीच वाटत असेल. पण, तसं काही घडण्याची चिन्ह दिसत नव्हती.

काही वेळापूर्वी मोठ्या उत्सुकतेनं ऐकणारे बरेच लोक आता येशूच्या बोलण्याकडे लक्ष देत नव्हते. त्याचं बोलणं न पटल्यामुळं काही जण उघडपणे आपली नापसंती व्यक्त करत होते. पण, ज्या गोष्टीचं पेत्राला सगळ्यात जास्त वाईट वाटलं ती म्हणजे खुद्द येशूच्या शिष्यांची प्रतिक्रिया. नवीन सत्ये शिकून घेतल्याचा आनंद, रोमांच किंवा उत्सुकता आता त्यांच्या चेहऱ्यांवर दिसत नव्हती. उलट, ते नाराज झाले होते, त्यांना रागसुद्धा आला होता. काहींनी तर येशूचं बोलणं अतिशय धक्कादायक आहे असं म्हटलं. आणखी काहीच ऐकायची त्यांची तयारी नव्हती. त्यामुळे ते सभास्थानातून बाहेर पडले आणि त्याचं अनुसरण करण्याचं त्यांनी सोडून दिलं.—योहान ६:६०, ६६ वाचा.

३. पेत्राच्या विश्वासानं त्याला अनेकदा काय करण्यास मदत केली?

तो प्रसंग, पेत्रासाठी आणि इतर प्रेषितांसाठी अतिशय कठीण होता. त्या दिवशी येशू जे काही बोलला ते पेत्राला पूर्णपणे समजलं नव्हतं. त्याच्या बोलण्याचा शब्दशः अर्थ घेतल्यास ते नक्कीच धक्कादायक वाटू शकतं याची त्याला जाणीव होती. मग, पेत्राची काय प्रतिक्रिया होती? अर्थात, येशूप्रती असलेल्या पेत्राच्या एकनिष्ठेची ही काही पहिलीच परीक्षा नव्हती आणि ती शेवटचीही असणार नव्हती. पण, अशा परीक्षाप्रसंगांतही पेत्राच्या विश्वासानं त्याला एकनिष्ठ राहण्यास कशी मदत केली ते आता आपण पाहू या.

इतर जण सोडून गेले, पण पेत्र एकनिष्ठ राहिला

४, ५. काही वेळा येशूचं वागणं-बोलणं लोकांच्या अपेक्षेच्या उलट कसं होतं?

येशू जे काही बोलायचा, जे काही करायचा त्यामुळे पेत्र अनेकदा चकित व्हायचा. काही वेळा, येशूचं वागणं-बोलणं लोकांच्या अपेक्षेच्या अगदी उलट असायचं. उदाहरणार्थ, आदल्याच दिवशी येशूनं चमत्कार करून हजारो लोकांना जेवू घातलं होतं. त्यामुळं, त्यांनी त्याला आपला राजा बनवण्याचा प्रयत्न केला. पण, त्या प्रसंगी येशूनं जे केलं ते पाहून अनेक जण चकित झाले. तो तिथून निघून गेला आणि त्यानं शिष्यांना नावेत बसून कफर्णहूमाच्या दिशेनं जायला सांगितलं. रात्रीच्या वेळी, शिष्य समुद्रातून प्रवास करत असताना पुन्हा एकदा येशूनं असं काहीतरी केलं जे अगदीच अनपेक्षित होतं. तो चक्क त्या खवळलेल्या गालील समुद्रावरून चालत त्यांच्याकडे आला. त्या प्रसंगी, त्यानं पेत्राला विश्वासाच्या बाबतीत एक अतिशय महत्त्वाचा धडा दिला.

दिवस उजाडला तेव्हा शिष्यांच्या लक्षात आलं की लोक येशूला शोधत नावांमधून कफर्णहूमापर्यंत आले होते. अर्थात, ते येशूकडून शिकण्यासाठी नव्हे, तर त्यानं चमत्कार करून आपल्याला जेवू घालावं म्हणून त्याच्या मागेमागे आले होते. फक्त शारीरिक गोष्टींची चिंता करण्याच्या त्यांच्या या मनोवृत्तीबद्दल येशूनं त्यांना खडसावलं. (योहा. ६:२५-२७) पुढं याच विषयावर तो कफर्णहूमातील सभास्थानात बोलला. त्या वेळी, लोकांना एक अतिशय महत्त्वाचं, पण समजायला कठीण असलेलं सत्य शिकवताना तो जे काही बोलला ते अगदीच अनपेक्षित होतं.

६. येशूनं कोणतं उदाहरण दिलं, आणि त्यावर लोकांची काय प्रतिक्रिया होती?

लोकांनी आपल्याकडे केवळ एक अन्नदाता म्हणून पाहावं अशी येशूची इच्छा नव्हती. तर, त्यांना सार्वकालिक जीवन मिळवून देण्यासाठी देवानं त्याला पाठवलं होतं हे त्यांनी ओळखावं अशी त्याची इच्छा होती. त्यामुळं त्यानं स्वतःची तुलना मोशेच्या काळात स्वर्गातून उतरलेल्या भाकरीशी, अर्थात मान्ना याच्याशी केली. यावर काहींनी आक्षेप घेतला, तेव्हा येशूनं त्यांना स्पष्ट शब्दांत एक उदाहरण देऊन ही गोष्ट समजावून सांगितली. त्यानं म्हटलं, की सार्वकालिक जीवन मिळवण्यासाठी त्याचा देह खाणे आणि त्याचं रक्त पिणे आवश्यक आहे. येशूनं असं म्हटलं तेव्हा लोक आणखीनच संतापले. काही जण म्हणाले: “हे वचन कठीण [“धक्कादायक,” NW] आहे, हे कोण ऐकून घेऊ शकतो?” अगदी येशूच्या शिष्यांपैकीसुद्धा काहींनी त्याला सोडून देण्याचं ठरवलं. *योहा. ६:४८-६०, ६६.

७, ८. (क) येशूबद्दल कोणती गोष्ट पेत्राला अद्याप समजलेली नव्हती? (ख) येशूनं प्रेषितांना विचारलेल्या प्रश्‍नाचं पेत्रानं काय उत्तर दिलं?

पण, पेत्राबद्दल काय? त्यानं काय केलं? अर्थात, येशूचं बोलणं ऐकून तोही गोंधळून गेला असेल. देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी येशूचा मृत्यू होणं आवश्यक आहे ही गोष्ट त्याला अद्याप समजली नव्हती. पण यामुळं, येशूला सोडून जाणाऱ्या चंचल मनाच्या शिष्यांप्रमाणे तोही त्या दिवशी येशूला सोडून गेला का? नाही. कारण त्याच्यामध्ये असा एक गुण होता ज्यामुळं तो इतरांपेक्षा वेगळा ठरला. तो कोणता गुण होता?

येशू आपल्या प्रेषितांकडे वळून म्हणाला: “तुमचीही निघून जाण्याची इच्छा आहे काय?” (योहा. ६:६७) येशूनं खरंतर हा प्रश्न १२ जणांना विचारला होता, पण उत्तर मात्र पेत्रानं दिलं. आणि सहसा असंच व्हायचं. कदाचित पेत्र त्या सर्वांमध्ये सगळ्यात मोठा असल्यामुळे सहसा तोच बोलण्यात पुढाकार घेत असावा. आपले विचार स्पष्टपणे व्यक्त करण्याचा त्याचा स्वभावच होता. मनात त्याला जे काही वाटायचं ते तो अगदी मनमोकळेपणे बोलून टाकायचा. आणि या वेळी, त्यानं एक अतिशय सुरेख आणि लक्षात राहील असं विधान केलं. तो म्हणाला: “प्रभुजी, आम्ही कोणाकडे जाणार? सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत.”—योहा. ६:६८.

९. पेत्रानं येशूप्रती आपली एकनिष्ठा कशी दाखवली?

पेत्राचे ते शब्द तुमच्या मनाला भिडत नाहीत का? येशूवर असलेल्या विश्वासामुळे पेत्रानं एक अतिशय मौल्यवान गुण विकसित केला होता. तो म्हणजे एकनिष्ठा. येशू हाच यहोवानं नेमलेला तारणकर्ता आहे आणि त्याच्या शिकवणींवर विश्वास ठेवल्यानेच तारण मिळणं शक्य आहे हे पेत्रानं अचूक ओळखलं होतं. त्यामुळं, काही गोष्टी समजायला अवघड असल्या, तरी येशूला सोडून आणखी कोणत्याही मार्गानं देवाची कृपा आणि सार्वकालिक जीवन मिळवणं शक्य नाही हे पेत्राला माहीत होतं.

येशूच्या शिकवणी आपल्याला समजल्या नाहीत किंवा त्या आपल्या अपेक्षेप्रमाणे नसल्या तरीही आपण एकनिष्ठपणे त्या स्वीकारल्या पाहिजेत

१०. आपण पेत्रासारखी एकनिष्ठा कशी दाखवू शकतो?

१० तुम्हालाही असंच वाटतं का? दुःखाची गोष्ट म्हणजे आज अनेक जण येशूवर आपलं प्रेम असल्याचा दावा करतात, पण त्याला एकनिष्ठ राहण्यात मात्र ते कमी पडतात. खऱ्या अर्थानं ख्रिस्ताला एकनिष्ठ राहण्यासाठी त्याच्या शिकवणींबद्दल पेत्राचा जसा दृष्टिकोन होता तसाच आपलाही असला पाहिजे. त्याच्या शिकवणी आपण शिकून घेतल्या पाहिजेत, त्यांचा अर्थ समजून घेतला पाहिजे आणि त्यांनुसार जीवन जगलं पाहिजे; मग, त्या शिकवणी आपल्याला समजल्या नाहीत किंवा त्या आपल्या अपेक्षेप्रमाणे नसल्या तरीही. एकनिष्ठ राहिल्यानेच आपल्याला सार्वकालिक जीवन प्राप्त करता येईल. आपल्याला हे जीवन मिळावं हीच येशूची इच्छा आहे.—स्तोत्र ९७:१० वाचा.

चूक दाखवण्यात आली तेव्हाही एकनिष्ठ

११. येशू आपल्या अनुयायांना घेऊन कुठे गेला? (तळटीपही पाहा.)

११ कफर्णहूमातील त्या घटनांनतर येशू आपल्या प्रेषितांना आणि काही शिष्यांना घेऊन उत्तरेकडे एका लांबच्या प्रवासाला निघाला. प्रतिज्ञात देशाच्या अगदी उत्तरेकडे बर्फानं झाकलेला हर्मोन पर्वत होता; काही वेळा, निळ्याशार पाण्याच्या गालील समुद्राजवळून या पर्वताचं शिखर दिसायचं. जसजसे येशू आणि त्याचे अनुयायी फिलिप्पाच्या कैसरीयाकडील गावांजवळ येऊ लागले तसतसा तो पर्वत आणखीनच उंच वाटू लागला. * दक्षिणेकडे असलेल्या प्रतिज्ञात देशाचा बराचसा भाग इथून दिसायचा. अशा या नयनरम्य परिसरात आल्यावर येशूनं आपल्या अनुयायांना एक महत्त्वाचा प्रश्न विचारला.

१२, १३. (क) लोक आपल्याला कोण म्हणून ओळखतात हे जाणून घेण्यास येशू उत्सुक का होता? (ख) पेत्रानं येशूच्या प्रश्‍नाचं जे उत्तर दिलं त्यावरून त्याचा खरा विश्वास कसा दिसून आला?

१२ येशूनं त्यांना विचारलं: “लोक मला कोण म्हणून म्हणतात?” त्याच्या उत्सुक डोळ्यांकडे पाहणाऱ्या पेत्राची तुम्ही कल्पना करू शकता का? येशूच्या या प्रश्‍नावरून पेत्राला त्याचा दयाळूपणा आणि बुद्धिमत्ता याची जाणीव झाल्याशिवाय राहिली नसेल. आपण केलेल्या अद्‌भुत गोष्टी पाहून व ऐकून लोकांना आपल्याबद्दल काय वाटतं हे जाणून घेण्यास येशू उत्सुक होता. शिष्यांनी येशूच्या प्रश्‍नाचं उत्तर दिलं. त्यांनी लोकांच्या मनात त्याच्याबद्दल किती गैरसमज आहेत हे त्याला सांगितलं. पण, येशूचं समाधान झालं नाही. इतर लोकांप्रमाणेच आपल्या शिष्यांच्याही मनात गैरसमज आहेत का हे त्याला जाणून घ्यायचं होतं. त्यामुळं येशूने त्यांना विचारलं: “पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता?”—लूक ९:१८-२०.

१३ या वेळीसुद्धा पेत्रानंच उत्तर दिलं. तिथं उपस्थित असलेल्या अनेकांना येशूबद्दल जे काही वाटत होतं ते पेत्रानं अगदी स्पष्टपणे आणि धैर्याने बोलून दाखवलं. त्यानं म्हटलं: “आपण ख्रिस्त, जिवंत देवाचे पुत्र आहा.” ते ऐकून येशूला किती आनंद झाला असेल! त्यानं पेत्राची प्रशंसा केली आणि त्याला याची आठवण करून दिली, की हे महत्त्वाचं सत्य कोणा मानवानं नव्हे, तर खुद्द यहोवा देवानं प्रकट केलं होतं. खरंच, यहोवानं मानवांना प्रकट केलेलं सगळ्यात महत्त्वाचं सत्य, अर्थात भाकीत केलेला मसीहा किंवा ख्रिस्त कोण आहे, हे पेत्रानं ओळखलं होतं.—मत्तय १६:१६, १७ वाचा.

१४. येशूनं पेत्रावर कोणत्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या?

१४ पेत्रानं नुकतंच ख्रिस्त म्हणून ज्याला ओळखलं होतं त्याला प्राचीन भविष्यवाण्यांमध्ये “बांधणाऱ्यांनी नापसंत केलेला दगड,” असं म्हणण्यात आलं होतं. (स्तो. ११८:२२; लूक २०:१७) याच भविष्यवाण्यांचा संदर्भ घेऊन येशूनं म्हटलं, की या दगडावर किंवा खडकावर यहोवा एका मंडळीची स्थापना करेल. मग, त्यानं पेत्राला या मंडळीत काही महत्त्वाचे विशेषाधिकार दिले. पण, काहींना वाटतं त्याप्रमाणे येशूनं पेत्राला इतर प्रेषितांपेक्षा श्रेष्ठ पद दिलं नाही; तर त्याच्यावर जबाबदाऱ्या सोपवल्या. त्यानं त्याला “राज्याच्या किल्ल्या” दिल्या. (मत्त. १६:१८, १९) या किल्ल्यांचा उपयोग करून मानवजातीच्या तीन वेगवेगळ्या गटांना देवाच्या राज्यात प्रवेश करण्याची आशा देण्याचा सुहक्क पेत्राला मिळाला होता. सगळ्यात आधी यहुद्यांसाठी, त्यानंतर शोमरोन्यांसाठी आणि शेवटी यहूदी नसलेल्या विदेश्यांसाठी तो या किल्ल्यांचा उपयोग करणार होता.

१५. पेत्रानं येशूला काय म्हटलं, आणि का?

१५ पण, येशूनं पुढं असंही म्हटलं, की ज्यांना जास्त दिलं जातं त्यांच्याकडून जास्त अपेक्षा केली जाईल. हे किती खरं आहे हे पेत्राच्या उदाहरणावरून दिसून येतं. (लूक १२:४८) मसीहाबद्दल आणखी बरीच महत्त्वाची सत्ये येशू पुढंही प्रकट करत राहिला. जेरूसलेममध्ये कशा प्रकारे त्याचा छळ केला जाईल आणि त्याचा कशा प्रकारे मृत्यू होईल याबद्दलही येशूनं सांगितलं. हे ऐकून पेत्र अतिशय दुःखी झाला. तो येशूला बाजूला घेऊन म्हणाला: “प्रभुजी, आपणावर दया असो, असे आपल्याला होणारच नाही.”—मत्त. १६:२१, २२.

१६. येशूनं पेत्राची चूक त्याच्या लक्षात कशी आणून दिली, आणि येशूच्या शब्दांतून आपण सर्वच काय शिकू शकतो?

१६ पेत्राचे हेतू नक्कीच चांगले होते. त्यामुळे येशूनं त्याला जे उत्तर दिलं ते ऐकून तो चकित झाला असेल. पेत्राकडे पाठ फिरवून येशूनं इतर शिष्यांकडे पाहिलं; कारण तेसुद्धा कदाचित पेत्रासारखाच विचार करत असावेत. मग, येशू म्हणाला: “अरे सैताना, माझ्यामागे हो; तू मला अडखळण आहेस, कारण तू देवाच्या गोष्टींकडे लक्ष लावत नाहीस तर माणसांच्या गोष्टींकडे लक्ष लावतोस.” (मत्त. १६:२३; मार्क ८:३२, ३३, पं.र.भा.) येशूच्या या शब्दांतून आपल्या सगळ्यांनाच पुष्कळ काही शिकण्यासारखं आहे. एखाद्या गोष्टीकडे देवाच्या दृष्टिकोनातून पाहण्याऐवजी मानवी दृष्टिकोनातून पाहण्याचा आपला कल असू शकतो. पण, तसं जर आपण केलं, तर नकळतपणे आपण देवाला नव्हे, तर सैतानाला संतुष्ट करणाऱ्या गोष्टी करण्यास एखाद्याला प्रवृत्त करत असू; मग आपले हेतू कितीही चांगले असले तरीही. पण, येशूनं पेत्राला जे म्हटलं त्यावर त्याची काय प्रतिक्रिया होती?

१७. येशूनं पेत्राला “माझ्यामागे हो” असं म्हटलं त्याचा काय अर्थ होतो?

१७ पेत्राच्या हे नक्कीच लक्षात आलं असेल, की येशू त्याला खरोखर सैतान म्हणत नव्हता. कारण येशूनं सैतानासाठी जे शब्द वापरले होते ते त्यानं पेत्राशी बोलताना वापरले नाहीत. मूळ भाषेतील वृत्तान्तानुसार, सैतानाशी बोलताना येशूनं म्हटलं होतं: “अरे सैताना, चालता हो.” पण पेत्राला मात्र, “अरे सैताना, माझ्यामागे हो,” असं त्यानं म्हटलं. (मत्त. ४:१०) पेत्रामध्ये बरेच चांगले गुण आहेत हे येशूनं ओळखलं होतं आणि म्हणूनच त्यानं त्याला कायमचं नाकारलं नाही. याउलट, त्यानं केवळ या बाबतीत असलेली पेत्राची चुकीची विचारसरणी सुधारली. पेत्रानं आपल्या मार्गात अडखळण बनण्याऐवजी ‘आपल्यामागे’ उभं राहून आपल्याला पाठिंबा द्यावा अशी येशूची इच्छा होती.

आपल्याला ताडन दिलं जातं तेव्हा आपण ते नम्रपणे स्वीकारलं आणि स्वतःत सुधारणा केली तरच आपण येशू ख्रिस्त आणि आपला पिता, यहोवा देव यांच्यासोबतचा घनिष्ठ नातेसंबंध टिकवून ठेवू शकतो

१८. पेत्रानं एकनिष्ठा कशी दाखवली, आणि आपण त्याचं अनुकरण कसं करू शकतो?

१८ मग, पेत्रानं येशूशी वाद घातला का? येशूचं बोलणं त्यानं मनाला लावून घेतलं का, किंवा तो नाराज झाला का? नाही. उलट, त्यानं नम्रपणे आपली चूक मान्य केली. असं करण्याद्वारे त्यानं पुन्हा एकदा एकनिष्ठेचा गुण दाखवला. येशूचं अनुसरण करणाऱ्या सर्वांनाच कधी ना कधी सुधारणुकीची गरज असते. आपल्याला ताडन दिलं जातं तेव्हा आपण नम्रपणे ते स्वीकारलं आणि स्वतःमध्ये सुधारणा केली तरच आपण येशू ख्रिस्त आणि आपला पिता, यहोवा देव यांच्यासोबतचा आपला नातेसंबंध टिकवून ठेवू शकतो.—नीतिसूत्रे ४:१३ वाचा.

चूक लक्षात आणून दिल्यानंतरही पेत्र एकनिष्ठ राहिला

एकनिष्ठ राहिल्यामुळे मिळालेले आशीर्वाद

१९. येशूनं कोणतं धक्कादायक विधान केलं, आणि पेत्रानं कदाचित काय विचार केला असेल?

१९ याच्या काही काळानंतरच येशूनं आणखी एक धक्कादायक विधान केलं. त्यानं म्हटलं: “मी तुम्हास खचित सांगतो, येथे उभे असलेल्यांमध्ये काही असे आहेत की ते मनुष्याच्या पुत्राला त्याच्या राज्यात येताना पाहतील तोपर्यंत त्यांना मरणाचा अनुभव येणारच नाही.” (मत्त. १६:२८) येशूचे हे शब्द ऐकून पेत्राची उत्सुकता नक्कीच वाढली असेल. येशूला नेमकं काय म्हणायचं आहे? त्यानं नुकतीच आपली कानउघाडणी केली, त्यामुळं आता आपल्याला कोणतेच खास विशेषाधिकार मिळणार नाहीत, असा कदाचित त्यानं विचार केला असेल.

२०, २१. (क) पेत्रानं पाहिलेल्या दृष्टान्ताचं वर्णन करा. (ख) दृष्टान्तात दिसलेल्या दोघा जणांच्या संभाषणावरून पेत्राला आपली विचारसरणी बदलण्यास कशी मदत झाली?

२० पण, जवळजवळ एका आठवड्यानंतर याकोब, योहान आणि पेत्र यांना घेऊन येशू जवळच असलेल्या “एका उंच डोंगरावर,” कदाचित हर्मोन पर्वतावर गेला. बहुधा ती रात्रीची वेळ असावी कारण शिष्य पेंगत होते. पण, येशू प्रार्थना करत असताना असं काहीतरी घडलं की त्यांची झोप कुठल्या कुठं पळून गेली.—मत्त. १७:१; लूक ९:२८, २९, ३२.

२१ त्यांच्या डोळ्यांदेखत येशूचं रूप बदलू लागलं. हळूहळू त्याचा चेहरा उजळू लागला आणि शेवटी सूर्यासारखा तेजस्वी झाला. त्याचे कपडे पांढरेशुभ्र व चकचकीत झाले. मग, येशूसोबत आणखी दोघे जण दिसले. त्यांपैकी एक मोशेला, तर दुसरा एलीयाला सूचित करत होता. जेरूसलेममध्ये येशूच्या बाबतीत ज्या भविष्यवाण्या पूर्ण होणार होत्या त्यांविषयी, म्हणजेच त्याचा मृत्यू आणि पुनरुत्थान याविषयी ते त्याच्याशी बोलत होते. यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली. ती म्हणजे, येशूला यातनामय मरण सोसावं लागणार नाही असं जे पेत्राला वाटत होतं ते अगदीच चुकीचं होतं.—लूक ९:३०, ३१.

२२, २३. (क) पेत्रानं कशा प्रकारे एक प्रेमळ व उत्साही मनोवृत्ती दाखवली? (ख) पेत्र, याकोब आणि योहान यांना आणखी कोणता आशीर्वाद मिळाला?

२२ पेत्राला त्या दृष्टान्तात सहभागी होण्याचा मोह आवरला नाही. कदाचित तो दृष्टान्त आणखी काही काळ लांबवण्याची त्याची इच्छा असेल. त्यामुळे मोशे आणि एलीया येशूपासून निघून जात असल्याचं दिसलं तेव्हा पेत्र पटकन म्हणाला: “गुरूजी, आपण येथेच असावे हे बरे; तर आम्ही तीन मंडप करू; आपणासाठी एक, मोशेसाठी एक व एलीयासाठी एक.” अर्थात, दृष्टान्तात दिसलेल्या देवाच्या त्या प्राचीन सेवकांचा मृत्यू होऊन बराच काळ लोटला होता; ते केवळ त्या दृष्टान्तातील पात्र होते. त्यामुळं साहजिकच त्यांना तंबूंची गरज नव्हती. खरंतर पेत्राला आपण काय बोलत आहोत याचं भान नव्हतं. पण, त्यानं दाखवलेली प्रेमळ व उत्साही वृत्ती पाहून आपल्याला त्याच्याबद्दल आपुलकी वाटत नाही का?—लूक ९:३३.

याकोब आणि योहान यांच्यासोबत पेत्रालाही एक रोमांचक दृष्टान्त पाहण्याचा बहुमान मिळाला

२३ त्या रात्री पेत्र, याकोब आणि योहान यांना आणखी एक आशीर्वाद मिळाला. ते डोंगरावर असताना अचानक एका ढगानं त्यांच्यावर छाया केली आणि त्यांना एक वाणी ऐकू आली. खुद्द यहोवा देवाची ती वाणी होती! देवानं म्हटलं: “हा माझा पुत्र, माझा निवडलेला आहे; याचे तुम्ही ऐका.” दृष्टान्त संपला तेव्हा ते तिघंच येशूसोबत डोंगरावर होते.—लूक ९:३४-३६.

२४. (क) रूपांतराच्या दृष्टान्ताचा पेत्रावर काय परिणाम झाला? (ख) रूपांतराच्या दृष्टान्तामुळे आज आपल्याला कसा फायदा होऊ शकतो?

२४ पेत्रासाठी आणि एकंदर आपल्या सर्वांसाठीच रूपांतराचा तो दृष्टान्त एक मोठा आशीर्वाद आहे. त्या दृष्टान्तात, पेत्राला वैभवशाली स्वर्गीय राजाच्या रूपात येणाऱ्या येशूची पूर्वझलक आणि “त्याचे ऐश्वर्य प्रत्यक्ष” पाहण्याचा मोठा बहुमान मिळाला. पुढं अनेक दशकांनंतर पेत्रानं याबद्दल लिहिलं. त्या दृष्टान्तामुळे देवाच्या वचनातील अनेक भविष्यवाण्या पूर्ण होण्याची खातरी मिळाली; तसंच, पुढं पेत्रासमोर येणाऱ्या अनेक परीक्षांसाठी त्या दृष्टान्तानं त्याचा विश्वास मजबूत केला. (२ पेत्र १:१६-१९ वाचा.) पेत्राप्रमाणेच आपल्याही मनावर त्या दृष्टान्ताचा खोलवर प्रभाव पडू शकतो. त्यासाठी, यहोवानं आपल्यावर नेमलेल्या धन्याला आपण एकनिष्ठ राहू या. दुसऱ्या शब्दांत, त्याच्याकडून आपण शिकू या, तो देत असलेलं ताडन आणि सुधारणूक स्वीकारू या आणि निरंतर त्याचं अनुसरण करू या.

^ परि. 6 आदल्याच दिवशी, देवाचा संदेष्टा म्हणून येशूबद्दल मोठ्या उत्साहानं घोषणा करणाऱ्या लोकांची प्रतिक्रिया येशूच्या अशा बोलण्यामुळे एकाएकी बदलली. यावरून ते किती चंचल मनाचे होते हेच दिसून येतं.—योहा. ६:१४.

^ परि. 11 येशू व त्याच्या शिष्यांनी, समुद्रसपाटीपासून २१० मीटर खाली असलेलं कफर्णहूम इथून, समुद्रसपाटीपासून ३५० मीटरच्या उंचावर असलेल्या फिलिप्पाच्या कैसरीयापर्यंत, निसर्गसौंदर्यानं समृद्ध असलेल्या प्रदेशातून ५० किलोमीटरचा प्रवास केला.