व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

नियमन मंडळाकडून पत्र

नियमन मंडळाकडून पत्र

प्रिय बांधवांनो व बहिणींनो,

टेहळणी बुरूज सार्वजनिक आवृत्तीच्या १ जानेवारी २००८ या अगदी पहिल्याच अंकात, “त्यांच्या विश्वासाचं अनुकरण करा” या सुंदर लेखमालेतला पहिला लेख आपल्याला वाचायला मिळाला. आणि तेव्हापासून असे अनेक लेख वाचण्याचा आनंद आपण घेतला.

या लेखांविषयी वाचकांचं काय म्हणणं आहे? मार्थेविषयी असलेला लेख वाचल्यानंतर एका स्त्रीनं असं लिहिलं: “हा लेख वाचला तेव्हा खरंतर मला हसू आलं. कारण मीही अगदी मार्थेसारखीच आहे. घरी कुणी येतं तेव्हा त्यांचा पाहुणचार करण्यात मी इतकी गुंतून जाते, की त्यांच्यासोबत निवांत बसून गप्पागोष्टी करण्याचं राहूनच जातं.” एस्तेरविषयीची गोष्ट वाचल्यावर एका पंधरा वर्षांच्या मुलीनं जे म्हटलं ते लक्षात घेण्यासारखं आहे. ती म्हणाली: “कधीकधी आपण कपड्यांना आणि नवनवीन फॅशन्सना नको तितकं महत्त्व देतो. अर्थात, चांगलं दिसावंसं वाटणं चुकीचं नाही . . . पण या बाबतीत अती करणं चुकीचं आहे.” ती पुढं म्हणते: “यहोवा आपल्या बाहेरच्या रूपाकडे पाहत नाही, तर आपण आतून कसे आहोत हे तो पाहतो.” प्रेषित पेत्राबद्दल माहिती देणारा लेख वाचल्यावर एक बहीण इतकी उत्साहित झाली की तिनं असं म्हटलं: “हा लेख वाचताना मी पार हरवून गेले. अगदी डोळ्यांसमोर सगळं घडतंय असं मला वाटत होतं. तसंच, अहवालात ज्या गोष्टींचा फक्त उल्लेख केलेला आहे, त्यासुद्धा मी कल्पना करून अनुभवण्याचा प्रयत्न केला!”

अशा असंख्य वाचकांनी पत्रं पाठवून या लेखमालेबद्दल आभार व्यक्त केले. त्या सर्वांनी जे म्हटलं त्यावरून प्रेषित पौलानं फार पूर्वी लिहिलेले शब्द किती खरे आहेत हे दिसून येतं. त्यानं म्हटलं: “जे काही शास्त्रात पूर्वी लिहिले ते सर्व आपल्या शिक्षणाकरता लिहिले” आहे. (रोम. १५:४) खरोखर, आपल्याला अनेक चांगल्या गोष्टी शिकायला मिळाव्यात या उद्देशानंच यहोवानं हे सगळे अहवाल बायबलमध्ये लिहून ठेवले आहेत. आपण कितीही वर्षांपासून सत्यात असलो, तरी आपण सर्वच जण या अहवालांतून बरंच काही शिकू शकतो.

तेव्हा बांधवांनो आणि बहिणींनो, लवकरात लवकर हे पुस्तक वाचून काढण्याचा प्रयत्न करा. तुमच्या कौटुंबिक उपासनेत त्याचा वापर करा. आम्हाला खात्री आहे की मुलांनादेखील यातल्या गोष्टी खूप आवडतील. तसंच, मंडळीत या पुस्तकाचा अभ्यास केला जाईल तेव्हा एकही सभा चुकवू नका! जेव्हा तुम्ही हे पुस्तक वाचाल, तेव्हा घाईघाईनं वाचण्याऐवजी सावकाश, लक्ष देऊन वाचा. आपल्या कल्पनाशक्तीचा उपयोग करा. वर्णन केलेल्या प्रसंगांत स्वतःला पाहण्याचा प्रयत्न करा. अहवालांत उल्लेख केलेल्या व्यक्तींच्या मनात कोणत्या भावना आल्या असतील याची कल्पना करा. त्यांनी जे बघितलं, अनुभवलं ते बघण्याचा आणि अनुभवण्याचा प्रयत्न करा. तसंच, विशिष्ट परिस्थितीत ते कशा प्रकारे वागले; आणि त्या ठिकाणी जर तुम्ही असता तर तुम्ही काय केलं असतं यावरही विचार करा.

हे पुस्तक प्रकाशित करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी ते नक्कीच फायदेकारक ठरेल. आमच्या प्रेमळ सदिच्छा सदैव तुमच्यासोबत आहेत.

यहोवाच्या साक्षीदारांचे नियमन मंडळ