व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

इतरांसोबतचं आपलं नातं कसं जपायचं

इतरांसोबतचं आपलं नातं कसं जपायचं

आपण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांसोबत वावरतो; जसं की, घरात, कामाच्या ठिकाणी किंवा आपल्या मित्र-मैत्रिणीसोबत. मग त्यांच्यासोबत आपण आपलं नातं चांगलं कसं ठेवू शकतो? याबद्दल सगळं काही बनवणाऱ्‍या देवाने खूप चांगले सल्ले दिले आहेत. ते सल्ले लागू केल्यामुळे अनेकांना फायदा झाला आहे. ते सल्ले कोणते आहेत ते आता आपण पाहू या.

माफ करायला तयार असा

“कोणाविरुद्ध काही तक्रार असली, तरी एकमेकांना मोठ्या मनाने क्षमा करत जा.”—कलस्सैकर ३:१३.

आपल्या सगळ्यांकडून कधी ना कधी चुका होतात. कधी आपण कोणाचं मन दुखावतो, तर कधी कोणी आपलं मन दुखावतं. त्यामुळे आपण एकमेकांना माफ केलं पाहिजे. ज्याने आपलं मन दुखावलं आहे, त्याला माफ केल्यानंतर आपण त्याच्यावर रुसून बसणार नाही. तसंच आपण ‘वाइटाबद्दल त्याचं वाईट करणार नाही.’ किंवा सतत त्याच्या चुका किंवा कमतरता आपण त्याच्या लक्षात आणून देणार नाही. (रोमकर १२:१७) पण जर समोरच्याने असं काहीतरी केलं ज्यामुळे आपल्याला खूप वाईट वाटलं आणि आपण ते विसरूच शकत नाही, तर काय? अशा वेळी, तो एकटा असतो तेव्हा त्याला भेटून त्याबद्दल आपण त्याच्याशी शांतपणे बोललं पाहिजे. कारण आपल्याला ती समस्या मिटवून त्याच्यासोबत आपलं नातं चांगलं करायचं आहे. समोरची व्यक्‍ती चुकीची आहे हे आपल्याला सिद्ध करायचं नाही.—रोमकर १२:१८.

नम्र राहा आणि आदराने वागा

नम्रतेने इतरांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ समजा.”—फिलिप्पैकर २:३.

आपण नम्र राहून लोकांशी आदराने वागतो, तेव्हा त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायला आवडतं. कारण त्यांना माहीत असतं की आपण जाणूनबुजून कधीच त्यांचं मन दुखावणार नाही. आणि काही करण्याआधी किंवा बोलण्याआधी आपण इतरांचा दहा वेळा विचार करू. पण तेच जर आपण इतरांपेक्षा स्वतःला चांगलं समजलं आणि स्वतःच्याच म्हणण्यावर अडून राहिलो तर त्यामुळे वाद होऊ शकतात आणि कोणीही आपल्याशी मैत्री करणार नाही. आणि आपल्याला मित्र जरी असले तरी ते खूप कमी असतील.

भेदभाव करू नका

“देव लोकांमध्ये भेदभाव करत नाही. तर प्रत्येक राष्ट्रात जो कोणी त्याची भीती बाळगून योग्य ते करतो, त्याचा तो स्वीकार करतो.”—प्रेषितांची कार्यं १०:३४, ३५.

आज जगभरात वेगवेगळ्या जातीचे आणि वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक आहेत. कोणी गरीब, तर कोणी श्रीमंत आहे. प्रत्येकाचं रंगरूप वेगळं आहे. पण देव कोणामध्येही भेदभाव करत नाही. पवित्र शास्त्र म्हणतं: “त्याने एका माणसाद्वारे सगळी राष्ट्रं बनवली.” (प्रेषितांची कार्यं १७:२६) म्हणून आपण सगळे एका अर्थाने भाऊबहीण आहोत. आपण सगळ्यांशी आदराने आणि प्रेमाने वागतो तेव्हा त्यांना आनंद होतो. आपण स्वतः खूश राहतो, आणि हे पाहून देवालाही आनंद होतो.

सौम्यपणे आणि प्रेमळपणे वागा

‘सौम्यतेचं वस्त्र घाला.’—कलस्सैकर ३:१२.

आपण लोकांशी प्रेमळपणे आणि सौम्यतेने वागतो तेव्हा त्यांना आपल्याशी मनमोकळेपणाने बोलणं सोपं जातं. त्यांना आपल्याला काही सांगायचं असेल किंवा आपली चूक सुधारायची असेल तर ते आपल्याशी मनमोकळेपणाने बोलू शकतील. कारण त्यांना माहीत असतं की आपण त्यांचं शांतपणे ऐकून घेऊ. तसंच, समोरची व्यक्‍ती जेव्हा आपल्यावर रागावते तेव्हा जर आपण प्रेमळपणे उत्तर दिलं तर तिचा राग शांत होऊ शकतो. पवित्र शास्त्रात एका ठिकाणी असं म्हटलं आहे: “प्रेमळपणे दिलेल्या उत्तरामुळे राग शांत होतो, पण कठोर शब्दामुळे क्रोध भडकतो.”—नीतिवचनं १५:१, तळटीप.

उदारता दाखवा आणि आभार माना

“घेण्यापेक्षा देण्यात जास्त आनंद आहे.” —प्रेषितांची कार्यं २०:३५.

आज बरेच लोक स्वार्थी आहेत. आपल्याला दुसऱ्‍यांकडून काय मिळेल याचाच ते विचार करतात. पण जे उदार मनाने इतरांना देतात ते खऱ्‍या अर्थाने आनंदी असतात. (लूक ६:३८) कारण त्यांचं वस्तूंपेक्षा लोकांवर जास्त प्रेम असतं. आणि जेव्हा कोणी त्यांना काही उदारपणे देतं तेव्हा याच प्रेमामुळे ते त्या व्यक्‍तीची कदर करतात आणि तिचे आभार मानतात. (कलस्सैकर ३:१५) विचार करा तुम्हाला कशा प्रकारचे लोक आवडतात? कंजूस आणि कदर नसलेले लोक, की उदार आणि कदर बाळगणारे लोक? नक्कीच उदार आणि कदर बाळगणारे लोक. मग तुम्हीसुद्धा तशी व्यक्‍ती बनायचा प्रयत्न करू शकता का?—मत्तय ७:१२.