व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आनंदी कुटुंबासाठी देवाकडून सल्ला

आनंदी कुटुंबासाठी देवाकडून सल्ला

कुटुंब हा देवाकडून मिळालेला एक मोठा आशीर्वाद आहे. कुटुंबातल्या प्रत्येकाने, म्हणजे पतीने, पत्नीने आणि मुलांनी आनंदी राहावं असं त्याला वाटतं. त्यासाठी त्याने पवित्र शास्त्रात चांगले सल्ले दिले आहेत. ते कोणते ते आता आपण पाहू या.

पतींनो, आपल्या पत्नीवर प्रेम करा

“पती जसा स्वतःच्या शरीरावर प्रेम करतो तसंच त्याने आपल्या पत्नीवरही प्रेम करावं. जो माणूस आपल्या पत्नीवर प्रेम करतो तो स्वतःवर प्रेम करतो. कारण कोणताही माणूस स्वतःच्या शरीराचा द्वेष करत नाही. उलट, तो त्याचं पालनपोषण करतो.”—इफिसकर ५:२८, २९.

कुटुंबाचा प्रमुख पती असतो. (इफिसकर ५:२३) पण एक चांगला पती आपल्या पत्नीशी कधीही कठोरपणे वागत नाही किंवा तिच्यावर अधिकार गाजवत नाही. उलट, तो तिची काळजी घेतो, तिची कदर करतो आणि तिला समजून घेतो. तसंच, तो नेहमी तिला खूश ठेवायचा प्रयत्न करतो. आणि तिने आपल्या म्हणण्याप्रमाणेच वागावं अशी अपेक्षाही तो करत नाही. (फिलिप्पैकर २:४) आपल्याला काय वाटतं आणि आपण काय विचार करतो हे तो तिला मनमोकळेपणाने सांगतो. तसंच, तो तिचं म्हणणंही शांतपणे ऐकून घेतो. तो तिच्यावर संतापत नाही, तिला मारहाण करत नाही किंवा आपल्या बोलण्याने तिचं मन दुखवत नाही.—कलस्सैकर ३:१९, तळटीप.

पत्नींनो, आपल्या पतीशी आदराने वागा

“पत्नीने आपल्या पतीचा मनापासून आदर करावा.”—इफिसकर ५:३३.

पत्नी आपल्या पतीचा आदर करते आणि त्याने घेतलेल्या निर्णयाला साथ देते तेव्हा कुटुंबात शांती असते. त्याच्याकडून काही चूक होते तेव्हा ती त्याच्या अपमान करत नाही. उलट, तेव्हासुद्धा ती त्याच्याशी आदराने वागते. (१ पेत्र ३:४) तसंच, एखाद्या समस्येबद्दल तिला त्याच्याशी बोलायचं असेल, तर ती योग्य वेळेची वाट पाहते आणि खूप आदराने त्याच्याशी बोलते.—उपदेशक ३:७.

आपल्या विवाहसोबत्याला विश्‍वासू राहा

“माणूस आपल्या . . . बायकोसोबत राहील आणि ते दोघं एकदेह होतील.”—उत्पत्ती २:२४.

जेव्हा एका मुलाचं एका मुलीसोबत लग्न होतं, तेव्हा त्यांच्यामध्ये एक अतूट नातं तयार होतं. हे नातं असंच ठेवण्यासाठी त्यांनी एकमेकांशी मनमोकळेपणाने बोललं पाहिजे. आणि छोट्याछोट्या गोष्टी करून एकमेकांना खूश केलं पाहिजे. तसंच, त्यांनी एकमेकांना विश्‍वासू राहिलं पाहिजे. म्हणजे, त्यांनी लग्नाबाहेर कोणतेच संबंध ठेवू नये. कारण त्यामुळे जोडीदाराला खूप दुःख होतं. त्यांच्यात भरवसा राहत नाही. आणि कुटुंब विसकटतं.—इब्री लोकांना १३:४.

आईवडिलांनो, आपल्या मुलांना शिकवा

“मुलाला योग्य मार्गाने शिक्षण दे, म्हणजे म्हातारपणीही तो त्यापासून वळणार नाही.”—नीतिवचनं २२:६.

मुलांना वळण लावायची जबाबदारी देवाने आईवडिलांना दिली आहे. उदाहरणार्थ, इतरांशी कसं वागायचं हे त्यांनी आपल्या मुलांना शिकवलं पाहिजे. पण त्याआधी त्यांनी स्वतः तसं वागलं पाहिजे. (अनुवाद ६:६, ७) मुलं एखादी चूक करतात तेव्हा आईवडिलांनी त्यांच्यावर लगेच रागवू नये. तर काही बोलण्याआधी त्यांनी त्यांचं शांतपणे ऐकून घेतलं पाहिजे. (याकोब १:१९) आणि चूक सुधारायची गरज असेल, तर त्यांनी ती रागाच्या भरात नाही, तर प्रेमाने सुधारावी.

मुलांनो, आपल्या आईवडिलांचं ऐका

‘मुलांनो, आपल्या आईवडिलांच्या आज्ञेत राहा. आपल्या वडिलांचा आणि आईचा आदर करा.’—इफिसकर ६:१, २.

आईवडील जे काही सांगतात ते मुलांनी ऐकलं पाहिजे आणि त्यांचा आदर केला पाहिजे. यामुळे कुटुंबात आनंद आणि शांती टिकून राहते. मुलं मोठी होऊन जेव्हा आपल्या आईवडिलांची काळजी घेतात तेव्हा ती दाखवतात की त्यांना त्यांच्याबद्दल आदर आहे. मुलं जरी आईवडिलांसोबत राहत नसली तरी त्यांनी आईवडिलांच्या गरजा पूर्ण केल्या पाहिजेत आणि ते राहत असलेलं घर व्यवस्थित आहे याची खातरी केली पाहिजे.—१ तीमथ्य ५:३, ४.