मत्तयने सांगितलेला संदेश ७:१-२९

  • डोंगरावरचा उपदेश (१-२७)

    • दुसऱ्‍यांचे दोष काढू नका (१-६)

    • मागत राहा, शोधत राहा, ठोठावत राहा (७-११)

    • सुवर्ण नियम (१२)

    • अरुंद दरवाजा (१३, १४)

    • फळांवरून त्यांची ओळख (१५-२३)

    • खडकावर आणि वाळूवर बांधलेलं घर (२४-२७)

  • येशूची शिकवण्याची पद्धत पाहून लोक थक्क (२८, २९)

 तुमचे दोष काढले जाऊ नयेत, म्हणून तुम्ही दुसऱ्‍यांचे दोष काढायचं सोडून द्या.+ २  कारण ज्या प्रकारे तुम्ही दुसऱ्‍यांचा न्याय करता, त्याच प्रकारे तुमचाही न्याय केला जाईल.+ आणि ज्या मापाने तुम्ही दुसऱ्‍यांना मापून देता, त्याच मापाने तेही तुम्हाला मापून देतील.+ ३  तर मग, तुझ्या स्वतःच्या डोळ्यातलं लाकूड न बघता, तू तुझ्या भावाच्या डोळ्यातली बारीकशी काडी का बघतोस?+ ४  किंवा तुझ्या स्वतःच्या डोळ्यात लाकूड असताना, ‘मला तुझ्या डोळ्यातली काडी काढू दे,’ असं तू आपल्या भावाला कसं काय म्हणू शकतोस? ५  अरे ढोंगी माणसा! आधी स्वतःच्या डोळ्यातलं लाकूड काढ; म्हणजे मग तुझ्या भावाच्या डोळ्यातली काडी कशी काढायची हे तुला स्पष्ट दिसेल. ६  पवित्र गोष्टी कुत्र्यांना देऊ नका आणि तुमचे मोती डुकरांपुढे टाकू नका.+ नाहीतर, ते त्यांना पायांखाली तुडवतील आणि उलटून तुमच्यावर हल्ला करतील.* ७  मागत राहा म्हणजे तुम्हाला दिलं जाईल.+ शोधत राहा म्हणजे तुम्हाला सापडेल. आणि ठोठावत राहा म्हणजे तुमच्यासाठी उघडलं जाईल.+ ८  कारण जो मागतो त्याला दिलं जातं,+ जो शोधतो त्याला सापडतं आणि जो ठोठावतो त्याच्यासाठी उघडलं जातं. ९  खरंच, तुमच्यापैकी असा कोण आहे जो आपल्या मुलाने भाकर मागितल्यावर त्याला दगड देईल? १०  किंवा मासा मागितल्यावर साप देईल? कोणीही असं करणार नाही. ११  तुम्ही पापी असूनही जर तुम्हाला आपल्या मुलांना चांगल्या गोष्टी द्यायचं कळतं, तर मग स्वर्गातला तुमचा पिता त्याच्याकडे मागणाऱ्‍यांना त्या देणार नाही का?+ १२  म्हणून, ज्या गोष्टी इतरांनी आपल्यासाठी कराव्यात असं तुम्हाला वाटतं, त्या सर्व गोष्टी तुम्हीही त्यांच्यासाठी केल्या पाहिजेत.+ कारण नियमशास्त्रात आणि संदेष्ट्यांच्या लिखाणांत हेच सांगितलंय.+ १३  अरुंद दरवाजाने आत जा.+ कारण, नाशाकडे जाणारा दरवाजा रुंद आणि रस्ता पसरट आहे आणि त्यातून जाणारे बरेच आहेत. १४  पण जीवनाकडे जाणारा दरवाजा अरुंद आणि रस्ता छोटा* आहे आणि फार कमी लोकांना तो सापडतो.+ १५  खोट्या संदेष्ट्यांपासून जपून राहा.+ कारण ते मेंढरांच्या वेषात तुमच्याकडे येतात,+ पण आतून ते क्रूर लांडगे आहेत.+ १६  तुम्ही त्यांच्या फळांवरून त्यांना ओळखाल. काटेरी झुडपांना द्राक्षं किंवा अंजिरं कधी लागतात का?+ १७  त्याचप्रमाणे, प्रत्येक चांगलं झाड चांगलं फळ देतं, पण कीड लागलेलं झाड खराब फळ देतं.+ १८  चांगल्या झाडाला कधी खराब फळ येऊ शकत नाही आणि कीड लागलेल्या झाडाला कधी चांगलं फळ येऊ शकत नाही.+ १९  चांगलं फळ न देणारं प्रत्येक झाड कापून आगीत टाकलं जातं.+ २०  खरंच, त्या माणसांच्या फळांवरून तुम्ही त्यांना ओळखाल.+ २१  मला ‘प्रभू, प्रभू,’ म्हणणारा प्रत्येक जण स्वर्गाच्या राज्यात जाणार नाही, तर स्वर्गातल्या माझ्या पित्याच्या इच्छेप्रमाणे करणाराच त्या राज्यात जाईल.+ २२  त्या दिवशी बरेच लोक मला म्हणतील: ‘प्रभू, प्रभू,+ आम्ही तुझ्या नावाने संदेश दिले नाहीत का? तुझ्या नावाने दुष्ट स्वर्गदूत* काढले नाहीत का? आणि तुझ्या नावाने बरेच चमत्कार केले नाहीत का?’+ २३  पण, मी त्यांना स्पष्टपणे सांगीन: ‘अरे दुष्टांनो!* मी तुम्हाला कधीच ओळखत नव्हतो, माझ्यापुढून निघून जा!’+ २४  म्हणून, जो माझे हे शब्द ऐकून त्यांप्रमाणे वागतो तो अशा एका बुद्धिमान माणसासारखा आहे, ज्याने आपलं घर खडकावर बांधलं.+ २५  मग मुसळधार पाऊस आला, पूर आला आणि वादळी वारे त्या घरावर आदळले. तरी ते घर कोसळलं नाही, कारण ते खडकावर बांधलेलं होतं. २६  याउलट, जो माझे हे शब्द ऐकून त्यांप्रमाणे वागत नाही, तो अशा एका मूर्ख माणसासारखा आहे ज्याने आपलं घर वाळूवर बांधलं.+ २७  मग मुसळधार पाऊस आला, पूर आला आणि वादळी वारे त्या घरावर आदळले.+ तेव्हा ते घर कोसळलं आणि जमीनदोस्त झालं.” २८  येशूचं हे बोलणं संपल्यावर लोक त्याची शिकवायची पद्धत पाहून थक्क झाले.+ २९  कारण तो त्यांच्या शास्त्र्यांसारखा नाही, तर अधिकार असलेल्या व्यक्‍तीसारखा त्यांना शिकवत होता.+

तळटीपा

शब्दशः “तुम्हाला फाडून टाकतील.”
किंवा “चिंचोळा.”
किंवा “वाईट कामं करणाऱ्‍यांनो.”