व्हिडिओ पाहण्यासाठी

सगळे धर्म सारखेच आहेत का? ते सगळेच देवाला मान्य आहेत का?

सगळे धर्म सारखेच आहेत का? ते सगळेच देवाला मान्य आहेत का?

बायबलचं उत्तर

 नाही, सगळे धर्म सारखे नाहीत. बायबलमध्ये अशा पुष्कळ धर्मांची उदाहरणं आहेत जे देवाला मान्य नाहीत. या धर्मांचे दोन मुख्य प्रकार आहेत.

पहिला प्रकार: ज्यांत खऱ्‍या देवाची उपासना केली जात नाही

 खऱ्‍या देवाशिवाय इतर देवांच्या उपासनेला बायबलमध्ये “भ्रम,” ‘फायदा नसलेली’ आणि “व्यर्थ” असं म्हटलंय. (यिर्मया १०:३, तळटीप, ४-५; १६:१९, २०) जुन्या काळात यहोवा a देवाने इस्राएल राष्ट्राला अशी आज्ञा दिली होती: “माझ्याशिवाय तुम्हाला इतर कोणतेही देव नसावेत.” (निर्गम २०:३, २३; २३:२४) इस्राएली लोकांनी इतर देवांची उपासना केली तेव्हा “यहोवाचा राग भडकला.”​—गणना २५:३; लेवीय २०:२; शास्ते २:१३, १४.

 आजही “ज्यांना देव समजलं जातं” अशांची उपासना करण्याबद्दल यहोवाला तसंच वाटतं. (१ करिंथकर ८:५, ६; गलतीकर ४:८) ज्यांना त्याची उपासना करायची आहे, त्यांनी खोट्या धर्मांचं पालन करणाऱ्‍यांची संगत सोडून द्यावी अशी तो आज्ञा देतो. तो म्हणतो: “त्यांच्यातून बाहेर निघा आणि स्वतःला त्यांच्यापासून वेगळं करा.” (२ करिंथकर ६:१४-१७) जर सगळेच धर्म सारखे असते, आणि सगळेच देवाला मान्य असते, तर त्याने अशी आज्ञा दिली असती का?

दुसरा प्रकार: ज्यांत खऱ्‍या देवाची उपासना केली जाते, पण त्याला मान्य नसलेल्या पद्धतीने

 काही वेळा इस्राएली लोक खोट्या धर्मांच्या शिकवणी आणि चालीरितींप्रमाणे देवाची उपासना करायचे. पण खऱ्‍या धर्मासोबत खोट्या धर्माची केलेली ही भेसळ यहोवा देवाला बिलकूल आवडली नाही. (निर्गम ३२:८; अनुवाद १२:२-४) येशूने त्याच्या काळातल्या धर्मपुढाऱ्‍यांच्या उपासना करण्याच्या पद्धतीची  निंदा केली. कारण ते ढोंगी होते. ते देवाची उपासना करायचा दिखावा तर करायचे, पण ‘नियमशास्त्रातल्या जास्त महत्त्वाच्या गोष्टी, म्हणजेच न्याय, दया आणि विश्‍वासूपणा यांकडे ते दुर्लक्ष करायचे.’​—मत्तय २३:२३.

 त्याच प्रकारे आजही, फक्‍त सत्यावर आधारित असलेला धर्मच लोकांना देवाजवळ नेऊ शकतो. आणि ते सत्य आपल्याला बायबलमध्ये सापडतं. (योहान ४:२४; १७:१७; २ तीमथ्य ३:१६, १७) याउलट जे धर्म बायबलच्या विरोधात असलेल्या गोष्टी शिकवतात, ते खरंतर लोकांना देवापासून दूर नेतात. बऱ्‍याच लोकांना असं वाटतं, की त्रैक्य, अमर आत्मा आणि नरकयातना या शिकवणी बायबलवर आधारित आहेत. पण खरंतर या शिकवणी खोट्या देवांची उपासना करणाऱ्‍या धर्मांतून आल्या आहेत. अशा शिकवणींप्रमाणे उपासना करणं “व्यर्थ” आहे. कारण अशा उपासनेत देवाचे नियम नाही, तर धार्मिक परंपरा पाळल्या जातात.​—मार्क ७:७, ८.

 जे धार्मिक असण्याचं फक्‍त ढोंग करतात त्यांची देवाला घृणा वाटते. (तीत १:१६) खरा धर्म लोकांना देवाशी एक जवळचं नातं जोडायला मदत करतो. त्यात फक्‍त विधी आणि रुढीपरंपरा नसतात. तर तो लोकांच्या जीवनातल्या प्रत्येक पैलूवर प्रभाव पाडतो. जसं की बायबल म्हणतं: “आपण देवाचे उपासक आहोत असं समजणारा एखादा माणूस आपल्या जिभेला लगाम घालत नसेल, तर तो स्वतःची फसवणूक करत आहे आणि त्याची उपासना व्यर्थ आहे. आपला देव आणि पिता याच्या दृष्टीने शुद्ध आणि निर्मळ उपासना हीच आहे, की आपण अनाथ आणि विधवा यांच्या कठीण परिस्थितीत त्यांची काळजी घ्यावी आणि स्वतःला या जगात निष्कलंक ठेवावं.” (याकोब १:२६, २७) अशा निर्मळ आणि निष्कपट उपासनेला किंग जेम्स व्हर्शन  या बायबलमध्ये “शुद्ध धर्म” असं म्हटलंय.

a बायबलमध्ये सांगितल्याप्रमाणे यहोवा हे खऱ्‍या देवाचं नाव आहे.