व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मी पैसे उधार घ्यावेत का?

मी पैसे उधार घ्यावेत का?

‘उसणे घेताना मजा येते; परतफेड करताना मात्र नाकी नऊ येतात.’—या अर्थाची स्वाहिली भाषेतील म्हण.

पूर्व आफ्रिकेतील या प्रचलित म्हणीतून जगभरातील अनेकांच्या भावना व्यक्त होतात. एखाद्या मित्राकडून अथवा इतर मार्गांनी उधारीवर पैसे घेण्याबाबत तुम्हालाही असेच वाटते का? काही वेळा, उधारीवर पैसे घेणे गरजेचे आहे असे आपल्याला वाटू शकते; पण, ही चांगली गोष्ट आहे का? उधारीवर पैसे घेण्याचे धोके काय आहेत?

एक प्रमुख धोका, स्वाहिली भाषेतील आणखी एका म्हणीवरून लक्षात येतो. त्या म्हणीचा अर्थ असा होतो: ‘उधारीमुळे मैत्रीला तडा जातो.’ होय, कर्जामुळे मैत्री व नातेसंबंध बिघडू शकतात. आपण कितीही चांगले नियोजन केले आणि आपले हेतू कितीही चांगले असले तरी बऱ्याचदा आपल्या मनासारखे होत नाही. उदाहरणार्थ, पैसे परत करण्याची तारीख उलटून गेली तर कर्ज देणारा वैतागू शकतो. त्याच्या मनातील राग वाढत जाऊन दोघांत, इतकेच नव्हे तर त्यांच्या कुटुंबांतही दुरावा निर्माण होऊ शकतो. कर्जामुळे सहसा भांडणतंटा निर्माण होण्याची शक्यता असते; तेव्हा, पैशाच्या समस्या सोडवण्यासाठी कर्ज घेणे हा सगळ्यात सोपा उपाय नव्हे, तर शेवटचा पर्याय असला पाहिजे.

उधारीवर पैसे घेतल्याने एका व्यक्तीचा देवासोबतचा नातेसंबंधही बिघडू शकतो. तो कसा? पहिली गोष्ट म्हणजे, जी व्यक्ती घेतलेले पैसे मुद्दामहून किंवा जाणूनबुजून परत करत नाही ती दुष्ट असते असे बायबल म्हणते. (स्तोत्र ३७:२१) बायबल असेही म्हणते की, “जो माणूस कर्ज घेतो तो जो कर्ज देतो त्याचा गुलाम असतो.” (नीतिसूत्रे २२:७, ईझी-टू-रीड व्हर्शन) पैसे घेणाऱ्याने हे लक्षात घेतले पाहिजे की जोपर्यंत तो पैसे परत करत नाही तोपर्यंत तो पैसे देणाऱ्याच्या उपकाराखाली जगत असतो. आणखी एका आफ्रिकन म्हणीत जे म्हटले आहे ते किती खरे आहे: ‘तुम्ही ज्याच्याकडून घेता त्याच्या तालावर तुम्हाला नाचावे लागते.’ सांगायचा मुद्दा हा, की कर्जबाजारी झालेल्या व्यक्तीला काहीच स्वातंत्र्य नसते.

त्यामुळे, उसने घेतलेले पैसे आपण लगेच परत केले पाहिजेत; नाहीतर नको त्या समस्या उद्भवू शकतात. कर्जाचा डोंगर वाढल्यामुळे खूप मनःस्ताप होऊ शकतो; तसेच झोप न येणे, जास्त काम करणे, पती-पत्नीमध्ये खटके उडणे व कुटुंबे मोडकळीस येणे या समस्याही निर्माण होऊ शकतात. याशिवाय, कोर्टकचेरीच्या फेऱ्या किंवा तुरुंगवास या गोष्टी तर वेगळ्याच. म्हणूनच, रोमकर १३:८ (कॅथलिक कॉमन लँग्वेज) या वचनातील शब्दांत किती तथ्य आहे: “कुणाचेही देणे ठेवू नका. मात्र एकमेकांवर प्रेमाचे ऋण ठेवा.”

खरेच गरज आहे का?

वरील धोक्यांचा विचार करता, उधारीवर पैसे घेण्याच्या बाबतीत आपण सावध असले पाहिजे. आपण स्वतःला विचारले पाहिजे: ‘पैसे उधार घेण्याची मला खरंच गरज आहे का? माझा नोकरी-व्यवसाय बंद पडल्यामुळं मी पैसे घेतोय, की केवळ हौसमौज पूर्ण करण्यासाठी?’ उधारीवर पैसे घेण्याऐवजी आहे त्यात समाधानी असणे केव्हाही चांगले.

अर्थात, काही अपवाद असू शकतात; जसे की एखादा तातडीचा प्रसंग उद्भवतो तेव्हा दुसरा काही पर्यायच नाही असे वाटू शकते. पण अशा वेळीसुद्धा एखाद्या व्यक्तीने उधारीवर पैसे घेण्याचे ठरवले तर त्या बाबतीत तिने प्रामाणिक असले पाहिजे. हे कसे करता येईल?

पहिले तर, एक व्यक्ती खूप श्रीमंत आहे म्हणून आपण तिचा गैरफायदा घ्यावा असे नाही. उदाहरणार्थ, एखाद्याकडे भरपूर पैसा आहे म्हणजे त्याने आपल्याला मदत केलीच पाहिजे अशी अपेक्षा आपण करू नये; किंवा अशा व्यक्तीचे पैसे परत केले नाहीत तरी चालेल असा विचार आपण करू नये. तसेच, ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्यांचा आपण हेवा करू नये.—नीतिसूत्रे २८:२२.

मग, तुम्ही जे पैसे उधार घेतले ते न चुकता आणि लगेच परत करा. पैसे कधीपर्यंत परत करावे हे पैसे देणाऱ्याने सांगितले नसेल, तर स्वतःच एक तारीख ठरवा आणि त्या तारखेला पैसे परत करा. पुढे गैरसमज निर्माण होऊ नयेत म्हणून लेखी करार करणे सगळ्यात चांगले. (यिर्मया ३२:९, १०) उधार घेतलेले पैसे शक्यतो स्वतःच परत करा; त्यामुळे तुम्हाला त्या व्यक्तीचे आभार मानता येतील. घेतलेले पैसे प्रामाणिकपणे परत केल्याने नातेसंबंध चांगले राहतात. येशूने डोंगरावरील प्रवचनात म्हटले: “तुमचे बोलणे, होय तर होय, नाही तर नाही, एवढेच असावे.” (मत्तय ५:३७) तसेच, पुढील सुवर्ण नियमही लक्षात ठेवा: “लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे तसेच तुम्ही त्यांच्याशी वागा.”—मत्तय ७:१२.

बायबलची उपयुक्त तत्त्वे

उधारीवर पैसे घेण्याचा मोह टाळण्यासाठी बायबल एक साधासा उपाय सुचवते. ते म्हणते: “समाधानी वृत्तीसह भक्तिभाव केव्हाही फायदेशीर असतो.” (१ तीमथ्य ६:६, मराठी कॉमन लँग्वेज) दुसऱ्या शब्दांत, उधारीवर पैसे घेतल्यामुळे निर्माण होणारे दुष्परिणाम टाळायचे असतील तर आहे त्यात समाधानी असणे सगळ्यात चांगले. पण, झटपट सुख मिळवण्याच्या मागे धावणाऱ्या या जगात समाधानी असणे सोपे नाही. अशा वेळी, “भक्तिभाव” उपयुक्त ठरतो. तो कसा?

आशियातील एका ख्रिस्ती जोडप्याचे उदाहरण विचारात घ्या. ज्यांचे स्वतःचे घर होते अशांचा त्यांना खूप हेवा वाटायचा. त्यामुळे त्यांनीसुद्धा साठवलेल्या पैशातून तसेच बँकेतून व नातेवाइकांकडून कर्ज घेऊन स्वतःचे घर घेण्याचा विचार केला. पण काही काळातच, दर महिन्याला भराव्या लागणाऱ्या हफ्त्‌यांचे ओझे त्यांना जाणवू लागले. त्यामुळे त्यांनी आणखी काम हाती घेतले; ते जास्त वेळ काम करू लागले; आणि याचा परिणाम असा झाला की मुलांसाठी त्यांच्याकडे फारसा वेळ उरत नव्हता. “त्या वेळचा तो ताण, ते कष्ट आणि अपुरी झोप यामुळे माझं डोकं जड झालं होतं; माझी घुसमट होत होती,” असे पती म्हणतो.

“भौतिक गोष्टींकडे आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिल्यास आपले संरक्षण होते”

मग, १ तीमथ्य ६:६ यातील शब्द त्यांना आठवले आणि या सगळ्यातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग त्यांना दिसला; तो म्हणजे घर विकून टाकणे. कर्जाच्या भारातून मुक्त होण्यासाठी त्यांना दोन वर्षे लागली. या अनुभवातून ते जोडपे काय शिकले? हेच की, “भौतिक गोष्टींकडे आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिल्यास आपले संरक्षण होते.”

लेखाच्या सुरुवातीला दिलेल्या स्वाहिली म्हणीत जे म्हटले आहे ते अनेकांना कळते, पण वळत नाही. तेव्हा, वर उल्लेखिलेली बायबलची तत्त्वे विचारात घेता, ‘मी पैसे उधार घ्यावेत का?’ या प्रश्‍नाचा आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे. ▪ (w14-E 12/01)