व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या समीप जाणं माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट ठरली आहे

देवाच्या समीप जाणं माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट ठरली आहे

मी नऊ वर्षांची असतानाच माझी उंची वाढायची थांबली. त्यामुळे माझं वय ४३ असलं तरी उंची फक्त तीन फूटच आहे. माझी उंची आता वाढणार नाही हे माझ्या मम्मी-पप्पांना जाणवलं, तेव्हा यावर मी सतत विचार करून निराश होऊ नये म्हणून त्यांनी मला कामात व्यस्त राहण्याचं प्रोत्साहन दिलं. त्यासाठी आमच्या घरासमोर मी फळांचा एक स्टॉल मांडला. मी स्टॉल खूप नीटनेटका ठेवायचे त्यामुळे बरेच गिऱ्हाईक त्याकडे आकर्षित व्हायचे.

पण कामात व्यस्त राहिल्यामुळे काही खास फरक पडला नाही. माझ्या कमी उंचीमुळे मला अगदी लहान-सहान गोष्टींसाठीसुद्धा खूप प्रयास करावा लागायचा. जसं की, दुकानांच्या काउंटरवरसुद्धा एखादी गोष्ट मागण्यासाठी मला धडपडावं लागायचं. प्रत्येक गोष्ट जणू माझ्यापेक्षा दुप्पट उंचीच्या लोकांसाठीच बनवली आहे असं मला वाटायचं. मला माझीच कीव यायची. पण मी १४ वर्षांची असताना परिस्थिती बदलली.

एके दिवशी यहोवाचे साक्षीदार असलेल्या दोन स्त्रिया माझ्याकडे आल्या. त्यांनी काही फळं विकत घेतली आणि मला बायबल अभ्यास करायला आवडेल का, असं विचारलं. अभ्यास करत असताना मला याची जाणीव झाली की स्वतःच्या दुर्बलतेकडे लक्ष देण्याऐवजी, यहोवा आणि त्याच्या उद्देशांबद्दल जाणून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे मला खूप मदत झाली. स्तोत्र ७३:२८ माझं आवडतं वचन बनलं. याच्या पहिल्या भागात म्हटलं आहे, “देवाजवळ जाणे यातच माझे कल्याण आहे.”

काही कारणांमुळे अचानक आम्ही कोट डी वार सोडून बुर्किना फासो इथं राहायला गेलो. माझ्यासाठी हा फार मोठा बदल होता. आम्ही आधी जिथं राहायचो, तिथं माझा फळांचा स्टॉल असल्यामुळे तिथले लोक मला चांगलं ओळखायचे. पण आता आम्ही जिथं राहायला गेलो होतो, तिथल्या लोकांसाठी मी नवीन होते. त्यामुळे मी बऱ्याच लोकांना विचित्र वाटायचे. लोक माझ्याकडे एकटक पाहत राहायचे. म्हणून कित्येक आठवडे मी घराबाहेर पडलेच नाही. पण यहोवाबद्दल शिकत असताना मी किती आनंदी होते ते मला आठवलं. म्हणून यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा कार्यालयाला मी एक पत्र पाठवलं. आणि त्यांनी माझ्याकडे अगदी योग्य व्यक्तीला पाठवलं. नॅनी नावाची एक मिशनरी बहीण तिची स्कूटर घेऊन मला भेटायला आली.

आमच्या घराजवळच्या रस्त्यांची अवस्था खूप खराब होती. रस्त्यावर असलेल्या वाळूमुळे घसरण्याचा नेहमी धोका असायचा. आणि पावसाळ्यात तर रस्ते चिखलानं भरायचे. त्यामुळे माझ्याकडे येताना नॅनी बऱ्याचदा स्कूटरवरून पडायची. पण तरीही तिनं हार मानली नाही. एके दिवशी तिनं मला सभांना यायचं आमंत्रण दिलं. ती स्वतः मला सभांना घेऊन जाणार होती. त्यासाठी मला घराबाहेर पडावं लागणार होतं, लोकांच्या नजरा सहन कराव्या लागणार होत्या. शिवाय मी मागे बसल्यामुळे नॅनीला स्कूटर चालवणं आणखी कठीण होणार होतं. तरीपण, मी सभांना जायला तयार झाले. कारण मला माझ्या आवडत्या वचनाचा दुसरा भाग आठवला, ज्यात म्हटलं आहे: “मी प्रभू परमेश्वराला आपले आश्रयस्थान केले आहे.”

नॅनी आणि मीसुद्धा कधीकधी चिखलात पडायचो. पण या गोष्टीची आम्हाला पर्वा नव्हती, कारण सभांना जायला आम्हाला खूप आवडायचं. सभांमध्ये माझं प्रेमानं स्वागत करणाऱ्या लोकांमध्ये आणि माझ्याकडे विचित्र नजरेनं पाहणाऱ्या लोकांमध्ये किती मोठा फरक होता! सभांना जाण्यास सुरवात केल्यानंतर केवळ नऊ महिन्यांतच मी बाप्तिस्मा घेतला.

माझ्या आवडत्या वचनाच्या तिसऱ्या भागात म्हटलं आहे, की “मी तुझी सर्व कृत्ये जाहीर करावी.” त्यामुळे मला प्रचारकार्य करण्याची पहिल्यापासून इच्छा होती. पण प्रचार करणं माझ्यासाठी एक मोठं आव्हान होतं. घरोघरच्या सेवाकार्यात मी पहिल्यांदा गेले होते, तो दिवस मला अजूनही आठवतो. लहान-मोठे सर्वच माझ्याकडे एकटक पाहत होते, माझ्या मागं-मागं येत होते, आणि माझ्या चालण्याची नक्कल करत होते. याचं मला फार वाईट वाटलं. पण एक गोष्ट मी विसरले नाही, की सार्वकालिक जीवनाची जितकी मला गरज आहे तितकीच त्यांनादेखील आहे. त्यामुळेच मी या सर्व गोष्टी सहन करू शकले.

प्रचारकार्य करणं माझ्यासाठी सोईस्कर व्हावं म्हणून मी हातानी चालवता येईल अशी तीन चाकी सायकल घेतली. प्रचारकार्यामध्ये माझ्यासोबत असणारी व्यक्ती चढतीवर माझ्या सायकलीला मागून ढकलायची. आणि सायकल उतरतीला लागली की तीही पटकन सायकलवर बसायची. प्रचारकार्य करणं माझ्यासाठी सोपं नव्हतं. पण त्यात मला इतका आनंद मिळायचा, की मी १९९८ मध्ये पायनियर म्हणून काम करू लागले.

मी बरेच बायबल अभ्यास चालवायचे आणि त्यांपैकी चार विद्यार्थ्यांनी बाप्तिस्माही घेतला. तसंच, माझ्या एका बहिणीनंही सत्य स्वीकारलं! कधीकधी मी निराश व्हायचे, पण इतरांची प्रगती पाहून मला खूप प्रोत्साहन मिळायचं. जसं की, एकदा मला मलेरिया झाला होता. त्याच वेळी कोट डी वार इथून माझ्यासाठी एक पत्र आलं. मी बुर्किना फासो इथल्या महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यासोबत बायबल अभ्यास सुरू केला होता. आणि तो अभ्यास मी एका बांधवाला सोपवला. तो विद्यार्थी नंतर कोट डी वार इथं गेला. पुढे तो एक प्रचारक बनला. ही बातमी मला कळली, तेव्हा मला खूप आनंद झाला.

अपंगांना मदत करणाऱ्या एका संघटनेनं मला शिलाई काम शिकवायचं ठरवलं. पण तिथल्या एका शिक्षिकेनं माझं काम पाहिलं आणि म्हटलं, “आम्ही तुला साबण बनवायला शिकवलं पाहिजे.” आणि त्यांनी मला साबण बनवायला शिकवलं. मी घरीच रोजच्या वापरातले साबण बनवते. मी बनवलेला साबण लोकांना आवडतो आणि इतरांनाही ते त्याविषयी सांगतात. मी स्वतः तीन चाकी स्कूटर घेऊन तो साबण लोकांना घरपोच करते. आणि अशा प्रकारे मी माझा खर्च चालवते.

दुःखाची गोष्ट म्हणजे पाठीचा त्रास सुरू झाल्यामुळे, २००४ साली मला पायनियरिंग सोडावी लागली. पण मी आताही नियमितपणे प्रचाराला जाते.

लोकांना माझा हसरा स्वभाव खूप आवडतो. देवाच्या समीप जाणं माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट ठरली आहे. त्यामुळेच आनंदी राहण्यासाठी माझ्याजवळ सबळ कारणं आहेत.—सारा मायगा यांच्याद्वारे कथित.