व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

समस्या

आपली सुरक्षा धोक्यात

आपली सुरक्षा धोक्यात

“आजच्या पिढीने तंत्रज्ञान, विज्ञान आणि आर्थिक व्यवस्थेत कधी नव्हे इतकी वाढ पाहिली आहे, . . . आणि तरीही ही कदाचित पहिली पिढी असेल जिने जगाला [राजनैतिक, आर्थिक आणि पर्यावरण] विनाशाच्या उंबरठ्यावर आणून ठेवलं आहे.”​—द ग्लोबल रिस्क्स रिपोर्ट २०१८, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम.

आज जगातील बरेच सुशिक्षित लोक आपल्या आणि या पृथ्वीच्या भविष्याबद्दल इतके चिंतित का आहेत? आज आपल्यासमोर असलेल्या काही समस्यांचा विचार करा.

  • सायबर गुन्हे: ऑस्ट्रेलिया देशातल्या एका वृत्तपत्राने असं म्हटलं की, “इंटरनेट वापरणं दिवसेंदिवस खूप धोक्याचं बनत चाललं आहे. मुलांचं शोषण करणाऱ्‍या, लोकांना धमकावणाऱ्‍या, त्यांना त्रास देणाऱ्‍या आणि कंप्युटरची माहिती हॅक करणाऱ्‍या लोकांसाठी ते एक घर बनलं आहे.” आज लोकांची ओळख चोरणं हा जगातला सर्वात गतीने वाढणारा गुन्हा आहे. इंटरनेटमुळे लोकांना आपल्या वाईट इच्छा अगदी निर्दयीपणे आणि क्रूरपणे पूर्ण करण्याची संधी मिळाली आहे.

  • आर्थिक पातळीत असमानता: ऑक्सफॅम इंटरनॅश्‍नल रिपोर्टनुसार, जगातल्या ५० टक्के लोकांजवळ एकूण जितका पैसा आहे, तितकाच पैसा जगातल्या ८ सर्वात श्रीमंत लोकांकडे आहे. त्या रिपोर्टमध्ये पुढे असंदेखिल सांगितलं आहे की, आपलं अर्थशास्त्र असमान असल्यामुळे श्रीमंत लोक दिवसेंदिवस आणखी श्रीमंत बनत चालले आहेत आणि गरीब लोक आणखी गरीब. काही लोकांच्या मते या आर्थिक असमानतेमुळे लोक बंड करू शकतात.

  • युद्ध आणि छळ: संयुक्‍त राष्ट्र शरणार्थी समितीच्या २०१८ सालच्या अहवालानुसार आतापर्यंत इतक्या मोठ्या प्रमाणावर शरणार्थी लोक कधीच नव्हते. ६ कोटी ८० लाखांपेक्षा जास्त लोकांना युद्ध आणि छळ यांमुळे आपलं घर सोडून शरणार्थी म्हणून राहावं लागत आहे. त्या अहवालानुसार जगात दर दोन सेकंदांत एका व्यक्‍तीला शरणार्थी बनण्यासाठी भाग पाडण्यात येतं.

  • पर्यावरणाला धोका: द ग्लोबल रिस्क्स रिपोर्ट २०१८  यानुसार जगभरात प्राण्यांच्या आणि झाडांच्या अनेक जाती लुप्त होत चालल्या आहेत. तसंच, हवा व पाणी यातील प्रदूषणामुळे आज लोकांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. काही देशांमध्ये कीटकांची संख्याही खूप कमी होत चालली आहे. कीटक हे झाडांच्या वाढीसाठी गरजेचे असल्यामुळे, वैज्ञानिक पर्यावरणाला होणाऱ्‍या मोठ्या धोक्याबद्दल इशारा देत आहेत.

बदल करून या जगाला सुरक्षित बनवणं आपल्याला शक्य आहे का? काहींच्या मते लोकांना शिक्षण देणं हा या समस्येचा तोडगा आहे. जर असं असेल, तर मग कोणत्या प्रकारचं शिक्षण देणं गरजेचं आहे? पुढच्या लेखांमध्ये या प्रश्‍नांची उत्तरं देण्यात आली आहेत.