व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

शिक्षण आणि पैसा चांगल्या भविष्याची गॅरेंटी देऊ शकतात का?

शिक्षण आणि पैसा चांगल्या भविष्याची गॅरेंटी देऊ शकतात का?

बऱ्‍याच जणांना असं वाटतं, की आपण भरपूर शिक्षण घेतलं आणि आपल्याकडे भरपूर पैसा असला, तर आपलं पुढचं आयुष्य एकदम सुखात जाईल. आपण जर खूप शिकलो, तर आपल्याला नोकरीच्या ठिकाणी आणखी यश मिळेल. तसंच, आपल्या कुटुंबाला त्याचा फायदा होईल आणि आपण एक चांगले नागरिक बनू अशी त्यांची समज असते. त्यांना असंही वाटतं, की आपण चांगलं शिक्षण घेतलं, तर पुढे आपल्याला मोठ्या पगाराची नोकरी मिळेल. आणि भरपूर पैसा असला, तर साहजिकच आपल्याला सुखात जगता येईल.

शिक्षणाबद्दल अनेकांचं काय मत आहे

चायनामध्ये राहणारा झाँग चैन म्हणतो: “मला वाटायचं, की गरिबीतून वर यायचं असेल, तर माझ्याकडे युनिव्हर्सिटीची डिग्री असलीच पाहिजे. शिवाय, मोठ्या पगाराची नोकरी असली, तर मला सुखासमाधानाचं जीवन जगता येईल.”

आपलं पुढचं आयुष्य चांगलं असावं म्हणून बरेच लोक मोठमोठ्या नामांकित युनिव्हर्सिटींमध्ये ॲडमिशन घेतात. त्यासाठी काही जण तर परदेशातही जातात. ही गोष्टी, कोव्हिड-१९ माहामारी सुरू होण्याआधी खूप मोठ्या प्रमाणात दिसून येत होती. आर्थिक सहयोग व विकास संघटनेच्या २०१२ च्या अहवालाप्रमाणे, “शिक्षणासाठी बाहेरच्या देशांत जाणाऱ्‍या विद्यार्थ्यांपैकी ५२ टक्के विद्यार्थी आशिया खंडातले असतात.”

आपल्या मुलांना परदेशात जाऊन शिक्षण घेता यावं म्हणून आईवडील खूप कष्ट करतात. तायवानमध्ये राहणारा शेशँग म्हणतो: “माझे आईवडील खूप श्रीमंत नव्हते. पण तरी त्यांनी आम्हा चारही मुलांना अमेरिकेत शिक्षणासाठी पाठवलं.” इतरांप्रमाणे या कुटुंबानेसुद्धा आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी खूप मोठं कर्ज घेतलं होतं.

अनेकांनी काय अनुभवलं

ज्यांच्याकडे भरपूर शिक्षण आणि पैसा आहे ते नेहमीच आनंदी असतात असं नाही

शिक्षणामुळे काही प्रमाणात जीवन सुधारतं हे खरं आहे. पण विद्यार्थी अपेक्षा करतात तसे परिणाम त्यांना नेहमीच पाहायला मिळत नाहीत. उदाहरणार्थ, कित्येक वर्षं कष्ट करून आणि बरंच कर्ज घेऊनही अनेकांना हवी तशी नोकरी मिळत नाही. सिंगापूरच्या बिजनेस टाइम्समध्ये  दिलेल्या रेचल मूई यांच्या एका अहवालाप्रमाणे, “अलीकडे सुशिक्षित बेरोजगारांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. आणि दिवसेंदिवस ती वाढतच आहे.” डॉक्टरेट पदवी असलेले तायवानमधले जियांजी असं म्हणतात: “अनेकांना पर्याय नसल्यामुळे अशी नोकरी करावी लागते जिचा त्यांच्या डिग्रीशी काहीच संबंध नसतो.”

काहींना त्यांच्या मनासारखी नोकरी मिळते खरी, पण त्यांना वाटलं होतं तसं त्यांच्या आयुष्यात घडत नाही. युरोपमधून युनिव्हर्सिटीचं शिक्षण घेऊन निरीन हा थायलँडला परत आला, तेव्हा त्याला आपल्याच फिल्डमधली नोकरी मिळाली. तो म्हणतो: “मला वाटलं होतं, तसंच घडलं. डिग्री घेतल्यामुळे मला मोठ्या पगाराची नोकरी मिळाली. पण त्यासाठी मला खूप जास्त तास काम करावं लागायचं. पुढे कंपनीने खूप लोकांना कामावरून काढून टाकलं आणि त्यात माझीही नोकरी गेली. माझ्या लक्षात आलं, की नोकरी कितीही चांगली असली, तरी ती एका चांगल्या भविष्याची गॅरेंटी देऊ शकत नाही.”

ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे किंवा ज्यांना असं वाटतं, की आपण चांगलं जीवन जगत आहोत, त्यांनाही कौटुंबिक समस्या, आजारपण आणि पैशांची चिंता असते. जपानमध्ये राहणारा काटसूतोशी म्हणतो: “मला पैशाची कमी नव्हती. पण त्यामुळे लोक माझ्याशी स्पर्धा करायचे, माझ्यावर जळायचे आणि वाईट वागायचे. त्यामुळे मी वैतागलो होतो.” व्हिएतनामध्ये राहणारी लाम म्हणते: “मी असे बरेच लोक पाहिलेत जे आपली आर्थिक बाजू सुरक्षित करण्यासाठी चांगल्या पगाराची नोकरी शोधत असतात. पण उलट असुरक्षितता, आरोग्याच्या समस्या, मानसिक ताण आणि निराशा याच गोष्टी त्यांच्या पदरी पडतात.”

फ्रँक्लिनसारखंच अनेकांना हे कळून चुकलंय, की आयुष्यात शिक्षण आणि पैसाच सगळं काही नसतं. त्यामुळे अशा गोष्टींच्या मागे लागण्याऐवजी काही जण आयुष्यात आनंदी राहण्यासाठी सत्कर्मं करत राहतात. त्यांना वाटतं, की असं केल्यामुळे आपलं भविष्य चांगलं होईल. पण हे खरं आहे का? याचं उत्तर आपल्याला पुढच्या लेखात मिळेल.