व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मुख्य विषय

पैशाबद्दल योग्य दृष्टिकोन बाळगा

पैशाबद्दल योग्य दृष्टिकोन बाळगा

“पैशावरच जग चालतं,” असं लोक म्हणतात आणि काही प्रमाणात हे खरंदेखील आहे. आजच्या घडीला, अन्नधान्य आणि कपडालत्ता विकत घेण्यासाठी, तसंच घराचं भाडं देण्यासाठी किंवा घर विकत घेण्यासाठी पैसा लागतोच. एका नियतकालिकाच्या संपादकानं असं लिहिलं, “दैनंदिन जीवनात पैशाला फार महत्त्वाचं स्थान आहे. देवाणघेवाण करण्यासाठी पैशाचा वापर बंद केला, तर अगदी महिन्याभरातच लोक चिंतेनं भयभीत होतील, जगातली परिस्थिती युद्धासारखी होईल.”

पण पैशानं सगळंच विकत घेता येत नाही. नॉर्वेमधील आर्ने गारबॉर्ग यांनी आपल्या कवितेत याबद्दलचं सुंदर वर्णन केलं आहे: पैशानं अन्न मिळू शकतं पण भूक नाही; औषधं मिळू शकतात पण आरोग्य नाही; मऊ गादी मिळू शकते पण झोप नाही; ज्ञान मिळू शकतं पण समज नाही; दागिने मिळू शकतात पण सौंदर्य नाही; शान-शौकत मिळू शकते पण जिव्हाळा नाही; मौजमजा करू शकतो पण आनंद मिळणार नाही; ओळखी होतील पण खरे मित्र मिळणार नाहीत; नोकरचाकर मिळतील पण प्रामाणिकपणा मिळणार नाही.

जगण्यासाठी पैसा मिळवायचा असतो, पैसा मिळवण्यासाठी जगायचं नसतं, असा योग्य दृष्टिकोन बाळगल्यानं एक व्यक्ती जास्त समाधानी राहू शकते. बायबलमध्ये असा इशारा दिला आहे: “द्रव्याचा [पैशाचा] लोभ सर्व प्रकारच्या वाइटाचे एक मूळ आहे; त्याच्या पाठीस लागून . . . [कित्येकांनी] स्वतःस पुष्कळशा खेदांनी भोसकून घेतले आहे.”—१ तीमथ्य ६:१०.

हे लक्षात घ्या की पैसा वाईट नसतो तर पैशाचा लोभ वाईट असतो. पैशाला जास्त महत्त्व दिल्यामुळं मित्रांमध्ये, कुटुंबांतील सदस्यांमध्ये दरी निर्माण होऊ शकते. याची काही उदाहरणं पाहूयात.

दिनेश: * “तन्मयची आणि माझी चांगली मैत्री होती. मला वाटायचं की तो एक सभ्य आणि प्रामाणिक व्यक्ती आहे. पण नंतर मला त्याचं वेगळंच रूप बघायला मिळालं. झालं असं, की त्यानं माझी जुनी कार विकत घेतली. हा व्यवहार करताना तो माझी कार, आहे त्या स्थितीत विकत घ्यायला कबूल झाला होता. त्यानं तसं लिहूनही दिलं. माझ्याकडं ती कार होती तेव्हा व्यवस्थित होती. तिच्यात काही बिघाड होता याची मला मुळीच कल्पना नव्हती. त्यानं ती विकत घेतल्यानंतर तीन महिन्यातच बंद पडली. यावरून तन्मय माझ्यावर चिडला. त्याला वाटलं की मी त्याला फसवलं. मी त्याचे पैसे परत करावेत असा त्यानं तगादाच लावला. मला धक्काच बसला! मी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला तेव्हा तर तो माझ्यावर खूप भडकला. पैशावरून आमच्यात वितुष्ट आलं आणि आमची मैत्री तुटली.”

ईशा: “मला एकच बहीण आहे, निशा. आमचं तसं एकमेकींशी चांगलं जमायचं. पैशावरून आमच्यात दुरावा येईल असं मला कधीच वाटलं नव्हतं. आमच्या आईवडिलांचं निधन व्हायच्याआधी त्यांनी आमच्यासाठी काही संपत्ती ठेवली होती. त्यांची इच्छा होती की आम्हाला दोघींना बरोबरीचा हिस्सा मिळावा. पण माझ्या बहिणीनं जास्त हिस्सा मागितला. मी तिला नकार दिला आणि आईबाबांच्या इच्छेप्रमाणेच करण्याचं ठरवलं तेव्हा ती भडकली आणि मला धमकावू लागली. अजूनही तिच्या मनात माझ्याबद्दल खूप राग आहे.”

पैसा आणि चुकीचा दृष्टिकोन

पैशाबद्दल अयोग्य दृष्टिकोन बाळगल्यानं लोक इतरांबद्दल चुकीचा विचार करण्याची शक्यता आहे. उदाहरणार्थ, एखाद्या श्रीमंत व्यक्तीला वाटू शकतं की गरीब लोक आळशी असल्यामुळं ते आपली जीवनशैली सुधारत नाहीत. तसंच एखाद्या गरीब व्यक्तीला वाटू शकतं की श्रीमंत लोक लोभी असतात किंवा ते नुसतं पैसा-पैसा करत असतात. लीअॅन ही एका श्रीमंत घरातील तरुणी आहे. तिच्याबद्दलही लोक असाच चुकीचा विचार करायचे. ती सांगते:

पैशाबद्दल बायबलमध्ये दिलेला सल्ला पूर्वी जितका योग्य होता तितकाच आजही आहे

“सगळे मला श्रीमंत बापाची मुलगी म्हणून ओळखायचे. ‘तुला काय, नुसतं बोलायचा अवकाश, तू जे मागशील ते लगेच मिळतं,’ किंवा ‘आम्ही नाही तुमच्यासारखं श्रीमंत!, आम्हाला कुठं परवडतात तुमच्यासारख्या महागड्या गाड्या,’ असं लोक मला बऱ्याचदा टोमणा मारायचे. शेवटी मी माझ्या मित्रमैत्रीणींना, ‘मला असं बोलू नका,’ अशी विनंती केली. अशा बोलण्यानं मला वाईट का वाटतं ते मी त्यांना सांगितलं. कारण इतरांनी मला एक श्रीमंत मुलगी म्हणून नाही, तर एक प्रेमळ, दुसऱ्यांना मदत करणारी मुलगी म्हणून ओळखावं अशी माझी इच्छा होती.”

बायबल काय म्हणतं?

बायबल असं म्हणत नाही की पैसा असणं चुकीचं आहे, आणि ज्यांच्याजवळ भरपूर पैसा आहे त्यांची टीकाही करत नाही. एका व्यक्तीजवळ किती पैसा आहे त्यानं फरक पडत नाही, तर त्याच्याजवळ असलेल्या पैशाबद्दल किंवा पैसे मिळवण्याबद्दल त्याचा काय दृष्टिकोन आहे ते महत्त्वाचं आहे. पैशाबद्दल बायबलमध्ये दिलेला सल्ला पूर्वी जितका योग्य होता तितकाच आजही आहे. पुढील तत्त्वांचा विचार करा.

बायबल असं म्हणतं: “श्रीमंत होण्याचा प्रयत्न करताना तब्येतीची हेळसांड [तब्येतीकडं दुर्लक्ष] करू नका.”—नीतिसूत्रे २३:४, ईझी-टू-रीड व्हर्शन.

पैशाच्या मागं लागणाऱ्या लोकांविषयी द नार्सिसिजम एपीडेमिक नावाच्या पुस्तकात असं म्हटलं आहे, की अशा लोकांची मानसिक स्थिती चांगली नसते; त्यांना इतरांपेक्षा जास्त प्रमाणात पाठदुखी, डोकेदुखी आणि घसादुखी यांसारख्या आरोग्याच्या समस्या असतात. शिवाय असे लोक दारू आणि मादक पदार्थांच्या आहारी जातात. असं दिसून येतं की पैशाच्या मागं धावणाऱ्या लोकांची स्थिती खूप दयनीय होते.

बायबल असं म्हणतं: “आपले जीवन पैशाच्या लोभापासून दूर ठेवा व तुमच्याकडे जे आहे त्यातच समाधान माना.”—इब्री लोकांस १३:५, ईझी-टू-रीड व्हर्शन.

एक व्यक्ती समाधानी असली म्हणजे तिला पैशांची चिंता नसते असं नाही. फरक इतकाच की ती पैशांची अवास्तव चिंता करत बसत नाही. उदाहरणार्थ, काही आर्थिक तोटा झाल्यास, एक समाधानी व्यक्ती खचून जाणार नाही. उलट ती बायबलमधील प्रेषित पौल या व्यक्तीसारखा दृष्टिकोन बाळगण्याचा प्रयत्न करेल. त्यानं म्हटलं: “गरजू स्थितीत किंवा सर्व विपूल असताना कसे राहायचे ते मी जाणतो. कोणत्याही वेळी आणि सर्व परिस्थितीत तृप्त राहण्याचे व भुकेले राहण्याचे, भरपूर बाळगण्याचे आणि अपूरेपणात राहण्याचे अशा सर्व परिस्थितीत राहण्याचे रहस्य मी शिकलो आहे.”—फिलिप्पैकर ४:१२, ईझी-टू-रीड व्हर्शन.

बायबल असं म्हणतं: “जो आपल्या धनावर भरवसा ठेवतो तो पडेल.”—नीतिसूत्रे ११:२८.

संशोधकांचं म्हणणं आहे की विवाहात मतभेद होण्याचं आणि घटस्फोटाचं एक मुख्य कारण म्हणजे पैशाची समस्या. पैशामुळं अनेक जण आत्महत्याही करतात. काही लोकांना पैसा हा त्यांच्या विवाह बंधनापेक्षा, इतकंच काय तर त्यांच्या जीवनापेक्षाही महत्त्वाचा वाटतो! पण योग्य दृष्टिकोन असणारे लोक पैशावर भरवसा ठेवत नाहीत. याउलट, “कोणाजवळ पुष्कळ संपत्ती असली तर ती त्याचे जीवन होते असे नाही,” या येशूच्या विधानाचं महत्त्व त्यांना पटतं.—लूक १२:१५.

पैशाबद्दल तुमचा काय दृष्टिकोन आहे?

स्वतःचं परीक्षण केल्यानं पैशाबद्दल तुमचा दृष्टिकोन योग्य आहे की नाही हे तुम्हाला समजेल. स्वतःला पुढील प्रश्न विचारा.

  • रातोरात करोडपती बनण्याचं स्वप्न दाखवणाऱ्या स्कीम्स् किंवा बिजनेस यांच्या पाठीमागं मी लागतो का?

  • कुणी माझ्याकडं पैशाची मदत मागितली तर मदत करणं मला जड जातं का?

  • सतत पैशाबद्दल आणि आपल्याकडं असलेल्या महागड्या वसतूंबद्दल बोलणाऱ्या लोकांसोबतच मैत्री करायला मला आवडतं का?

  • खोटं बोलून किंवा फसवेगिरी करून मी पैसे कमवतो का?

  • पैसा असला तरच मला समाजात मोठं नाव मिळेल, असं मला वाटतं का?

  • मी सतत पैशाबद्दल विचार करत असतो का?

  • पैसा कमवण्याच्या नादात माझ्या आरोग्याकडं आणि कुटुंबाकडं माझं दुर्लक्ष होत आहे का?

    इतरांना देण्याद्वारे उदारता दाखवा

वरील कोणत्याही प्रश्‍नाचं तुमचं उत्तर ‘होय’ असेल, तर तुम्हाला पैशाविषयीचा तुमचा दृष्टिकोन बदलावा लागेल. पैशाला आणि महागड्या वसतूंना जास्त महत्त्व देणाऱ्या लोकांची मैत्री टाळा. याउलट, अशा लोकांबरोबर संगती करा जे पैशापेक्षा, चांगले गुण आणि सर्वांबरोबर चांगले नातेसंबंध ठेवण्यावर भर देतात.

पैशाच्या लोभाला कधीही तुमच्या मनात घर करू देऊ नका. याऐवजी पैशाला त्याच्या जागी ठेवा, म्हणजेच तुमचे मित्र, तुमचं कुटुंब आणि तुमचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य या गोष्टी पैशापेक्षा जास्त महत्त्वाच्या आहेत हे ओळखा. असं केल्यानं तुम्ही पैशाबद्दल योग्य दृष्टिकोन ठेवू शकाल. ▪ (g15-E 09)

^ परि. 7 या लेखातली काही नावं बदलण्यात आली आहेत.