व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सृष्टी देवाच्या अस्तित्वाची साक्ष देते

सृष्टी देवाच्या अस्तित्वाची साक्ष देते

“हे यहोवा, आमच्या देवा, गौरव, . . . स्वीकारण्यास तू योग्य आहेस; कारण तू सर्व काही निर्माण केले.”—प्रकटी. ४:११, NW.

१. देवावर दृढ विश्‍वास टिकवून ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो?

 बायबल म्हणते, की “देवाला कोणीही कधीच पाहिले नाही.” (योहा. १:१८) पण बरेच जण म्हणतात की ते फक्‍त डोळ्यांनी दिसणाऱ्‍या गोष्टींवरच विश्‍वास ठेवतात. अशा लोकांना यहोवा देवावर विश्‍वास ठेवण्यास आपण कशी मदत करू शकतो? शिवाय, “अदृश्‍य” असणाऱ्‍या यहोवा देवावर आपण आपला स्वतःचा विश्‍वास दृढ कसा करू शकतो? (कलस्सै. १:१५) याकरता पहिले पाऊल म्हणजे यहोवाबद्दलचे सत्य लोकांपासून लपवणाऱ्‍या शिकवणी कोणत्या हे ओळखणे. त्यानंतर, “देवविषयक ज्ञानाविरुद्ध” असलेल्या या शिकवणी कशा प्रकारे खोट्या आहेत हे सिद्ध करण्यासाठी आपण बायबलचा कुशलतेने उपयोग केला पाहिजे.—२ करिंथ. १०:४, ५.

२, ३. लोकांपासून देवाबद्दलचे सत्य लपवणाऱ्‍या दोन शिकवणी कोणत्या आहेत?

देवाबद्दलचे सत्य लोकांपासून लपवून ठेवणारी एक शिकवण जिच्यावर आज अनेक जण विश्‍वास ठेवतात, ती म्हणजे उत्क्रांतिवादाची शिकवण. मानवांच्या विचारांवर आधारित असलेली ही शिकवण बायबलच्या विरोधात असून ती मानवांना कोणतीही आशा देत नाही. साध्या शब्दांत सांगायचे, तर उत्क्रांतीचा सिद्धान्त असे शिकवतो की सृष्टीतील सर्व जीव आपोआप अस्तित्वात आले; हे जर खरे असेल तर याचा असा अर्थ होईल की आपण या पृथ्वीवर का अस्तित्वात आहोत याचे स्पष्टीकरण कोणीही देऊ शकत नाही.

बायबलचा शब्दशः अर्थ घेणारे ख्रिस्ती धर्मजगतातील काही लोक असा दावा करतात की हे विश्‍व, तसेच आपला पृथ्वी ग्रह आणि त्यावरील सगळी सृष्टी ही केवळ काही हजार वर्षांपासून अस्तित्वात आहे. या शिकवणीला सृष्टिवाद असे म्हणतात. या सिद्धान्ताचे समर्थन करणारे बायबलचा मनापासून आदर करतात; पण ते असे शिकवतात की देवाने सृष्टीतील सर्व गोष्टी केवळ काही हजार वर्षांपूर्वी, २४ तासांच्या सहा दिवसांत निर्माण केल्या. हा दृष्टिकोन योग्य नाही हे दाखवणारा विश्‍वसनीय वैज्ञानिक पुरावा असूनही ते हा पुरावा मान्य करत नाहीत. यामुळे, सृष्टिवादाची शिकवण खरेतर लोकांच्या मनात बायबलबद्दल अनादर निर्माण करते; या शिकवणीमुळे लोकांना वाटते की बायबलमध्ये न पटण्याजोगी आणि चुकीची माहिती आहे. अशा प्रकारचा दृष्टिकोन बाळगणारे, पहिल्या शतकातील त्या लोकांसारखे आहेत ज्यांना देवाविषयी आवेश तर होता पण तो “यथार्थ ज्ञानाला अनुसरून [नव्हता].” (रोम. १०:२) मग, उत्क्रांतिवाद आणि सृष्टिवाद यांसारख्या खोलवर रुजलेल्या शिकवणी खोट्या आहेत हे आपण देवाच्या वचनाच्या साहाय्याने कसे सिद्ध करू शकतो? बायबल काय शिकवते हे अचूकपणे समजून घेण्याचा आपण स्वतः कसोशीने प्रयत्न केला तरच आपण या शिकवणी खोट्या आहेत हे सिद्ध करू शकतो.

पुराव्यांवर आणि पटण्याजोग्या तर्कावर आधारित विश्‍वास

४. आपला विश्‍वास कशावर आधारित असला पाहिजे?

बायबल आपल्याला ज्ञानाची कदर करण्यास शिकवते. (नीति. १०:१४) यहोवाची अशी इच्छा आहे की आपण मानवी तर्कवादांमुळे किंवा धार्मिक परंपरांमुळे त्याच्यावर विश्‍वास ठेवू नये. तर, आपला विश्‍वास हा पुराव्यांवर आणि पटण्याजोग्या तर्कावर आधारित असावा. (इब्री लोकांस ११:१ वाचा.) देवावर दृढ विश्‍वास उत्पन्‍न करण्यासाठी यहोवा खरोखरच अस्तित्वात आहे याबद्दल आपली खात्री पटली पाहिजे. (इब्री लोकांस ११:६ वाचा.) आपण देवावर विश्‍वास फक्‍त ठेवायचा म्हणून ठेवत नाही, तर खऱ्‍या माहितीचे परीक्षण करून आणि ही माहिती नीट समजून घेतल्यावरच विश्‍वास ठेवतो.—रोम. १२:१.

५. देव खरोखरच अस्तित्वात आहे याची खात्री बाळगण्याचे एक कारण कोणते आहे?

आपण देवाला पाहू शकत नसलो, तरीही तो खरोखरच अस्तित्वात आहे अशी खात्री का बाळगू शकतो, याचे एक कारण प्रेषित पौल आपल्याला सांगतो. यहोवाबद्दल पौलाने लिहिले: “सृष्टीच्या निर्मितीपासून त्याच्या अदृश्‍य गोष्टी म्हणजे त्याचे सनातन सामर्थ्य व देवपण ही निर्मिलेल्या पदार्थांवरून ज्ञात होऊन स्पष्ट दिसत आहेत.” (रोम. १:२०) देवाच्या अस्तित्वाबाबत शंका घेणाऱ्‍या व्यक्‍तीला पौलाचे हे देवप्रेरित शब्द खरे आहेत हे आपण कसे पटवून सांगू शकतो? यासाठी तुम्ही पुढे दिलेली सृष्टीतील काही उदाहरणे सांगू शकता ज्यांतून निर्माणकर्त्याचे सामर्थ्य व बुद्धी दिसून येते.

सृष्टीतून देवाचे सामर्थ्य दिसून येते

६, ७. आपले संरक्षण करणाऱ्‍या दोन गोष्टींवरून यहोवाचे सामर्थ्य कशा प्रकारे दिसून येते?

आपले संरक्षण करणाऱ्‍या दोन गोष्टींतून यहोवाचे सामर्थ्य दिसून येते. त्या दोन गोष्टी म्हणजे पृथ्वीभोवती असलेले वातावरण आणि पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र. पृथ्वीच्या वातावरणामुळे आपल्याला श्‍वास घेण्यासाठी लागणारी हवा तर मिळतेच; पण त्यामुळे अंतराळातून पृथ्वीकडे वेगाने येणाऱ्‍या खडकांपासून आपले संरक्षणदेखील होते. हे खडक पृथ्वीवर आदळले तर मोठे नुकसान होऊ शकते. पण सहसा असे घडत नाही, कारण पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताच ते जळून भस्म होतात. ते जळत असताना रात्रीच्या आकाशात सुंदर प्रकाशकिरणांच्या रूपात दिसतात.

पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्रदेखील आपले संरक्षण करते. पृथ्वीच्या गाभ्याचा बाहेरील भाग प्रामुख्याने द्रवरूपातील लोखंडापासून बनलेला असून त्यामुळे एक शक्‍तिशाली चुंबकीय क्षेत्र तयार होते. हे चुंबकीय क्षेत्र आपल्या सर्वत्र आहे आणि ते अंतराळातही बऱ्‍याच दूरपर्यंत पोचते. सूर्यापासून आणि सूर्याच्या पृष्ठभागावर होणाऱ्‍या स्फोटांपासून हे चुंबकीय क्षेत्र आपले संरक्षण करते. या स्फोटांमुळे विषारी किरणे पृथ्वीच्या दिशेने फेकली जातात. पण पृथ्वीवर असलेले चुंबकीय क्षेत्र या विषारी किरणांना शोषून घेते किंवा त्यांना परत अंतराळात पाठवते. हे चुंबकीय क्षेत्र जरी आपल्याला डोळ्यांनी दिसत नसले, तरी त्याच्यामुळेच पृथ्वीच्या उत्तर व दक्षिण ध्रुवांवरील प्रदेशात रात्री आकाशात रंगीबेरंगी प्रकाश दिसतो. खरोखर, यहोवा महासामर्थ्यशाली आहे यात कोणतीही शंका नाही.—यशया ४०:२६ वाचा.

सृष्टीतून देवाची बुद्धी दिसून येते

८, ९. पृथ्वीवर जीवन कशामुळे टिकून राहू शकते, आणि यावरून आपल्याला यहोवाच्या बुद्धीविषयी काय समजते?

पृथ्वीवरील जीवन टिकवून ठेवण्याची ज्या प्रकारे यहोवाने व्यवस्था केली आहे त्यावरून आपल्याला त्याची बुद्धी दिसून येते. एका शहराची कल्पना करा ज्यात लाखो लोक राहत आहेत आणि ज्याच्याभोवती एक भिंत आहे. या शहरात बाहेरून स्वच्छ पाणी आत आणण्याची किंवा आतील घाण बाहेर टाकण्याची कोणतीही सोय नाही अशी कल्पना करा. साहजिकच अशा शहरात लवकरच अस्वच्छता पसरेल आणि त्यात राहणे अशक्य होईल. एका अर्थाने आपली पृथ्वीदेखील त्या शहरासारखी आहे. पृथ्वीवर मर्यादित प्रमाणात पाणी उपलब्ध आहे आणि पृथ्वीवरील अनावश्‍यक वस्तू पूर्णपणे नष्ट करणे शक्य नाही. पण तरीसुद्धा कोट्यवधी जिवंत प्राण्यांना लागणाऱ्‍या गोष्टी ही पृथ्वी पिढ्यानपिढ्या पुरवू शकते. असे का? कारण जीवनाकरता आवश्‍यक असलेल्या सर्व गोष्टींवर पुनःप्रक्रिया करून त्यांचा पुन्हा वापर करण्याची आश्‍चर्यकारक क्षमता पृथ्वीमध्ये आहे.

सर्व सजीवांना श्‍वास घेण्यासाठी पृथ्वीद्वारे ऑक्सिजन कशा प्रकारे पुरवला जातो याचा विचार करा. कोट्यवधी जीव श्‍वासावाटे ऑक्सिजन आत घेतात आणि कार्बन डाय ऑक्साईड नावाचा वायू बाहेर टाकतात. ही प्रक्रिया सतत घडत असली तरीसुद्धा ऑक्सिजनचा साठा कधीही संपत नाही. ते कसे काय? तर वनस्पती कार्बन डाय ऑक्साईड, पाणी, सूर्यप्रकाश आणि इतर पोषक द्रव्ये यांपासून कर्बोदके व ऑक्सिजन तयार करतात. आपण श्‍वासाद्वारे ऑक्सिजन शरीरात घेतो आणि कार्बन डाय ऑक्साईड बाहेर सोडतो तेव्हा हे चक्र पूर्ण होते. या चक्राला प्रकाश संश्‍लेषण असे म्हणतात. अशा प्रकारे यहोवा, त्याने निर्माण केलेल्या वनस्पतींद्वारे सर्वांना “जीवन” व “प्राण” देतो. (प्रे. कृत्ये १७:२५) खरोखर यहोवाची बुद्धी किती अद्‌भुत आहे!

१०, ११. मोनार्क फुलपाखराच्या आणि चतुर कीटकाच्या रचनेवरून यहोवाची बुद्धी कशा प्रकारे दिसून येते?

१० आपल्या अद्‌भुत पृथ्वी ग्रहावर राहणाऱ्‍या असंख्य जीवजंतूंची यहोवा देवाने ज्या प्रकारे रचना केली आहे त्यावरूनही त्याची बुद्धी दिसून येते. पृथ्वीवर अंदाजे २० लाख ते १ कोटी वेगवेगळ्या प्रकारचे जीवजंतू आढळतात. (स्तोत्र १०४:२४ वाचा.) यांपैकी काही जीवजंतूंच्या रचनेवरून यहोवाची बुद्धी कशा प्रकारे दिसून येते हे पाहू या.

चतुर कीटकाच्या डोळ्यांच्या रचनेवरून देवाची बुद्धी दिसून येते; आतील चित्रात डोळ्यांची रचना मोठी करून दाखवण्यात आली आहे (परिच्छेद ११ पाहा)

११ उदाहरणार्थ, मोनार्क फुलपाखराचा मेंदू जेमतेम बॉलपेनच्या टोकाएवढा असतो. तरीसुद्धा, हे फुलपाखरू जवळजवळ ३,००० किलोमीटरचा प्रवास करून कॅनडातून मेक्सिकोतील एका विशिष्ट जंगलात जाते. हा प्रवास करताना सूर्याच्या मदतीने ते दिशा ठरवते. पण आकाशात सूर्याची स्थिती सतत बदलत असते, मग हे फुलपाखरू योग्य दिशा कशा प्रकारे शोधू शकते? यहोवाने या फुलपाखराच्या लहानशा मेंदूची रचना अशा प्रकारे केली आहे, जेणेकरून सूर्याची स्थिती बदलली तरीसुद्धा ते योग्य दिशेने उडत राहू शकते. तसेच, चतुर नावाच्या कीटकाचेही उदाहरण घ्या. त्याच्या दोन डोळ्यांपैकी प्रत्येकात जवळजवळ ३०,००० भिंगे असतात. चतुर कीटकाचा लहानसा मेंदू या सर्व भिंगांतून येणारे संकेत समजू शकतो आणि त्यामुळे त्याच्या अवतीभवती होणारी सगळ्यात सूक्ष्म हालचालदेखील त्याच्या नजरेतून निसटत नाही.

१२, १३. यहोवाने तुमच्या शरीरातील पेशींची ज्या प्रकारे रचना केली आहे ते पाहून तुम्ही प्रभावित का होता?

१२ या सर्वापेक्षा, यहोवाने सर्व सजीव प्राण्यांच्या शरीरातील पेशींची ज्या प्रकारे रचना केली आहे ते पाहून आपण थक्क होतो. उदाहरणार्थ, तुमच्या शरीरात जवळजवळ १०० लाख कोटी पेशी आहेत. यांपैकी प्रत्येक पेशीत दोरीच्या आकाराचा डीएनए (डीऑक्सिरायबोन्युक्लिइक ॲसिड) नावाचा रासायनिक पदार्थ असतो. त्यात तुमच्या पूर्ण शरीराच्या रचनेसाठी लागणारी माहिती साठवलेली असते.

१३ डीएनएमध्ये किती माहिती साठवलेली असते? आपण एक ग्रॅम डीएनएची तुलना एका सीडीशी करू शकतो. सीडीमध्ये एका शब्दकोशात असलेली सर्व माहिती साठवली जाऊ शकते. तसे पाहता, सीडी ही फक्‍त एक लहानशी प्लॅस्टिकची तबकडी असते. एवढ्याशा तबकडीत इतकी माहिती साठवली जाऊ शकते ही कदाचित आपल्याला आश्‍चर्यकारक गोष्ट वाटेल. पण, फक्‍त एक ग्रॅम डीएनएमध्ये एक लाख कोटी सीडींमध्ये मावेल इतकी माहिती साठवली जाऊ शकते! किंवा दुसऱ्‍या पद्धतीने सांगायचे झाल्यास, एक चमचाभर कोरड्या रूपातील डीएनएमध्ये आज जिवंत असलेल्या मानवांच्या एकंदर संख्येपेक्षा ३५० पट जास्त मानवांची रचना करण्याकरता लागणारी माहिती साठवली जाऊ शकते!

१४. शास्त्रज्ञांनी लावलेल्या शोधांमुळे तुम्हाला यहोवाबद्दल कसे वाटते?

१४ मानवी शरीराच्या रचनेसंबंधीची माहिती जणू एका लाक्षणिक पुस्तकात लिहिलेली आहे, असे दावीद राजाने वर्णन केले. त्याने यहोवा देवाला उद्देशून असे म्हटले: “तुझ्या नेत्रांनी माझा पिंड पाहिला, आणि माझ्या नेमलेल्या दिवसांतला एकही नव्हता तेव्हा ते सर्व तुझ्या पुस्तकात लिहिलेले होते.” (स्तो. १३९:१६, पं.र.भा.) दाविदाने जेव्हा त्याच्या शरीराच्या रचनेबद्दल मनन केले तेव्हा तो यहोवाची स्तुती करण्यास प्रवृत्त झाला. अलीकडील वर्षांत शास्त्रज्ञांनी जे शोध लावले आहेत त्यांमुळे यहोवाने ज्या प्रकारे आपली रचना केली आहे त्याविषयी आपल्याला आणखीनच आश्‍चर्य वाटते. या शोधांमुळे आपल्यालाही स्तोत्रकर्त्याप्रमाणेच यहोवाबद्दल असे म्हणावेसे वाटते: “भयप्रद व अद्‌भुत रीतीने माझी घडण झाली आहे, म्हणून मी तुझे उपकारस्मरण करतो; तुझी कृत्ये अद्‌भुत आहेत हे माझा जीव पूर्णपणे जाणून आहे.” (स्तो. १३९:१४) खरोखर, सबंध सृष्टीवरून स्पष्टपणे दिसून येते की एक जिवंत देव नक्कीच अस्तित्वात आहे.

इतरांनाही जिवंत देवाचे गौरव करण्यास मदत करा

१५, १६. (क) आपल्या प्रकाशनांनी निर्माणकर्ता या नात्याने यहोवाच्या अद्‌भुत सामर्थ्याबद्दल कदर करण्यास आपल्याला कशा प्रकारे साहाय्य केले आहे? (ख) तुम्हाला कोणत्या लेखाने खासकरून प्रभावित केले आहे?

१५ अनेक दशकांपासून सावध राहा! * या मासिकाने लाखो लोकांना सृष्टीतून आपल्या जिवंत देवाबद्दल काय शिकायला मिळते हे समजून घेण्यास मदत केली आहे. उदाहरणार्थ, २००६ सालच्या ऑक्टोबर-डिसेंबर अंकाचे शीर्षक “खरंच एक सृष्टिकर्ता आहे का?” असे होते. उत्क्रांतिवाद आणि सृष्टिवाद यांसारख्या सिद्धान्तांमुळे देवावर विश्‍वास न ठेवणाऱ्‍या लोकांना देवाच्या अस्तित्वाची खात्री पटवून देणे हाच या अंकाचा उद्देश होता. अमेरिकेतील शाखा कार्यालयाला एका बहिणीने असे लिहिले: “या विशेषांकाच्या वाटपाची मोहीम खूपच यशस्वी ठरली. एका स्त्रीने तर २० प्रती मागवल्या. ती जीवशास्त्राची शिक्षिका आहे आणि तिच्या विद्यार्थ्यांसाठी तिला एकेक प्रत हवी होती.” एका बांधवाने लिहिले: “मी १९४० च्या दशकापासून क्षेत्र सेवाकार्यात सक्रियपणे भाग घेतो. आता माझे वय ७५ च्या आसपास आहे. पण, हा विशेषांक लोकांना देताना मला क्षेत्र सेवाकार्यात जितका आनंद मिळाला तितका आजपर्यंत कधीही मिळाला नव्हता.”

१६ अलीकडील वर्षांत, आपल्या प्रकाशनांत निर्मितीबद्दल आणखीही काही लेख प्रकाशित झाले आहेत. * या लेखांत सृष्टीतील निरनिराळ्या गोष्टींतून दिसणाऱ्‍या आश्‍चर्यकारक रचनांकडे लक्ष वेधण्यात आले. तसेच, मानवांनी कशा प्रकारे महान रचनाकाराच्या अर्थात यहोवा देवाच्या निर्मितीकृत्यांची नक्कल करून अनेक वस्तू निर्माण केल्या आहेत हेदेखील या लेखांत सांगण्यात आले. या लेखांचा उद्देश निर्माणकर्ता या नात्याने यहोवा देवाच्या अद्‌भुत सामर्थ्याविषयी आपल्या मनातील कदर वाढवणे हा होता. या लेखांतील प्रश्‍न वाचकाला तर्क करण्यास साहाय्य करतात. तुम्ही या लेखांतील काही रोचक मुद्द्‌यांचा घरोघरच्या सेवाकार्यात किंवा अनौपचारिक साक्ष देताना वापर करून पाहिला आहे का?

१७, १८. (क) तरुणांना त्यांच्या विश्‍वासाचे समर्थन करता यावे म्हणून त्यांचा आत्मविश्‍वास वाढवण्यास आईवडील कशा प्रकारे हातभार लावू शकतात? (ख) निर्मितीबद्दल आपल्या प्रकाशनांत आलेल्या लेखांचा तुम्ही कशा प्रकारे उपयोग केला आहे?

१७ आईवडिलांनो, तुम्ही कौटुंबिक उपासनेत अशा प्रकारच्या लेखांवर तुमच्या मुलांसोबत चर्चा केली आहे का? असे केल्यास, आपल्या जिवंत देवाबद्दल कदर बाळगण्यास तुमच्या मुलांना मदत मिळेल. कदाचित तुम्हाला शाळेत शिकणारी किशोरवयीन मुले असतील. उत्क्रांतीची शिकवण देणारे तुमच्या मुलांना ही शिकवण खरी असल्याचे पटवून देण्याचा प्रयत्न करतात. शास्त्रज्ञ, शालेय शिक्षक, निसर्गावरील माहितीपट इतकेच नव्हे, तर मनोरंजनासाठी दाखवले जाणारे टीव्ही कार्यक्रम व चित्रपटदेखील उत्क्रांतिवाद खरा असल्याचे लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही आपल्या प्रकाशनांतील माहितीचा उपयोग करण्याद्वारे, अशा शिकवणी खोट्या असल्याचे सिद्ध करून दाखवण्यास तुमच्या मुलांना साहाय्य करू शकता. * ही माहिती मुलांना योग्य प्रकारे विचार करण्यास मदत करते. (नीति. २:१०, ११) शाळेत जे काही शिकवले जाते ते कितपत पटण्याजोगे आहे हे तपासून पाहायला या प्रकाशनांद्वारे त्यांना मदत मिळते.

आईवडिलांनो, मुलांना त्यांच्या विश्‍वासाचे समर्थन करण्यास साहाय्य करा (परिच्छेद १७ पाहा)

१८ मानव वानरांपासून उत्पन्‍न झाला हे सिद्ध करणारा पुरावा शास्त्रज्ञांना मिळाला असल्याच्या खळबळजनक बातम्या कधीकधी तरुणांना ऐकायला मिळतात. अशा प्रकारची वृत्ते खरोखरच विश्‍वसनीय आहेत किंवा नाही याची खात्री करून घेण्यास त्यांना साहाय्य करा. तसेच, जीवन आपोआप अस्तित्वात आले असे शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेत सिद्ध करून दाखवल्याचा कोणी दावा केल्यास त्यांना कसे उत्तर द्यावे हेदेखील तरुणांना शिकवा. आईवडिलांनो, या लेखांचा उपयोग करण्याद्वारे, निर्माणकर्त्यावरील विश्‍वासाचे समर्थन करण्यासाठी तुम्ही आपल्या मुलांचा आत्मविश्‍वास वाढवण्यास बराच हातभार लावू शकता.—१ पेत्र ३:१५ वाचा.

१९. आपल्या सर्वांना कोणता बहुमान लाभला आहे?

१९ यहोवाच्या संघटनेद्वारे मिळणारे साहित्य उत्तम संशोधन करून तयार केले जाते आणि ते आपल्या भोवतालच्या सृष्टीवरून दिसून येणाऱ्‍या यहोवाच्या सुरेख गुणांची आपल्याला जाणीव करून देते. या विश्‍वसनीय पुराव्यामुळे आपल्याला यहोवा देवाची भरभरून स्तुती करण्याची प्रेरणा मिळते. (स्तो. १९:१, २) सर्व गोष्टींचा सृष्टिकर्ता असलेला यहोवा देव खरोखरच गौरव व महिमा मिळवण्यास पात्र आहे. त्याचे गौरव करणे हा आपल्याकरता केवढा मोठा बहुमान आहे!—१ तीम. १:१७.

^ सावध राहा! आता मराठी भाषेत प्रकाशित केले जात नाही.

^ उदाहरणार्थ टेहळणी बुरूज, १५ जून २००७, पृष्ठे २१-२५ आणि १५ फेब्रुवारी २०११, पृष्ठे ६-९ वरील लेख पाहा.

^ वॉझ लाइफ क्रिएटेड? (इंग्रजी) व जीवन की शुरूआत—पाँच सवाल—जवाब पाना ज़रूरी (हिंदी) या २०१० साली प्रकाशित झालेल्या माहितीपत्रकांतही बरीच उपयुक्‍त माहिती मिळेल.