व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

त्यांनी स्वतःला स्वेच्छेने वाहून घेतले एक्वाडॉरमध्ये

त्यांनी स्वतःला स्वेच्छेने वाहून घेतले एक्वाडॉरमध्ये

त्यांनी स्वतःला स्वेच्छेने वाहून घेतले एक्वाडॉरमध्ये

इटलीतील ब्रूनो नावाच्या एका तरुण बांधवाला एक महत्त्वाचा निर्णय घ्यायचा होता. त्याचे शालेय शिक्षण नुकतेच संपले होते व त्याच्या वर्गात त्याला सर्वात जास्त गुण मिळाले होते. आता त्याचे नातेवाईक व त्याचे शिक्षक त्याला उच्च शिक्षण घेण्याचा आग्रह करू लागले. पण, काही वर्षांआधी ब्रूनोने यहोवाला समर्पण केले होते आणि त्याला वचन दिले होते की तो आपल्या जीवनात त्याच्याच इच्छेला प्रथम स्थान देईल. मग त्याने कोणता निर्णय घेतला? तो म्हणतो: “मी माझ्या समर्पणानुसार जीवन जगेन व यहोवाच्या इच्छेला प्रथम स्थान देईन असं प्रार्थनेत मी त्याला सांगितलं. पण मी देवाला प्रामाणिकपणे हेही सांगितलं की मला एक नीरस जीवन जगण्याची नव्हे, तर त्याच्या सेवेतील वेगवेगळ्या पैलूंत भाग घेण्याची इच्छा आहे.”

काही वर्षांनंतर, ब्रूनो दक्षिण अमेरिकेतील एक्वाडॉरमध्ये सेवा करायला गेला. तो म्हणतो: “मी अपेक्षाही केली नव्हती अशा प्रकारे यहोवानं माझ्या प्रार्थनेचं उत्तर दिलं.” ब्रूनो एक्वाडॉरला पोहचला तेव्हा यहोवाची सेवा आणखी जास्त प्रमाणात करण्यासाठी तेथे आलेल्या त्याच्यासारख्याच अनेक तरुणांना पाहून त्याला आश्‍चर्य वाटले.

तरुण ज्यांनी यहोवाची “प्रतीती” पाहिली

जगभरातील इतर हजारो तरुणांप्रमाणे ब्रूनोने यहोवाचे हे आमंत्रण स्वीकारले: “मी आकाशकपाटे उघडून जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद तुम्हाकरिता वर्षितो की नाही याविषयी माझी प्रतीती पाहा.” (मला. ३:१०) देवावरील त्यांच्या प्रेमामुळे प्रवृत्त होऊन त्यांनी यहोवाची “प्रतीती” पाहण्याचे ठरवले. आणि ते अशा देशात गेले जेथे राज्य प्रचारकांची जास्त गरज आहे. यहोवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी त्यांचा वेळ, शक्‍ती आणि त्यांची साधने स्वेच्छेने वाहून घेतली.

आपल्या नवीन नेमणुकीत आल्यावर स्वेच्छेने काम करणारे हे तरुण स्वतःच्या डोळ्यांनी पाहतात, की “पीक फार आहे खरे, पण कामकरी थोडे आहेत.” (मत्त. ९:३७) उदाहरणार्थ, जर्मनीच्या याक्लीन नावाच्या तरुणीने एक्वाडॉरमधील शाखा कार्यालयाला उत्साहाने असे लिहिले: “मी एक्वाडॉरमध्ये गेल्या दोन वर्षांपेक्षा जास्त काळापासून सेवा करत आहे, आणि मी सध्या १३ बायबल अभ्यास चालवत आहे, ज्यांपैकी ४ बायबल विद्यार्थी नियमितपणे सभांना उपस्थित राहतात. ही अत्यानंदाची गोष्ट नाही का?” कॅनडाची शॅन्टेल सांगते: “२००८ मध्ये मी एक्वाडॉरच्या समुद्रकिनाऱ्‍यालगत असलेल्या एका भागात सेवा करायला गेले, जिथं केवळ एकच मंडळी होती. आता त्या भागात तीन मंडळ्या असून ३० पेक्षा जास्त पायनियर आहेत. इतके सारे नवे लोक प्रगती करत आहेत हे पाहून किती आनंद होतो!” ती पुढे म्हणते: “मी अलीकडेच अँडीज पर्वतरांगांमध्ये ९,००० फुट (२,७४३ मी) उंचावर वसलेल्या एका शहरात सेवा करायला आले आहे. या शहराची लोकसंख्या ७५,००० पेक्षा जास्त असून इथं केवळ एकच मंडळी आहे. हे क्षेत्र खूप फलदायक आहे. मी माझ्या सेवेत खूप आनंद अनुभवत आहे.”

आव्हाने

साहजिकच, परदेशात किंवा इतर ठिकाणी जाऊन सेवा करताना काही खास आव्हानांचा सामना करावा लागतो. काहींना, तर परदेशात जाऊन सेवा करण्याआधीच अडथळ्यांचा सामना करावा लागला. अमेरिकेची केयला म्हणते: “माझ्या मंडळीतील काही हितचिंतक बंधुभगिनींच्या नकारात्मक प्रतिक्रियेमुळं मला निराश वाटलं. मी परदेशात जाऊन पायनियर सेवा का करू इच्छिते हे त्यांना कळत नव्हतं. काही वेळा मी असा विचार करायचे, ‘मी योग्य निर्णय घेत आहे का?’” असे असूनही, केयलाने परदेशात जाऊन सेवा करण्याचा निर्णय घेतला. ती म्हणते: “यहोवाला अनेकदा प्रार्थना केल्यामुळं व प्रौढ बंधुभगिनींसोबत केलेल्या दीर्घ संभाषणांमुळं मला हे पाहण्यास मदत मिळाली की जे स्वेच्छेनं यहोवाची सेवा करतात त्यांना तो आशीर्वाद देतो.”

बऱ्‍याच जणांसमोर नवीन भाषा शिकणे हा एक अडथळा असतो. आयर्लंडची शेबन आठवून सांगते: “स्वतःच्या भावना व्यक्‍त करू शकत नसल्यामुळं मला वाईट वाटायचं. मला धीर धरण्यास, मेहनतीनं नवीन भाषेचा अभ्यास करण्यास आणि स्वतःच्या चुकांवर हसण्यास शिकावं लागलं.” एस्टोनियाची ॲना म्हणते: “उष्णप्रदेशातील गरमी, धूळ, आणि अंघोळीसाठी गरम पाण्याचा अभाव या आव्हानांपेक्षा स्पॅनिश भाषा शिकण्याचं आव्हान जास्त कठीण होतं. कधीकधी मला प्रयत्नच सोडून द्यावा असं वाटायचं. पण, मला माझ्या चुकांवर नव्हे, तर माझ्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करण्यास शिकावं लागलं.”

आणखी एक आव्हान म्हणजे घरची आठवण येणे. अमेरिकेचा जॉनथन म्हणतो: “इथं आल्याच्या थोड्याच काळानंतर मला माझ्या कुटुंबाची व मित्रांची आठवण येत असल्यामुळं मी निराश झालो. पण, वैयक्‍तिक बायबल अभ्यासावर व सेवाकार्यावर लक्ष केंद्रित केल्यामुळं मला माझ्या भावनांवर मात करता आली. क्षेत्रात येणाऱ्‍या रोमांचक अनुभवांमुळं व मंडळीतील बंधुभगिनींशी मैत्री केल्यामुळं, मी माझा गमावलेला आनंद लवकरच पुन्हा मिळवला.”

शिवाय, आणखी एक आव्हान आहे राहणीमानाचे. तुम्हाला ज्या राहणीमानाची सवय आहे तसे राहणीमान नवीन ठिकाणी कदाचित नसेल. कॅनडाचा बो सांगतो: “तुम्ही आपल्या देशात, चोवीस तास वीज व पाणी या गोष्टींना जास्त महत्त्व देत नाही. पण, इथं मात्र या गोष्टी कधी येतील आणि कधी जातील याचा काही नेम नाही.” अनेक विकसनशील देशांत गरीबी, आरामदायक वाहतुकीचा अभाव, आणि निरक्षरता या गोष्टी सर्वसामान्य आहेत. ऑस्ट्रियाची ईनेस स्थानिक लोकांच्या चांगल्या गुणांवर आपले लक्ष केंद्रित करण्याद्वारे अशा परिस्थितींवर मात करते. ती म्हणते: “हे लोक खूप आतिथ्यशील, सभ्य, साहाय्य करणारे व नम्र आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवाविषयी आणखी जास्त शिकून घेण्यास ते खूप उत्सुक आहेत.”

“जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद”

एक्वाडॉरमध्ये सेवा करत असलेल्या या सर्व तरुणांनी काही त्याग केले असले, तरी यहोवा त्यांच्या “मागण्या किंवा कल्पना ह्‍यांपलीकडे . . . अधिक्याने” पुरवतो हे त्यांनी अनुभवले आहे. (इफिस. ३:२०) होय, “जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद” आपल्याला मिळाला आहे अशी त्यांची भावना आहे. (मला. ३:१०) ते त्यांच्या सेवेबद्दल काय म्हणतात ते पाहू या:

ब्रूनो: “एक्वाडॉरमधील मनाला भुरळ घालणाऱ्‍या ॲमेझॉनच्या भागात मी माझ्या सेवेची सुरुवात केली. नंतर, मी एक्वाडॉरमधील शाखा कार्यालयाच्या विस्तार कार्यात मदत केली. आता मी बेथेलमध्ये सेवा करत आहे. इटलीत असताना मी यहोवाच्या सेवेला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला होता, आणि यहोवाच्या सेवेतील वेगवेगळ्या व रोमांचक पैलूंत भाग घेण्याची माझी इच्छा होती. यहोवा आज माझी ती इच्छा खरोखर पूर्ण करत आहे.”

बो: “एक्वाडॉरमध्ये मी माझा पूर्ण वेळ, आध्यात्मिक कार्य करण्यात खर्च करू शकत असल्यामुळं, यहोवासोबतची माझी मैत्री आणखी घट्ट झाली आहे. मला नेहमीच प्रेक्षणीय ठिकाणांना जाण्याची इच्छा असायची. तो आशीर्वादही आता मला लाभला आहे.”

ॲना: “माझ्यासारख्या अविवाहित बहिणीलाही एका मिशनरीप्रमाणे जीवनाचा आनंद घेता येऊ शकेल असा विचारदेखील मी केला नव्हता. पण आता मला कळलं आहे की ते शक्य आहे. यहोवाच्या आशीर्वादामुळं शिष्य बनवण्यात, राज्य सभागृहांचे बांधकाम करण्यात व नवीन मित्रमैत्रिणी बनवण्यात मी खूप आनंद अनुभवत आहे.”

एल्का: “मी आपल्या देशात, ऑस्ट्रियात असताना, निदान एकतरी बायबल अभ्यास मिळावा अशी सतत यहोवाला प्रार्थना करायचे. इथं मी १५ बायबल अभ्यास चालवते! प्रगती करणाऱ्‍या बायबल विद्यार्थ्यांचा आनंद पाहून मला अतोनात समाधान वाटतं.”

जोएल: “नवीन ठिकाणी जाऊन यहोवाची सेवा करणं हा एक वेगळाच अनुभव आहे. तुम्ही यहोवावर आणखी जास्त अवलंबून राहायला शिकता, आणि तुमच्या प्रयत्नांवर यहोवा आशीर्वाद देत असल्याचं पाहून तुम्हाला खूप आनंद होतो. मी अमेरिकेहून इथं आलो. मी ज्या गटासोबत सेवा करत आहे त्या गटात सुरुवातीला केवळ ६ प्रचारक होते. पण पहिल्याच वर्षी या गटातील प्रचारकांची संख्या वाढून २१ झाली आहे. स्मारक विधीला ११० जण उपस्थित होते.”

तुमच्याबद्दल काय?

तरुण बंधुभगिनींनो, राज्य प्रचारकांची जास्त गरज असलेल्या एखाद्या देशात किंवा तुमच्याच देशातील एखाद्या ठिकाणी जाऊन सेवा करण्यास तुमची परिस्थिती तुम्हाला अनुमती देते का? अर्थातच, असा मोठा निर्णय घेण्यासाठी विचारपूर्वक योजना करणे गरजेचे आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, असा निर्णय घेण्यासाठी यहोवावर व शेजाऱ्‍यांवर गहिरे प्रेम असणे अत्यावश्‍यक आहे. अशा प्रकारचे प्रेम तुमच्यात असेल व तुमची परिस्थिती तुम्हाला अनुमती देत असेल, तर दुसऱ्‍या देशात किंवा दुसऱ्‍या ठिकाणी जाऊन सेवा करण्याविषयी यहोवाला कळकळीने प्रार्थना करा. तसेच, तुमच्या या इच्छेविषयी तुमच्या ख्रिस्ती पालकांशी व मंडळीतील वडिलांशी बोला. यावरून तुम्ही कदाचित या निष्कर्षावर पोहचाल, की पवित्र सेवेच्या या रोमांचक व समाधानदायक पैलूत तुम्हीसुद्धा सहभाग घेऊ शकता.

[३ पानांवरील संक्षिप्त आशय]

“यहोवाला अनेकदा प्रार्थना केल्यामुळं व प्रौढ बंधुभगिनींसोबत केलेल्या दीर्घ संभाषणांमुळं मला हे पाहण्यास मदत मिळाली की जे स्वेच्छेनं यहोवाची सेवा करतात त्यांना तो आशीर्वाद देतो.” —अमेरिकेची केयला

[६ पानांवरील चौकट/चित्र]

दुसऱ्‍या देशात किंवा दुसऱ्‍या ठिकाणी जाऊन सेवा करण्यासाठी पूर्वतयारी

• वैयक्‍तिक बायबल अभ्यासाची सवय लावा

ऑगस्ट २०११ आमची राज्य सेवा, पृष्ठे ४-६ वरील माहितीची उजळणी करा

• ज्यांनी दुसऱ्‍या देशात किंवा दुसऱ्‍या ठिकाणी जाऊन सेवा केली आहे त्यांच्याशी बोला

• तेथील संस्कृतीविषयी व इतिहासाविषयी माहिती गोळा करा

• तेथे बोलली जाणारी भाषा शिकण्यासाठी एखादा कोर्स करा

[६ पानांवरील चौकट/चित्र]

दुसऱ्‍या देशात किंवा दुसऱ्‍या ठिकाणी सेवा करणारे काही जण आपला खर्च असा चालवतात

• वर्षातून काही महिने स्वतःच्या देशात नोकरी करतात

• आपले घर, अपार्टमेंट, किंवा आपला व्यवसाय भाड्याने देतात

• इंटरनेटवरून काम करतात

[४, ५ पानांवरील चित्रे]

१ जर्मनीची याक्लीन

२ इटलीचा ब्रूनो

३ कॅनडाचा बो

४ आयर्लंडची शेबन

५ अमेरिकेचा जोएल

६ अमेरिकेचा जॉनथन

७ एस्टोनियाची ॲना

८ ऑस्ट्रियाची एल्का

९ कॅनडाची शॅन्टेल

१० ऑस्ट्रियाची ईनेस