व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवाने ‘त्यांच्यावर आपला मुखप्रकाश पाडला आहे’

यहोवाने ‘त्यांच्यावर आपला मुखप्रकाश पाडला आहे’

यहोवाने ‘त्यांच्यावर आपला मुखप्रकाश पाडला आहे’

माणसाच्या चेहऱ्‍यात ३० पेक्षा अधिक स्नायू असतात. साधे स्मितहास्य करण्यासाठीही यांपैकी १४ स्नायूंचा समन्वय जमावा लागतो. तुमच्या चेहऱ्‍यामध्ये हे स्नायू नसते तर तुमची संभाषणे अगदीच निर्जीव, भावनाहीन वाटली असती, नाही का? पण, कर्णबधिरांच्या बाबतीत पाहिल्यास, चेहऱ्‍यावरील स्नायू हे संभाषणात सजीवता आणण्यापलीकडे बरेच काही करतात. चेहऱ्‍यावरील स्नायूंच्या हालचालींसोबतच इतर शारीरिक हालचालींच्या साहाय्याने ते आपले विचार व कल्पना इतरांना कळवू शकतात. संकेत भाषेच्या साहाय्याने अगदी गुंतागुंतीचे, क्लिष्ट विचार देखील बारीकसारीक तपशिलांसह कसे व्यक्‍त केले जाऊ शकतात याचे अनेकांना नवल वाटते.

अलीकडच्या काळात सबंध जगातील असंख्य कर्णबधिरांना कोणत्याही मनुष्याच्या चेहऱ्‍यापेक्षा जास्त बोलका व मनोहर असा चेहरा पाहणे शक्य झाले आहे. लाक्षणिक अर्थाने, त्यांना ‘प्रभू [यहोवाच्या] मुखाचे’ दर्शन घडले आहे. (विलाप. २:१९, पं.र.भा.) पण हे काही अचानक घडले नाही. फार पूर्वीपासूनच यहोवाने कर्णबधिरांप्रती नितान्त प्रेम व्यक्‍त केले आहे. प्राचीन काळातील इस्राएल राष्ट्रातही त्याने कर्णबधिरांबद्दल प्रेम व आपुलकी व्यक्‍त केली होती. (लेवी. १९:१४) आधुनिक काळातही, त्यांच्याबद्दल यहोवाला वाटणारे प्रेम स्पष्टपणे दिसून आले आहे. “[देवाची] अशी इच्छा आहे की, सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहचावे.” (१ तीम. २:४) देवाविषयीचे परिपूर्ण ज्ञान घेतल्यामुळे या कर्णबधिरांपैकी कित्येकांनी जणू देवाचे मुख पाहिले आहे. पण एक शब्दही ऐकू न येणाऱ्‍या या लोकांना देवाविषयीचे ज्ञान आत्मसात करणे कसे काय शक्य झाले आहे? या प्रश्‍नाचे उत्तर देण्याअगोदर, कर्णबधिरांसाठी संकेत भाषा इतकी महत्त्वाची का आहे याविषयी पाहू या.

पाहणे म्हणजेच ऐकणे

कर्णबधिरांच्या व संकेत भाषेच्या संबंधात लोकांच्या मनात अनेक गैरसमजुती आहेत. त्यांपैकी काही गैरसमजुती दूर करू या. कर्णबधिर व्यक्‍तीही वाहने चालवू शकतात. फक्‍त ओठांची हालचाल पाहून अर्थ समजून घेणे त्यांना अतिशय कठीण जाते. संकेत भाषा व ब्रेल या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, त्यांच्यात कोणतेही साम्य नाही. संकेत भाषा म्हणजे फक्‍त मूकाभिनय नाही. जगातल्या कोणत्याही भागात, सर्व कर्णबधिरांना समजेल अशी एक सर्वसामान्य संकेत भाषा अस्तित्वात नाही. शिवाय, निरनिराळ्या भागांतील कर्णबधिरांच्या संकेत भाषेत त्या त्या भागानुसार काही वैशिष्ट्ये आढळतात.

कर्णबधिरांना वाचता येते का? काहींना चांगल्या प्रकारे वाचता येत असले, तरी वस्तुस्थिती अशी आहे की त्यांच्यापैकी बहुतेकांना वाचन करणे खूप कठीण जाते. का? कारण कागदावर जे छापले जाते ते मुळात बोलल्या जाणाऱ्‍या भाषेचेच रूप असते. ऐकण्याची क्षमता असणारे मूल भाषा कसे शिकते याचा विचार करा. जन्म झाल्यापासूनच मुलाच्या अवतीभवती त्याची मातृभाषा बोलणाऱ्‍या लोकांचा वावर असतो. त्यामुळे, काही काळातच मूल शब्द एकमेकांना जोडून संपूर्ण वाक्ये तयार करायला शिकते. केवळ ऐकून ऐकून त्याला हे अगदी सहजासहजी जमते. त्याअर्थी, ऐकण्याची क्षमता असणारे मूल वाचायला शिकते, तेव्हा कागदावरची काळी अक्षरे ही आपल्याला आधीच माहीत असलेल्या स्वरांशी व शब्दांशी जुळतात एवढेच त्याला शिकावे लागते.

आता तुम्ही एखाद्या परक्या देशात, बाहेरचे आवाज आत येऊ शकत नाहीत अशा काचेच्या खोलीत आहात अशी कल्पना करून बघा. त्या विशिष्ट देशात बोलली जाणारी भाषा तुम्ही कधीच ऐकलेली नाही. दररोज तेथील लोक तुमच्याकडे येऊन काचेतून तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांचे बोलणे तुम्हाला ऐकू येत नाही. तुम्हाला फक्‍त त्यांच्या ओठांची हालचाल दिसते. तुम्हाला त्यांचे बोलणे समजत नाही हे पाहून, तेच शब्द ते कागदावर लिहून काचेतून तुम्हाला दाखवतात. आता मात्र तुम्हाला नक्कीच समजेल असे त्यांना वाटते. तुम्हाला काय वाटते, त्यांनी लिहिलेले तुम्हाला समजेल का? अशा प्रकारच्या परिस्थितीत त्या लोकांशी संवाद साधणे तुमच्यासाठी जवळजवळ अशक्यच असेल. का? कारण कागदावर लिहिलेले शब्द हे तुम्ही आयुष्यात कधीच न ऐकलेल्या भाषेत आहेत. वाचण्याच्या बाबतीत बहुतेक कर्णबधिरांची अगदी अशीच स्थिती असते.

संकेत भाषा ही कर्णबधिरांसाठी संवाद साधण्याचे सर्वोत्तम माध्यम आहे. या भाषेत बोलताना कर्णबधिर व्यक्‍ती आपल्या शरीराच्या आसपासच्या जागेत विशिष्ट हालचाली करून निरनिराळ्या संकल्पना व्यक्‍त करते. तिच्या या हालचाली व तिच्या चेहऱ्‍यावरील हावभाव हे संकेत भाषेतील व्याकरणाच्या नियमांवर आधारित असतात. अशा रीतीने, समोरची व्यक्‍ती डोळ्यांनी पाहून समजून घेऊ शकेल अशी एक दृश्‍य भाषा व्यक्‍त होते.

खरेतर संकेत भाषेत बोलणाऱ्‍या कर्णबधिर व्यक्‍तीच्या हाताच्या, शरीराच्या व चेहऱ्‍याच्या प्रत्येक हालचालीचा एक विशिष्ट अर्थ असतो. चेहऱ्‍यावरील हावभाव हे फक्‍त पाहणाऱ्‍यांना प्रभावित करण्यासाठी आणले जात नाहीत. तर, हे हावभाव संकेत भाषेच्या व्याकरणाचा अविभाज्य भाग आहेत. उदाहरणार्थ: उत्तराची अपेक्षा नसलेला किंवा हो अथवा नाही असे उत्तर अपेक्षित असलेला प्रश्‍न भुवया उंचावून विचारला जातो. तर कोण?, काय?, कोठे?, केव्हा?, का? किंवा कसे? या प्रकारचे प्रश्‍न भुवया खाली करून विचारले जाऊ शकतात. तोंडाची विशिष्ट हालचाल करून एखाद्या वस्तूचा आकार किंवा एखाद्या कृतीची तीव्रता दाखवता येते. एखादा कर्णबधिर ज्या प्रकारे आपले डोके हलवतो, खांदे उडवतो, गालांची हालचाल करतो व डोळ्यांची उघडझाप करतो त्या सर्वांवरून, कळवल्या जात असलेल्या विचारातील सूक्ष्म अर्थछटा समोरच्या व्यक्‍तीपर्यंत पोचतात.

या सर्व हालचाली व हावभावांचा समावेश असलेली संकेत भाषा समोरच्या व्यक्‍तीला एक नेत्रसुखद अनुभव देऊन जाते. भावभावनांनी अत्यंत समृद्ध अशी ही भाषा अवगत असलेल्या कर्णबधिरांना कोणताही विचार—मग तो काव्यात्मक असो वा तांत्रिक, प्रणय भावनांसंबंधी असो वा विनोदी, वास्तविक असो वा काल्पनिक—अगदी स्पष्टपणे व्यक्‍त करता येतो.

संकेत भाषेतील प्रकाशनांचे योगदान

यहोवाबद्दलचे ज्ञान संकेत भाषेत दृश्‍य माध्यमात सादर केले जाते तेव्हा कर्णबधिर व्यक्‍ती जणू तो संदेश ऐकून, या संदेशाचा स्रोत असलेल्या यहोवा देवावर ‘विश्‍वास ठेवू’ शकते. म्हणूनच, यहोवाचे साक्षीदार जगभरातील कर्णबधिरांपर्यंत सुवार्ता पोचवण्यास व त्यांच्या लाभाकरता साहित्य पुरवण्यास अतिशय प्रयत्नशील आहेत. (रोम. १०:१४) सध्या, सबंध जगात संकेत भाषेचे ५८ भाषांतर गट कार्यरत आहेत आणि संकेत भाषेची डीव्हीडीवरील प्रकाशने आता ४० संकेत भाषांतून उपलब्ध आहेत. या सगळ्याचा कितपत फायदा झाला आहे?

जेरेमी ज्याचे आईवडील दोघेही कर्णबधिर आहेत तो म्हणतो: “मला आठवतं, बाबा आपल्या बेडरूममध्ये बसून टेहळणी बुरूज नियतकालिकातील दोन तीनच परिच्छेदांचा अर्थ समजून घेण्यासाठी कधीकधी तासनतास वाचत बसायचे. एकदा असंच वाचत असताना ते अचानक, ‘समजलं! समजलं!’ अशी खूण करत मोठ्या उत्साहानं खोलीतून बाहेर आले. मग त्यांनी त्या परिच्छेदांचा अर्थ मला समजावून सांगितला. त्यावेळी मी फक्‍त १२ वर्षांचा होतो. मी एकदा त्या परिच्छेदांवरून नजर फिरवली आणि बाबांना संकेत भाषेत म्हणालो: ‘बाबा, मला नाही वाटत या परिच्छेदांचा असा अर्थ आहे. यात खरं तर असं सांगितलंय . . . ’ पण त्यांनी मला मध्येच थांबवलं आणि परिच्छेदांचा अर्थ समजून घेण्यासाठी परत खोलीत गेले. त्याक्षणी त्यांच्या चेहऱ्‍यावर मला दिसलेली निराशा आणि त्यांना खोलीत परत जाताना पाहून मला त्यांचा वाटलेला अभिमान मी कधीही विसरू शकणार नाही. पण, आता संकेत भाषेची डीव्हीडीवरील प्रकाशने उपलब्ध झाल्यामुळे त्यांना साहित्य अधिक चांगल्या प्रकारे समजून घेणं शक्य झालं आहे. कधीकधी यहोवाबद्दल ते आपल्या भावना व्यक्‍त करतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्‍यावर एक वेगळाच आनंद झळकतो. मला त्यांचा हा आनंद पाहून खूप समाधान वाटतं.”

चिली देशात राहणाऱ्‍या हेसेन्या या कर्णबधीर मुलीशी बोललेल्या एका साक्षीदार जोडप्याचाही अनुभव विचारात घ्या. तिच्या आईकडून परवानगी घेतल्यावर त्यांनी हेसेन्याला चिलियन संकेत भाषेत डीव्हीडीवरील बायबल कथांचं माझं पुस्तक दाखवले. ते सांगतात: “हेसेन्या ती कथा पाहू लागली तेव्हा आधी ती हसू लागली आणि मग अचानक तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. तिच्या आईनं तिला रडण्याचं कारण विचारलं तेव्हा, डीव्हीडीवरील गोष्ट मला खूप आवडल्यामुळं मी रडतेय असं तिनं आपल्या आईला सांगितलं. तेव्हा तिच्या आईला जाणीव झाली की हेसेन्याला डीव्हीडीवर दाखवलेलं सर्व अगदी पूर्णपणे समजत आहे.”

व्हेनिझुएलाच्या ग्रामीण भागात राहणाऱ्‍या एका कर्णबधीर स्त्रीला एक मूल होते आणि दुसरे मूल येण्याच्या मार्गावर होते. पण आर्थिक परिस्थितीमुळे आणखी एका मुलाला वाढवणे आपल्याला शक्य होणार नाही असे तिला व तिच्या पतीला वाटत असल्याने ते गर्भपात करवून घेण्याच्या विचारात होते. अशातच यहोवाचे साक्षीदार त्यांच्या घरी आले. त्यांना अर्थातच या सर्व गोष्टींची काहीच कल्पना नव्हती. त्यांनी या जोडप्याला व्हेनिझुएलन संकेत भाषेतील देव आपल्याकडून काय अपेक्षितो? या डीव्हीडीतून १२ वा पाठ दाखवला. या पाठात गर्भपात व मानवहत्या याबाबत देवाच्या दृष्टिकोनाविषयी सांगितलेले आहे. नंतर त्या कर्णबधिर स्त्रीने या पाठाचा अभ्यास केल्याबद्दल आपण किती आभारी आहोत हे साक्षीदारांना सांगितले. तिने सांगितले की या पाठातील माहितीमुळेच त्यांनी गर्भपात न करण्याचा निर्णय घेतला. अशा प्रकारे, डीव्हीडीवरील संकेत भाषेच्या एका प्रकाशनामुळे एक जीव वाचला!

लरेन नावाची एक कर्णबधिर साक्षीदार सांगते: “बायबलविषयी शिकून घेणं मला एखादं चित्रकोडं सोडवण्यासारखं वाटतं. पूर्वी सर्व गोष्टींचा नीट बोध होत नसल्यामुळं जणू या चित्रकोड्यातल्या बऱ्‍याच जागा रिकाम्या होत्या. पण, आता मात्र बायबलमधील सत्य संकेत भाषेत उपलब्ध होऊ लागल्यामुळं या रिकाम्या जागा भरून संपूर्ण चित्र स्पष्ट झालं आहे.” कर्णबधिर असलेले व ३८ वर्षांपासून साक्षीदार असलेले जॉर्ज म्हणतात: “एखादी गोष्ट स्वतःहून समजून घेता आल्यामुळं तुमचा आत्मसन्मान व आत्मविश्‍वास वाढतो यात काहीच शंका नाही. माझ्या स्वतःच्या आध्यात्मिक प्रगतीचं विचाराल, तर त्याचं पूर्ण श्रेय मी संकेत भाषेतील डीव्हीडींना देतो.”

“माझ्या स्वतःच्या भाषेत सभा!”

संकेत भाषेतील प्रकाशनांसोबतच यहोवाच्या साक्षीदारांनी अशा मंडळ्याही स्थापन केल्या आहेत, जेथे ख्रिस्ती सभा संपूर्णतः संकेत भाषेतून चालवल्या जातात. सध्या जगाच्या पाठीवर अशा १,१०० संकेत भाषेच्या मंडळ्या आहेत. संकेत भाषेतील सभांमध्ये कर्णबधिरांना त्यांच्याच भाषेतून शिकवले जाते. कर्णबधिर व्यक्‍ती ज्या पद्धतीने विचार करतात त्या पद्धतीने व त्यांच्या विचारांबद्दल व भावनांबद्दल आदर दाखवून बायबलची सत्ये सादर केली जातात.

संकेत भाषेच्या मंडळ्या स्थापन केल्यामुळे काही फायदा झाला आहे का? सिरिल ज्यांचा १९५५ साली यहोवाचा साक्षीदार म्हणून बाप्तिस्मा झाला होता, त्यांचा अनुभव पाहा. अनेक वर्षांपर्यंत त्यांनी छापील प्रकाशनांचा जमेल तसा अभ्यास केला आणि ते प्रामाणिकपणे ख्रिस्ती सभांनाही गेले. संकेत भाषेत अनुवाद करून सांगणारे कधी असायचे तर कधी नसायचे. नसल्यास, त्यांना इतर साक्षीदारांवर विसंबून राहावे लागे, जे व्यासपीठावरून सांगितलेली माहिती कागदावर लिहून प्रेमळपणे त्यांना मदत करत. शेवटी, १९८९ साली, म्हणजे ते साक्षीदार बनल्यापासून ३४ वर्षे उलटल्यावर अमेरिकेतील न्यूयॉर्क सिटी येथे पहिली संकेत भाषिक मंडळी सुरू करण्यात आली. या मंडळीचे सदस्य असलेल्या सिरिलना कसे वाटले? ते म्हणतात, “एखाद्या घनदाट जंगलातून किंवा अंधाऱ्‍या बोगद्यातून लख्ख प्रकाशात आल्यासारखं वाटलं. माझ्या स्वतःच्या भाषेत सभा होतेय यावर विश्‍वासच बसत नव्हता!”

यहोवाच्या साक्षीदारांच्या संकेत भाषिक मंडळ्यांमध्ये कर्णबधिर लोक देवाबद्दल शिकून घेण्यासाठी व त्याची उपासना करण्यासाठी नियमितपणे एकत्र येऊ शकतात. या मंडळ्यांमध्ये देवाच्या लोकांना एकमेकांचा भावनिक आधार मिळू शकतो. कर्णबधिरांना इतरांशी संवाद साधणे शक्य नसल्यामुळे सहसा ते समाजात एकटे पडतात. पण संकेत भाषिक मंडळ्यांमध्ये त्यांना समजून घेणाऱ्‍या लोकांचा सहवास लाभतो. अशा वातावरणात, ते शिकू शकतात, प्रगती करू शकतात आणि यहोवाची अधिकाधिक सेवा करू शकतात. कित्येक कर्णबधिर साक्षीदारांना पूर्ण वेळचे सुवार्तिक म्हणून सेवा करणे शक्य झाले आहे. त्यांच्यापैकी काहींनी कर्णबधिरांना यहोवाविषयी शिकून घेण्यास मदत करण्यासाठी इतर देशांत स्थलांतर केले आहे. कर्णबधिर असलेले ख्रिस्ती पुरुष मंडळीत परिणामकारक रीत्या शिकवायला, सुनियोजित पद्धतीने कार्य करायला व कळपाचे पालन करायला शिकतात आणि मग त्यांच्यापैकी बरेच जण मंडळीत जबाबदारीच्या पदांवर कार्य करण्यास पात्र ठरतात.

अमेरिकेत १०० पेक्षा अधिक संकेत भाषिक मंडळ्या आणि जवळजवळ ८० गट आहेत. ब्राझीलमध्ये सुमारे ३०० संकेत भाषिक मंडळ्या आणि ४०० हून अधिक गट आहेत. मेक्सिकोत संकेत भाषिक मंडळ्यांची संख्या ३०० च्या आसपास आहे. रशियात ३० पेक्षा जास्त संकेत भाषिक मंडळ्या व ११३ गट आहेत. सबंध जगात संकेत भाषेच्या क्षेत्रात होत असलेल्या वाढीची ही केवळ काही उदाहरणे आहेत.

यहोवाचे साक्षीदार संकेत भाषेत संमेलने व अधिवेशनेही आयोजित करतात. मागच्या वर्षी, जगभरात निरनिराळ्या संकेत भाषांतून १२० अधिवेशने संपन्‍न झाली. ही अधिवेशने कर्णबधिर साक्षीदारांना जाणीव करून देतात की ते जगभरातील ख्रिस्ती बंधुसमाजाचा भाग आहेत व इतर बांधवांना यथाकाळी मिळते तेच आध्यात्मिक अन्‍न त्यांना देखील पुरवले जाते.

लेनर्ड हे कर्णबधिर असून २५ पेक्षा जास्त वर्षांपासून यहोवाचे साक्षीदार आहेत. ते सांगतात: “यहोवा हाच खरा देव आहे हे मला माहीत होतं. पण, त्यानं जगात इतकी दुष्टाई का राहू दिलीय हे मला कधीच स्पष्टपणे समजलं नव्हतं. कधीकधी मला याबद्दल त्याचा रागही यायचा. पण एका संकेत भाषेतील प्रांतीय अधिवेशनात एका विशिष्ट भाषणात मला या विषयांचा अगदी स्पष्टपणे उलगडा झाला. भाषण संपल्यावर माझ्या पत्नीनं मला विचारलं, ‘तुमच्या शंका दूर झाल्या का?’ तेव्हा मी अगदी प्रामाणिकपणे हो असं उत्तर देऊ शकलो! मी कधीही यहोवाला सोडून गेलो नाही याचं आज २५ वर्षांनंतर मला मनापासून समाधान वाटतं. माझं आधीपासूनच त्याच्यावर प्रेम होतं, इतकंच की मी त्याला पूर्णपणे ओळखलं नव्हतं. आज मात्र मला त्याची खऱ्‍या अर्थानं ओळख घडली आहे!”

मनापासून आभारी

यहोवाविषयी शिकायला मिळाल्यामुळे कर्णबधिरांना त्याच्या मुखावर कोणकोणते “भाव” पाहणे शक्य झाले आहे? प्रेम, करुणा, न्याय, एकनिष्ठा, दया आणि आणखी कितीतरी.

यहोवाबद्दलचे ज्ञान मिळाल्यामुळे सबंध जगातील कर्णबधिर साक्षीदार आज जणू यहोवाचे मुख पाहत आहेत आणि पुढेही या अर्थाने त्याचे मुख अधिक स्पष्टपणे पाहणे त्यांना शक्य होईल. त्यांच्याबद्दल मनस्वी प्रेम असल्यामुळे यहोवाने ‘त्यांच्यावर आपला मुखप्रकाश पाडला’ आहे. (गण. ६:२५) यहोवाची ओळख घडल्याबद्दल त्याचे हे कर्णबधिर सेवक त्याचे खरोखर मनापासून आभारी आहेत!

[२४, २५ पानांवरील चित्रे]

सबंध जगात १,१०० पेक्षा जास्त संकेत भाषिक मंडळ्या आहेत

[२६ पानांवरील चित्रे]

कर्णबधिरांवर यहोवाने आपला तेजस्वी मुखप्रकाश पाडला आहे