व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“हे परमेश्‍वरा, तुझी कृत्ये किती विविध आहेत!”

“हे परमेश्‍वरा, तुझी कृत्ये किती विविध आहेत!”

यहोवाच्या निर्मितीतील शोभा

“हे परमेश्‍वरा, तुझी कृत्ये किती विविध आहेत!”

आपण शहरात राहत असू किंवा खेड्यात, उंच डोंगरांवर राहत असू किंवा सुमद्र किनाऱ्‍यावर, आपण भयप्रेरक सृष्टीसौंदर्याने वेढलेलो आहोत. २००४ यहोवाच्या साक्षीदारांचे कॅलेंडर (इंग्रजी), यहोवा देवाच्या थक्क करणाऱ्‍या हस्तकलेच्या देखाव्याचे दर्शन घडवते.

कृतज्ञ मानवांनी नेहमी देवाच्या कृत्यांमध्ये आस्था दाखवली आहे. उदाहरणार्थ, शलमोन. त्याचे शहाणपण “सर्व पूर्वदेशनिवासी . . . यांच्याहून अधिक होते.” बायबल त्याच्याविषयी म्हणते: “त्याने लबानोनावरील देवदारूपासून तो भिंतीतून उगवणाऱ्‍या एजोब झाडापर्यंत सर्व उद्‌भिजांचे विवेचन केले; तसेच पशु, पक्षी, रांगणारे जंतु व मासे यांचेहि त्याने विवेचन केले.” (१ राजे ४:३०, ३३) शलमोनाचा पिता राजा दावीदही देवाच्या हस्तकृतींवर नेहमी मनन करायचा. आपल्या सृष्टीकर्त्याविषयी तो असे म्हणावयास प्रेरित झाला: “हे परमेश्‍वरा, तुझी कृत्ये किती विविध आहेत! ती सर्व तू सूज्ञतेने केली; तुझ्या समृद्धीने पृथ्वी भरलेली आहे.”—स्तोत्र १०४:२४. *

आपणही सृष्टीसौंदर्य न्याहाळून त्यावर मनन केले पाहिजे. उदाहरणार्थ, आपण “आपले डोळे वर करून” विचारू शकतो: “ह्‍यांना कोणी उत्पन्‍न केले?” जो “महासमर्थ” व “प्रबळ” आहे त्यानेच अर्थात यहोवा देवाने ह्‍यांना उत्पन्‍न केले आहे!—यशया ४०:२६.

यहोवाच्या निर्मिती कार्यांवर मनन केल्यामुळे आपल्यावर कोणता प्रभाव पडतो? तीन मार्गांनी आपल्यावर प्रभाव पडतो. निर्मिती कार्ये आपल्याला (१) आपल्या जीवनाची जोपासना करण्याची आठवण करून देतात, (२) सृष्टीतून शिकण्यास इतरांना मदत करण्यास प्रवृत्त करतात आणि (३) आपल्या निर्माणकर्त्याविषयी अधिक समज प्राप्त करण्यास व त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्‍त करण्यास आपल्याला प्रेरित करतात.

मानव या नात्याने आपले जीवन ‘निर्बुद्ध पशूंपेक्षा’ कैक पटीने श्रेष्ठ आहे; यामुळे आपण अद्‌भुत सृष्टी पाहू शकतो आणि त्याचे मूल्य समजू शकतो. (२ पेत्र २:१२) आपल्या डोळ्यांनी आपण सुखदायक देखावे पाहू शकतो. कानांनी पक्ष्यांचे मंजूळ गाणे ऐकू शकतो. काळ आणि ठिकाणाच्या जाणीवेमुळे आपल्या मनात घटना जणू काय कोरल्या जातात व या घटना नंतर गोड आठवणी होऊन जातात. आपले सद्य जीवन परिपूर्ण नसले तरीसुद्धा ते निरर्थक निश्‍चितच नाही!

आपल्या मुलांना सृष्टीबद्दल असलेले स्वाभाविक आकर्षण पाहून पालकांना आनंद वाटतो. समुद्र किनाऱ्‍यावरील वाळूतील शंखशिंपले शोधायला, एखाद्या प्राण्याला गोंजारायला किंवा झाडावर चढायला त्यांनी किती आवडते! पालकांनी आपल्या चिमुकल्यांना, सृष्टी आणि सृष्टीकर्त्यातील संबंध पाहण्यास मदत करावी. यहोवाच्या सृष्टीविषयी मुलांच्या मनात निर्माण झालेले भय आणि आदर हे आयुष्यभर राहू शकते.—स्तोत्र १११:२, १०.

आपण सृष्टीची प्रशंसा केली परंतु त्याचे श्रेय सृष्टीकर्त्याला दिले नाही तर आपण पायापुरते पाहणारे ठरू. यशयाची भविष्यवाणी आपल्याला याच मुद्द्‌यावर मनन करण्याचे उत्तेजन देत म्हणते: “तुला कळले नाही काय? तू ऐकले नाही काय? परमेश्‍वर हा सनातन देव, परमेश्‍वर, दिगंतापर्यंतच्या पृथ्वीचा उत्पन्‍नकर्ता, थकतभागत नाही; त्याची बुद्धि अगम्य आहे.”—यशया ४०:२८.

होय, यहोवाची कार्ये त्याच्या अद्वितीय बुद्धीचा, त्याच्या अतुलनीय शक्‍तीचा आणि आपल्याबद्दल त्याला असलेल्या गहिऱ्‍या प्रेमाचा पुरावा देतात. आपल्या सभोवार असलेले सृष्टीसौंदर्य आपण पाहतो आणि ज्याने ते निर्माण केले आहे त्याचे गुण आपल्याला समजतात तेव्हा आपणही दावीदाप्रमाणे असे म्हणण्यास प्रवृत्त होवो: “हे प्रभू, . . . तुझ्यासमान कोणी नाही, आणि तुझ्या कृत्यांसारखी कोणतीहि कृत्ये नाहीत.”—स्तोत्र ८६:८.

आज्ञाधारक मानवांना यहोवाची निर्मितीकार्ये पाहून नेहमीच अप्रूप वाटत राहील याची आपल्याला खात्री आहे. यहोवाविषयी आणखी शिकत राहण्याकरता आपल्याला चिरकालापर्यंत अनेक संधी मिळत राहतील. (उपदेशक ३:११) आणि आपण जितके सृष्टीकर्त्याविषयी शिकत राहू तितके त्याच्याबद्दलचे आपले प्रेम वाढत राहील.

[तळटीप]

^ परि. 4 २००४ यहोवाच्या साक्षीदारांचे कॅलेंडर (इंग्रजी) नोव्हेंबर/डिसेंबर पाहावे.

[९ पानांवरील चौकट]

निर्माणकर्त्याची स्तुती असो

अनेक कृतज्ञ शास्त्रज्ञ सृष्टीतील देवाची भूमिका कबूल करतात. पुढे काही उदाहरणांचा उल्लेख करण्यात आला आहे:

“मला जेव्हा कधीकधी एखाद्या नव्या गोष्टीचा शोध लागतो व मी स्वतःला, ‘अच्छा, देवाने हे असे बनवले आहे तर!’ असे म्हणतो तेव्हा विज्ञान शाखेचं महत्त्व मला समजतं आणि यांतून मला आनंद प्राप्त होतो. देवाच्या योजनेचा एक लहानसा भाग समजून घ्यायचं माझं ध्येय आहे.”—हेन्री शाफर, रसायनशास्त्राचे प्राध्यापक.

“विश्‍वाचा विस्तार का झाला या कारणाबाबत वाचकाने त्याला हवा तो निष्कर्ष काढावा, परंतु त्याच्याविना [देवाविना] आपली समज अधूरीच राहते.”—एड्‌वर्ड मिल्न, ब्रिटिश अंतरिक्षशास्त्रज्ञ.

“आपल्याला माहीत आहे, की निसर्गात सर्वात उत्तम प्रतीच्या गणितशास्त्राची उदाहरणे आहेत कारण देवाने ते निर्माण केले आहे.”—अलेक्झॅन्डर पोल्याकोव्ह, रशियन गणितज्ज्ञ.

“नैसर्गिक गोष्टींचा आपण अभ्यास करत असतो तेव्हा खरे पाहता आपण निर्माणकर्त्याच्या विचारांचा विचार करत असतो, त्याच्या धारणांशी आपण परिचित होत असतो आणि जी यंत्रणा आपली नव्हे तर त्याची आहे त्या यंत्रणेचा अर्थ लावत असतो.”—लुई अगासिझ, अमेरिकन जीवविज्ञान शास्त्रज्ञ.

[८, ९ पानांवरील चित्र]

जेन्टू पेंग्विन्स, अंटार्क्टिका पेनीनसुला

[९ पानांवरील चित्र]

ग्रॅण्ड टेटन नॅशनल पार्क, विओमींग, अमेरिका

[चित्राचे श्रेय]

Jack Hoehn/Index Stock Photography