व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मुलगी वयात येताना. . .

मुलगी वयात येताना. . .

मुलगी वयात येताना. . .

वयात येताना मानवशरीरात बरेच बदल घडतात. मुलींच्या बाबतीत पाहिल्यास, वयात येण्याच्या या प्रक्रियेतला एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे मासिकस्त्राव सुरू होणे, अर्थात “पाळी सुरू होणे.”

वयाने तशा अजून लहानच असलेल्या मुलींसाठी, पाळी सुरू होण्याचा काळ बराच तणावपूर्ण ठरू शकतो. कारण त्यांच्या मनात याविषयी बऱ्‍याच संमिश्र भावना असतात. वयात येताना होणाऱ्‍या इतर बदलांसारखाच हा प्रकारही काहीसा गोंधळात टाकणारा असतो. पहिल्यांदा मासिकस्त्राव होतो तेव्हा बऱ्‍याच जणी घाबरतात, आपल्याला काहीतरी भयंकर रोग झाला आहे असे काहींना वाटते. पाळीबद्दल उलटसुलट माहिती ऐकलेली असल्यामुळे आणि सहसा योग्य माहिती कोणीही दिलेली नसल्यामुळे असे घडते.

तुलनेत, ज्यांना आधीपासूनच माहिती देण्यात आलेली असते त्या मुली पहिल्या पाळीच्या वेळी इतक्या गोंधळून जात नाहीत. पण संशोधनावरून असे आढळले की बऱ्‍याच मुलींना पाळी सुरू होण्याआधी पुरेशी माहिती देण्यात आलेली नसते. एका सर्वेक्षणात, २३ वेगवेगळ्या देशांतल्या स्त्रियांनी भाग घेतला. यांपैकी जवळजवळ एक तृतीयांश स्त्रियांनी असे सांगितले की पाळी सुरू होण्याआधी त्यांना काहीही सांगण्यात आले नव्हते. त्यामुळे पहिल्यांदा मासिकस्त्राव झाला तेव्हा या मुलींना काय करावे हेच कळत नव्हते.

सर्वात नकारात्मक अनुभव सांगणाऱ्‍या स्त्रियांना मासिकस्त्रावाविषयी किंवा पाळीविषयी कोणत्याही प्रकारची माहिती नव्हती. एका अभ्यासात, पहिल्यांदा मासिकस्त्राव झाला तेव्हा कसे वाटले याचा अनुभव सांगताना, या स्त्रियांनी “खूप भीती वाटली,” आणि “लाज वाटली” अशाप्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्‍त केल्या.

रक्‍त पाहून सहसा कोणालाही भीती वाटते. काहीतरी दुखापत झाली किंवा जखम झाली तरच रक्‍त येते असा आपला ग्रह. म्हणूनच, जर योग्य स्पष्टीकरण दिले नाही किंवा पाळी येण्याआधीच मुलींच्या मनाची तयारी केली नाही तर, रूढ कल्पनांच्या किंवा चुकीच्या माहितीच्या आधारावर तसेच माहितीच्या अभावामुळे मुलींची अशी चुकीची समजूत होऊ शकते की, मासिकस्त्राव म्हणजे एकप्रकारचा आजार आहे, जखम आहे किंवा लाज वाटण्यासारखे काहीतरी आहे.

पाळी येणे ही एक सामान्य शरीर प्रक्रिया असून सुदृढ आरोग्य असलेल्या सर्व मुलींना ती येते हे तुमच्या मुलीला तुम्ही सांगितले पाहिजे. या संदर्भात तिच्या मनात असलेली भीती किंवा चिंता दूर करण्यास तुम्ही पालक या नात्याने बराच हातभार लावू शकता. तो कसा?

पालकांची भूमिका महत्त्वाची

मासिकस्त्रावाविषयीची माहिती तशी शिक्षक, आरोग्य कार्यकर्ते यांच्याकडून किंवा पुस्तके अथवा शैक्षणिक माहितीपटांतूनही मिळवता येते. बरेच आईवडील मान्य करतात की या माध्यमांतून पाळीशी संबंधित असलेली शास्त्रीय माहिती तसेच मासिकस्त्राव होताना कोणते स्वच्छतेचे नियम पाळले पाहिजेत याविषयी बरीच उपयुक्‍त माहिती मिळवता येते. तरीपण मुलींच्या मनात आणखीही बरेच प्रश्‍न किंवा शंका असतात ज्यांचे समाधान या माध्यमांकडून होऊ शकत नाही. पाळी सुरू झाल्यावर काय करायचे हे त्यांना माहीत असले तरी ज्या निरनिराळ्या भावभावनांचा मासिकस्त्रावाशी संबंध जोडला जातो त्यांना कसे तोंड द्यायचे हे त्यांना नेमके माहीत नसते.

आजी, मोठी बहीण आणि विशेषतः आई, ही अतिरिक्‍त माहिती आणि आवश्‍यक भावनिक आधार मुलींना पुरवू शकते. बहुतेक मुली पाळीबद्दल मनात असलेले प्रश्‍न आणि शंका आईलाच विचारतात.

वडिलांबद्दल काय? बऱ्‍याच मुलींना पाळीबद्दल आपल्या वडिलांशी बोलायला लाज वाटते. काही मुली वडिलांशी याविषयी बोलायला लाजतात पण त्यांनी आपल्याला समजून घ्यावे, आधार द्यावा अशी अपेक्षा मात्र करतात. तर काहीजणींना वडिलांजवळ याबाबतीत उल्लेखही करायला आवडत नाही.

ज्या कुटुंबांत आई नाही, फक्‍त वडील आहेत अशा कुटुंबांची संख्या मागच्या काही दशकांत बऱ्‍याच देशांत वाढली आहे. * साहजिकच, बऱ्‍याच वडिलांना आपल्या मुलींना पाळीविषयी माहिती देण्याच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. या वडिलांना मासिकस्त्रावाविषयी तसेच त्यांच्या मुलींना अनुभवाव्या लागणाऱ्‍या शारीरिक व भावनिक बदलांसबंधी काही मूलभूत माहिती असणे महत्त्वाचे आहे. या संदर्भात माहिती व सल्ला घेण्यासाठी ते स्वतःच्या आईची किंवा बहिणींची मदत घेऊ शकतात.

केव्हा सांगायला सुरुवात करावी?

औद्योगिकरित्या प्रगत देशांत, उदाहरणार्थ, अमेरिका, दक्षिण कोरिया आणि पश्‍चिम युरोपच्या काही भागांत मुलींना सर्वसामान्यपणे १२ व्या-१३व्या वर्षी पाळी सुरू होते. पण यापेक्षा लवकरच म्हणजे ८ व्या वर्षीही पाळी सुरू होऊ शकते तर कधीकधी १६ व्या-१७ व्या वर्षापर्यंतही पाळी सुरू झालेली नसते. आफ्रिका व आशियाच्या काही भागात पाळी सुरू होण्याचे सरासरी वय थोडे जास्त आहे. उदाहरणार्थ, नायजेरियात सरासरी वय १५ वर्षे आहे. यात अनुवांशिकता, आर्थिक स्थिती, आहार, शारीरीक श्रम, समुद्रसपाटीपासूनची उंची यांसारख्या निरनिराळ्या गोष्टींचा प्रभाव पडू शकतो.

तुमच्या मुलीला पहिल्यांदा पाळी येण्याच्या आधीच तिला याविषयी माहिती देण्यास सुरुवात करणे उत्तम ठरेल. तेव्हा, साधारणपणे मुलगी आठ वर्षांची झाल्यावर तुम्ही तिच्याशी वयात येताना शरीरात कोणकोणते बदल होतात याविषयी, तसेच पाळी सुरू होण्याविषयी बोलायला सुरुवात केली पाहिजे. इतक्या आधीपासून बोलायची काय गरज आहे, असे कदाचित तुम्हाला वाटू शकते, पण जर तुमची मुलगी ८-१० या वयोगटात असेल तर तिच्या शरीरात हार्मोन्सच्या वाढलेल्या कार्यामुळे, वयात येण्याची प्रक्रिया आधीच सुरू झालेली आहे. आणि यामुळे पौगंडावस्थेशी संबंधित उपलक्षणेही दिसू लागलेली असण्याची शक्यता आहे. उदाहरणार्थ, स्तनांची वृद्धी आणि शरीरावर केसांची वाढ. बऱ्‍याच मुलींमध्ये पाळी सुरू होण्याआधी उंची व वजनात झपाट्याने वाढ होते.

कशा पद्धतीने सांगावे?

वयात येऊ लागलेल्या मुलींना सहसा पाळीबद्दल कुतूहल असते. शाळेत इतर मुलींकडून या विषयावर त्यांनी थोडेफार ऐकलेले असते. मनात बऱ्‍याच शंका-कुशंका असतात. पण विचारायचे कसे? हा प्रश्‍न असतो. या विषयाचा उल्लेख करायला त्यांना लाज वाटते.

पालकांचीही तीच स्थिती असते. पाळीबद्दल माहिती देणारी मुख्य व्यक्‍ती सहसा आईच असते, पण बरेचदा तिलाही या विषयावर आपल्या मुलींशी नेमके काय बोलावे असा प्रश्‍न असतो. तिलाही संकोच वाटतो. कदाचित तुम्हीपण याच परिस्थितीत असाल. तर मग पाळी सुरू होण्याविषयी आणि पाळी का येते याविषयी आपल्या मुलीला माहिती देण्याकरता तुम्ही हा विषय कसा छेडू शकता?

पाळी सुरू होण्याच्या वयात असलेल्या मुली साध्या, स्पष्ट पद्धतीने सांगितलेली माहिती समजू शकतात. पाळी किती वेळा येते, किती दिवस राहते किंवा किती रक्‍त शरीरातून जाते ही माहिती त्यांना देता येईल. तेव्हा सुरुवातीला, पाळी येते तेव्हा काय करायचे याविषयीची माहिती देण्याचा प्रयत्न करावा. शिवाय, पाळी येते तेव्हा नेमकं कसं वाटतं? दुखतं का? यांसारख्या प्रश्‍नांचीही तुम्हाला उत्तरे द्यावी लागतील.

नंतर, हळूहळू तुम्ही पाळी येण्याच्या शास्त्रीय कारणांविषयी सविस्तर माहिती देऊ शकता. याबद्दल माहिती देणारी पुस्तके तुम्हाला आरोग्य कार्यकर्त्यांकडून किंवा एखाद्या लायब्ररीतून किंवा पुस्तकालयातून मिळवता येतील. काही गोष्टी स्पष्ट करून सांगण्यास ही पुस्तके अतिशय उपयोगी पडू शकतात. काही मुली स्वतःहूनच पुस्तक वाचायचे पसंत करतील. तर इतरांना तुमच्यासोबत बसून वाचायला हरकत नसेल.

एखादे शांत ठिकाण निवडून तुम्ही संभाषण सुरू करू शकता. प्रौढावस्थेत जाताना शरीराची कशी हळूहळू वाढ होत असते याबद्दल साध्या भाषेत तुम्ही वर्णन करू शकता. कदाचित तुम्ही असे म्हणू शकता: “लवकरच, तुझ्या वयातल्या सगळ्याच मुलींना होत असतं असं काहीतरी तुलाही होणार आहे. माहितेय का तुला त्याविषयी?” किंवा आई आपला स्वतःचा अनुभव सांगून सुरुवात करू शकते: “मी तुझ्याएवढी होते, तेव्हा पाळी येणं म्हणजे नेमकं काय असतं असं मला वाटायचं. आम्ही मैत्रिणीही शाळेत त्याविषयी बोलायचो. तुझ्या मैत्रिणींमध्ये कधी झालीय का चर्चा पाळी येण्याबद्दल?” तिला आधीपासूनच काय काय माहीत आहे हे जाणून घ्या आणि काही गैरसमज असल्यास ते दूर करा. सुरुवातीच्या चर्चांमध्ये तुम्हालाच जास्त बोलावे लागेल, कदाचित तुमची मुलगी फारसे काही बोलणार नाही हे आठवणीत असू द्या.

या विषयावर चर्चा करताना, एका स्त्रीच्या दृष्टिकोनातून तुम्ही स्वतःचा अनुभव आठवू शकता. तुम्हालाही पाळी सुरू होण्याआधी निश्‍चितच काही चिंता, शंका मनात आल्या असतील. कोणती माहिती तुम्हाला असायला हवी होती? तुम्हाला काय जाणून घ्यावेसे वाटत होते? कोणती माहिती तुम्हाला उपयोगी पडली? पाळी येण्यासंबंधीच्या सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही बाजू सांगण्याचा प्रयत्न करा. प्रश्‍न विचारण्याचे प्रोत्साहन द्या.

एकदाच सांगून गप्प राहू नका

मासिकस्रावासंबंधी माहिती देण्याची प्रक्रिया एकदाच चर्चा करून संपत नाही. ही एक दीर्घ, सतत सुरू राहणारी प्रक्रिया आहे या दृष्टिकोनातून याकडे पाहिले पाहिजे. एकदाच बसून सगळी माहिती देण्याची गरज नाही. कारण एकाच वेळी सर्व माहिती दिल्यास अद्याप वयाने लहान असलेल्या मुलीवर दडपण येऊ शकते. मुले सहसा टप्प्याटप्प्याने शिकतात. तसेच काही गोष्टींची पुन्हा पुन्हा आठवण करून द्यावी लागेल. काही गोष्टी, मुली आणखी थोड्या मोठ्या झाल्यानंतर त्यांना अधिक चांगल्याप्रकारे समजू शकतील.

आणखी एक गोष्ट म्हणजे, पौगंडावस्थेच्या निरनिराळ्या टप्प्यांवर पाळी येण्याबद्दल मुलींचा दृष्टिकोन बदलत राहतो. सुरुवातीची भीती जाऊन, पाळीची सवय झाल्यावर कदाचित तुमच्या मुलीच्या मनात काही नवे प्रश्‍न व शंकाकुशंका येतील. तेव्हा तुम्ही आवश्‍यकतेनुसार तिला हवी असलेली माहिती व तिच्या प्रश्‍नांचे उत्तर दिले पाहिजे. तिच्या वयानुसार व समजशक्‍तीनुसार कोणती माहिती अर्थपूर्ण व योग्य ठरेल ते ठरवा व त्यावर भर द्या.

पुढाकार घ्या

तुमच्या मुलीला या विषयाबद्दल जाणून घेण्याची उत्सुकताच नाही असे दिसल्यास काय करावे? कदाचित वैयक्‍तिक बाबींवर चर्चा करायला तिला आवडत नसेल. किंवा, कदाचित तिला याविषयी काय विचारावे, कसे विचारावे हे कळत नसेल. मला आधीच सगळं माहीत आहे असेही कदाचित ती म्हणू शकते.

अमेरिकेत सहावीतल्या मुलींवर केलेल्या एका संशोधनात असे आढळले की पाळी येण्याआधी मुलींना जे काही माहीत असले पाहिजे, ते सगळे आपल्याला माहीत आहे असे बहुतेक मुलींना वाटत होते. पण आणखी काही प्रश्‍न विचारल्यावर अगदी स्पष्ट झाले की त्यांना पूर्ण माहिती नव्हती. शिवाय, ज्या गोष्टी त्या मुली खऱ्‍या मानून चालत होत्या, ते खरे तर रूढ कल्पनांवर व खोट्या धारणांवर आधारित गैरसमज होते. तेव्हा, मला सगळं माहीत आहे असे तुमच्या मुलीने म्हटले तरी, तुम्ही याविषयी तिच्यासोबत बोलणे महत्त्वाचे आहे.

पाळीचा विषय छेडून त्यावर थोडी थोडी माहिती देण्याकरता, सहसा तुम्हालाच पुढाकार घ्यावा लागेल. पण पालक या नात्याने ही तुमची जबाबदारी आहे. तुमच्या मुलीला तुमच्या मदतीची गरज आहे. हे ती सध्या मान्य करत नसली तरीसुद्धा. कधीकधी थोडी निराशा वाटणे स्वाभाविक आहे, पण महत्त्वाचे म्हणजे प्रयत्न करण्याचे सोडू नका. तुमच्या मुलीला थोडा वेळ द्या. कालांतराने, तिला मदत केल्याबद्दल ती जरूर तुमचे आभार मानेल. (५/०६)

[तळटीप]

^ परि. 12 जपानमध्ये फक्‍त वडील असलेल्या कुटुंबांच्या संख्येने २००३ साली उच्चांक गाठला. अमेरिकेत दर सहा एक-पालक कुटुंबांपैकी एक कुटुंब असे आहे की ज्यात आई नाही फक्‍त वडील आहेत.

[११ पानांवरील संक्षिप्त आशय]

पहिल्यांदा पाळी येण्याआधीच आपल्या मुलीला याविषयीची माहिती देणे सर्वात चांगले

[१३ पानांवरील चौकट]

तुमच्या मुलीशी मासिकस्त्रावाविषयी कशा पद्धतीने बोलाल

तिला आधीपासूनच काय माहीत आहे हे जाणून घ्या. गैरसमज दूर करा. तुमच्याजवळ व तिच्याजवळ असलेली माहिती अचूक आहे की नाही याची खात्री करा.

आपला अनुभव सांगा. पाळी सुरु होण्याआधीच्या स्वतःच्या अनुभवाचा विचार करून ती माहिती तुम्ही आपल्या मुलीला सांगता तेव्हा तुम्ही तिला फार आवश्‍यक असलेला भावनिक आधार पुरवत असता.

काय करायचे याविषयी माहिती द्या. लहान मुली सहसा विचारतात त्या प्रश्‍नांपैकी काही प्रश्‍न म्हणजे, “शाळेत पाळी सुरू झाली तर काय करू?” “कोणत्या प्रकारचे पॅड चांगले?” “ते कसे वापरायचे?”

वास्तविक माहिती साध्या भाषेत समजावून सांगा. तुमच्या मुलीच्या वयानुसार व समजशक्‍तीनुसार कोणती माहिती द्यायची ते ठरवा.

पाळी सुरू झाल्यावरही माहिती देण्याचे थांबवू नका. पाळी सुरू होण्याआधीच तुम्ही आपल्या मुलीशी याबद्दल बोलायला सुरुवात केली पाहिजे आणि पाळी सुरू झाल्यानंतरही आवश्‍यकतेनुसार माहिती देत राहिले पाहिजे.

[१२, १३ पानांवरील चित्र]

तिला समजून घ्या. कदाचित इतक्या वैयक्‍तिक बाबींबद्दल चर्चा करायला तिला संकोच वाटत असेल