व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

इलेक्ट्रॉनिक साधनांमुळे होणारा परिणाम—तुमच्या वैवाहिक जीवनावर

इलेक्ट्रॉनिक साधनांमुळे होणारा परिणाम—तुमच्या वैवाहिक जीवनावर

इलेक्ट्रॉनिक साधनांचा योग्य प्रकारे वापर केला, तर यामुळे पती-पत्नीचं नातं मजबूत होऊ शकतं. जसं की, या साधनांच्या मदतीने ते दिवसभर एकमेकांच्या संपर्कात राहू शकतात आणि यामुळे त्यांच्यातली जवळीक आणखी वाढते.

पण काही जोडपी इलेक्ट्रॉनिक साधनांचा चुकीचा वापर करतात. यामुळे ते . . .

  • एकमेकांना पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत.

  • गरज नसताना ऑफिसचं काम घरी करतात.

  • एकमेकांवर संशय घेतात आणि कधीकधी तर धोकाही देतात.

लक्षात ठेवण्यासारखं काही . . .

एकमेकांसाठी वेळ

मायकल म्हणतो, “कधीकधी आम्ही नवरा-बायको एकाच खोलीत असतो, पण माझ्या बायकोचं माझ्याकडे लक्षच नसतं. तिचं सगळं लक्ष तिच्या फोनकडेच असतं. आणि विचारलं तर म्हणते, ‘मला आत्ताच वेळ मिळाला चेक करायला.’” जॉनथन म्हणतो, की “असे पती-पत्नी सोबत असले तरी ते मनाने एकमेकांपासून खूप दूर असतात.”

जरा विचार करा: जोडीदारासोबत असताना तुम्ही कॉल, मेसेज किंवा नोटिफिकेशन पाहण्यासाठी सारखा सारखा फोन चेक करता का?—इफिसकर ५:३३.

काम

काही लोकांचं कामच असं असतं की त्यांना चोवीस तास फोन किंवा ई-मेलद्वारे दुसऱ्‍यांच्या संपर्कात राहावं लागतं. तर असेही काही जण असतात ज्यांची कामाची वेळ संपल्यानंतरही काम काही त्यांच्या हातून सुटत नाही. ली असं म्हणतो, “कधीकधी मी माझ्या बायकोसोबत वेळ घालवायचं ठरवतो खरा, पण कामासंबंधी एखादा फोन किंवा मेसेज आला तर तो पाहिल्याशिवाय मला राहवत नाही.” जॉय नावाची एक स्त्री म्हणते, “मी घरूनच काम करते. त्यामुळे कामापासून तशी सुटका नसतेच. घर आणि काम यामध्ये कशाला किती महत्त्व द्यायचं, हे ठरवणं म्हणजे तारेवरची कसरतच असते.”

जरा विचार करा: जोडीदार तुमच्याशी बोलतो तेव्हा तुम्ही त्याचं लक्ष देऊन ऐकता का?—लूक ८:१८.

विश्‍वासूपणा

एका सर्वेमधून असं दिसून आलं, की सोशल मिडियामध्ये केलेल्या पोस्टवरून एकमेकांवर संशय घेतल्यामुळेच नवरा-बायकोमध्ये सगळ्यात जास्त भांडणं होतात. यांतल्या दहा टक्के लोकांनी सांगितलं, की ते जे काही पोस्ट करतात ते आपल्या जोडीदारापासून लपवून ठेवतात.

बरेच जण मान्य करतात की सोशल मिडिया हा एक असा रस्ता आहे ज्यावर विवाहित जोडप्यांसाठी पावलोपावली धोके असतात. इतकंच काय, तर सोशल मिडिया हे विवाहबाह्‍य संबंधांत अडकवणारं एक जाळंय असंसुद्धा म्हटलं जातं. बरेच वकील म्हणतात की आज बहुतेक घटस्फोटांमागे सोशल मिडिया हेच मुख्य कारण असतं.

जरा विचार करा: तुम्ही एखाद्या व्यक्‍तीशी केलेले चॅट जोडीदारापासून लपवून ठेवता का?—नीतिवचनं ४:२३.

हे करा

महत्त्वाचं काय ते ठरवा

चांगल्या आरोग्यासाठी खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्याच प्रकारे विवाहाचं नातं मजबूत करण्यासाठी पती-पत्नींनी एकमेकांसोबत वेळ घालवणं गरजेचं आहे.—इफिसकर ५:२८, २९.

बायबलचं तत्त्व: “कोणत्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत याची तुम्ही नेहमी खातरी करून घ्यावी.”—फिलिप्पैकर १:१०.

इलेक्ट्रॉनिक साधनांमुळे तुमच्या वैवाहिक जीवनात समस्या निर्माण होऊ नयेत म्हणून खालीलपैकी तुम्हाला आवडलेल्या सल्ल्यांवर चर्चा करा किंवा तुम्हाला सुचलेले पर्याय लिहा.

  • दररोज एकदा तरी सोबत बसून जेवा

  • सोबत वेळ घालवता यावा म्हणून कधीकधी फोन बंद करून ठेवा

  • एखाद्या संध्याकाळी किंवा इतर वेळी फक्‍त तुमच्या दोघांसाठी एखादा खास बेत ठरवा

  • रात्री इलेक्ट्रॉनिक साधनं बंद करून ठेवा आणि शक्यतो झोपायच्या खोलीत ठेवू नका

  • दररोज फोन वगैरे बाजूला ठेवून कमीतकमी १५ मिनिटं एकमेकांशी बोलण्यासाठी वेळ काढा

  • दररोज ठरावीक वेळेला इंटरनेट बंद करा