व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कुटुंबासाठी मोलाचा सल्ला | विवाह

एकमेकांशी जुळवून घेणं

एकमेकांशी जुळवून घेणं

एक समस्या

तुम्हाला खेळ फार आवडतात पण तुमच्या जोडीदाराला वाचनात रस आहे. तुम्हाला सर्व गोष्टी अगदी व्यवस्थितपणे, काळजीपूर्वक रीत्या आणि वेळ वाया न घालवता करायला आवडतात पण तुमचा जोडीदार तसा बिलकुल नाही. तुम्हाला मित्रांसोबत वेळ घालवायला आवडतो पण तुमच्या जोडीदाराला एकांत पसंत आहे.

तुम्हाला प्रश्न पडतो, ‘आमचं कशातच जुळत नाही! हे आम्हाला लग्नाआधी का नाही कळलं?’

लग्नाआधी कदाचित या गोष्टी तुम्हाला कळाल्याही असतील, निदान काही प्रमाणात तरी कळाल्या असतील. पण तेव्हा तुम्ही त्या लगेच जुळवून घेतल्या. खरंतर तुम्ही आत्ताही जुळवून घेऊ शकता, नव्हे असं करण्याचा तुम्ही पूर्ण प्रयत्न केला पाहिजे, कारण आता तुमचं लग्न झालं आहे. हा लेख तुम्हाला याबाबतीत मदत करेल. सर्वात आधी आपण पाहू या, की एकमेकांच्या स्वभावामध्ये किंवा आवडीनिवडींमध्ये फरक असल्यामुळं काय होऊ शकतं.

तुम्हाला माहीत आहे का?

काही गोष्टी जुळवून घेता येत नाहीत. लग्नाआधी मुलगा-मुलगी एकमेकांना भेटत असतात तेव्हा ते खरंतर हे पाहतात, की त्यांचं एकमेकांशी जुळतं की नाही. त्यांचं जुळत नसेल तर लग्न करून एकाच घरात वेगवेगळ्या दुनियेत वावरण्यापेक्षा ते लग्न न करण्याचं ठरवतात. पण सहसा प्रत्येक जोडप्यात होतं तसं त्यांच्यातही फक्त थोड्याफार गोष्टीच जुळत नसतील, तेव्हा काय?

व्यक्ती तितक्या प्रवृत्ती अशी म्हणच आहे. म्हणून पतीपत्नीमध्ये पुढील गोष्टींत फरक असणं साहजिक आहे:

आवडीनिवडी. “मला बाहेर फिरायला जाणं वगैरे मुळीच आवडत नाही. पण माझ्या नवऱ्याला लहानपणापासून बर्फाळ डोंगरांवर चढणं, झाडीझुडीतून अनेक दिवस भटकंती करणं आवडतं,” असं अॅना * नावाची पत्नी म्हणते.

सवयी. “माझी बायको रात्री उशीरापर्यंत जागूनसुद्धा पहाटे ५ वाजता उठू शकते. पण मला मात्र सात ते आठ तास झोप मिळाली नाही तर माझी चिडचिड होते,” असं ब्रायन नावाचा पती म्हणतो.

स्वभाव. तुमचा स्वभाव शांत असेल पण तुमचा जोडीदार फार बोलका असेल. “लहान असतानासुद्धा मी माझ्या समस्यांबद्दल जास्त बोलत नव्हतो. पण माझ्या बायकोच्या माहेरी सगळ्यांना मनमोकळं बोलण्याची सवय आहे,” असं डेव्हिड नावाचा पती म्हणतो.

वेगळेपणा असल्यामुळं फायदा होऊ शकतो. “एखादी गोष्ट करण्याची माझी पद्धत चांगली असली तरी तीच पद्धत बरोबर आहे असं नाही,” असं हेलेना नावाची पत्नी म्हणते.

तुम्ही काय करू शकता

एकमेकांच्या आवडींमध्ये रस घ्या. अॅडम नावाचा पती म्हणतो: “माझी बायको कॅरेन हिला खेळ मुळीच आवडत नाहीत. तरी ती माझ्यासोबत बरेच खेळ पाहायला आली आणि तिनंदेखील त्या खेळांचा आनंद घेतला. दुसरीकडं पाहता, कॅरेनला कलेची आवड असल्यामुळं मी तिच्यासोबत कला दालनात जातो आणि तिचं मन भरेपर्यंत आम्ही तिथं वेळ घालवतो. तिला कलेत आवड आहे म्हणून मीसुद्धा त्यात आवड घेण्याचा पूर्ण प्रयत्न करतो.” —बायबलचं तत्त्व: १ करिंथकर १०:२४.

तुमचा दृष्टिकोन बदला. तुमच्या जोडीदाराचा दृष्टिकोन वेगळा आहे म्हणून तो चुकीचा असेलच असं नाही. अॅलेक्स नावाच्या पतीला आधी वाटायचं, की एखादी गोष्ट करण्याची फक्त एकच योग्य पद्धत असते. पण तीच गोष्ट वेगवेगळ्या पद्धतीनं केली जाऊ शकते आणि त्या सर्वच आपआपल्या परीनं फायदेशीरही असतात हे त्याला लग्नानंतर कळलं.—बायबलचं तत्त्व: १ पेत्र ५:५.

एकमेकांचा वेगळेपणा स्वीकारा. पती-पत्नींचं एकमेकांशी जुळणं म्हणजे त्यांनी एकमेकांच्या अगदी हुबेहूब असणं असं नाही. म्हणून तुमच्यात थोड्याफार गोष्टी जुळत नसल्या तरी तुम्ही लग्न करून मोठी चूक केली आहे असं समजू नका. द केस अगेंस्ट डिवोर्स या पुस्तकात सांगितलं आहे, “बरेच लोक असं कारण देतात, ‘मी प्रेमात अंधळा झालो होतो म्हणून तेव्हा मला आमच्या दोघातला फरक दिसलाच नव्हता.’ पण तुम्ही दोघांनी आनंदात घालवलेला प्रत्येक दिवस हेच दाखवतं की तुमच्यात कितीही फरक असला, तुमचं एकमेकांशी जुळत नसलं तरीही तुम्ही एकमेकांवर प्रेम करू शकता.” पवित्र शास्त्रात अतिशय सुरेख सल्ला देण्यात आला आहे. तिथं म्हटलं आहे, “एकमेकांचे सहन करा, आणि कोणाविरुद्ध कोणाचे गाऱ्हाणे असल्यास आपसात क्षमा करा.”—कलस्सैकर ३:१३.

हे करून पाहा: तुमच्या जोडीदाराबद्दल तुम्हाला कोणत्या गोष्टी आवडतात, तुमच्या कोणत्या गोष्टी जुळतात ते लिहून काढा. मग ज्या जुळत नाहीत त्या लिहा. तुमच्या दोघातला फरक तुम्हाला आधी वाटला होता तितका गंभीर नाही हे तुम्हाला कळून येईल. तुम्ही लिहिलेल्या गोष्टींवरून तुम्हालाही समजेल, की कोणत्या बाबतीत तुम्ही तुमच्या जोडीदाराशी जुळवून घेऊ शकता. केनथ नावाचा एक पती म्हणतो: “माझी बायको माझ्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करते तेव्हा मला चांगलं वाटतं आणि मी तिच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तिलाही चांगलं वाटतं हे मला माहीत आहे. यासाठी मला थोडा त्याग करावा लागला तर काय झालं? तिचा आनंद पाहून मलाही आनंद होतो.”—बायबलचं तत्त्व: फिलिप्पैकर ४:५. (g15-E 12)

^ परि. 10 या लेखातील काही नावं बदलण्यात आली आहेत.