व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“त्या वेळी देव कुठे होता?”

“त्या वेळी देव कुठे होता?”

“माझ्या मनात सतत प्रश्‍न येतो, त्या वेळी देव कुठे होता?”— पोलंडमधल्या ऑश्‍वीट्‌झ छळछावणीला भेट देताना पोप बेनेडिक्ट सोळावे यांचे शब्द.

एखादी दुर्घटना घडते तेव्हा तुम्ही कधी असा विचार केला का, की ‘देव कुठे आहे?’ किंवा तुमच्या आयुष्यात एखादी भयानक घटना घडते तेव्हा तुम्ही असा विचार केला का, की ‘देवाला माझी काळजी आहे की नाही?’

कदाचित तुम्हालाही अमेरिकेत राहणाऱ्‍या शिलासारखं वाटत असेल. ती एका धार्मिक कुटुंबात वाढली होती. ती म्हणते: “देव आपला निर्माणकर्ता आहे हे मला लहानपणापासूनच माहीत असल्यामुळे मी देवाला मानायचे. पण मला कधीच त्याच्या जवळ असल्यासारखं वाटलं नाही. मी विचार करायचे की तो मला पाहत आहे, पण दुरुनच. मला कधीच असं वाटलं नाही की तो माझा द्वेष करतो. पण त्याला माझी काळजी आहे असंही कधी वाटलं नाही.” शिलाच्या मनात एवढ्या शंका का होत्या? त्याबद्दल ती सांगते: “माझ्या कुटुंबाला एकापाठोपाठ एक अशा अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं आणि असं वाटत होतं की त्यातून निभावण्यासाठी देव आम्हाला मुळीच मदत करत नाहीये.”

शिलासारखीच तुम्हालासुद्धा ही खातरी असेल की सर्वसमर्थ देव अस्तित्वात आहे. तरीही तुम्ही कदाचित विचार कराल, की त्याला खरंच माझी काळजी आहे का. देवाचा प्रामाणिक सेवक ईयोब याला सृष्टिकर्त्याच्या शक्‍तीवर आणि बुद्धीवर विश्‍वास होता. तरीही त्याला असेच प्रश्‍न पडले. (ईयोब २:३; ९:४) त्याला एका नंतर एक अशा समस्यांनी घेरलं, ज्यातून त्याला सुटकेचा कोणताही मार्ग दिसत नव्हता. अशा वेळी त्याने देवाला विचारलं: “तू आपले तोंड का लपवतोस? मला आपला वैरी का लेखतोस?”—ईयोब १३:२४.

बायबल याचं काय उत्तर देतं? एखादी दुर्घटना घडते तेव्हा देव त्यासाठी जबाबदार असतो का? देव संपूर्ण मानवजातीची आणि वैयक्‍तिक रीत्या प्रत्येकाची काळजी करतो याचा काही पुरावा आहे का? तो आपल्याकडे लक्ष देतो, आपल्या भावना समजून घेतो किंवा समस्येत असताना आपल्याला मदत करतो हे कोणी वैयक्‍तिक रीत्या अनुभवलं आहे का?

आपण पुढील लेखांत पाहू की आपल्या रचनेवरून कसं कळतं की देवाला आपली काळजी आहे. (रोमकर १:२०) त्यानंतर, देवाला आपली काळजी आहे याबद्दल बायबल काय सांगतं हेही आपण पाहू. त्याच्या सृष्टीतून आणि बायबलमधून जितकी जास्त तुम्हाला “त्याची ओळख” होईल, तितकी जास्त तुम्हाला ही खातरी पटेल की “त्याला तुमची काळजी आहे.”—१ योहान २:३; १ पेत्र ५:७.