व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आत्ताच देवाच्या राज्याची बाजू घ्या!

आत्ताच देवाच्या राज्याची बाजू घ्या!

कल्पना करा की तुम्ही जिथे राहत आहात तिथे एक भयानक वादळ येत आहे. त्यामुळे सरकार सगळ्यांना असा इशारा देत आहे, की “पळा आणि सुरक्षित ठिकाणी जा!” अशा वेळी तुम्ही काय कराल? तुम्ही नक्कीच एक सुरक्षित ठिकाण शोधाल.

एका अर्थाने आपल्या सगळ्यांनाच एका भयानक वादळाचा सामना करावा लागणार आहे. येशूने त्याला “मोठं संकट” असं म्हटलं. (मत्तय २४:२१) आपण पृथ्वीच्या कोणत्याही कानाकोपऱ्‍यात गेलो तरी या संकटाचा सामना आपल्याला करावा लागेल. पण यातून स्वतःचा बचाव करण्यासाठी आपण काहीतरी करू शकतो. आपल्याला नक्की काय करावं लागेल?

डोंगरावरचा उपदेश देताना येशू ख्रिस्ताने असं म्हटलं: “आधी देवाचं राज्य आणि त्याचं नीतिमत्त्व मिळवण्याचा प्रयत्न करत राहा.” (मत्तय ६:३३) आपण हे कसं करू शकतो?

आधी देवाचं राज्य मिळवण्याचा प्रयत्न करा. याचा अर्थ आपण देवाच्या राज्याला इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त महत्त्व दिलं पाहिजे. (मत्तय ६:२५, ३२, ३३) पण आपण त्याला इतकं महत्त्व का दिलं पाहिजे? कारण मानवी शासक माणसांच्या समस्या सोडवण्यात अपयशी ठरले आहेत. आणि फक्‍त देवाचं राज्यच या सगळ्या समस्या सोडवू शकतं.

देवाचं नीतिमत्त्व मिळवण्याचा प्रयत्न करा. याचा अर्थ आपण देवाने दिलेल्या नियमांप्रमाणे आणि तत्त्वांप्रमाणे जगण्याचा पुरेपूर प्रयत्न केला पाहिजे. असं का? कारण चांगलं काय आणि वाईट काय, हे आपलं आपणच ठरवलं तर त्याचे परिणाम वाईट होतील. (नीतिसूत्रे १६:२५) पण तेच जर आपण देवाच्या स्तरांनुसार जगलो, तर तो खूश होईल. शिवाय, आपल्यालाही त्याचा फायदा होईल.—यशया ४८:१७, १८.

आधी देवाचं राज्य आणि त्याचं नीतिमत्त्व मिळवण्याचा प्रयत्न करत राहा. का बरं? कारण येशूने असा इशारा दिला होता की काही जण भरकटतील. ते असा विचार करतील की जास्तीत जास्त पैसा कमवल्यामुळे ते सुरक्षित राहू शकतात. तर इतर काही जण रोजच्या चिंतांमुळे इतके दबून जातील की देवाचं राज्य मिळवण्यासाठी त्यांच्याकडे वेळच उरणार नाही.—मत्तय ६:१९-२१, २५-३२.

पण येशूने असं वचन दिलं होतं की जे देवाच्या राज्याच्या बाजूने उभे राहतील, त्यांच्या आजच्या गरजा तर पूर्ण होतीलच, शिवाय भविष्यातही त्यांना भरपूर आशीर्वाद मिळतील.—मत्तय ६:३३.

पहिल्या शतकातल्या येशूच्या शिष्यांनी सतत देवाचं राज्य आणि त्याचं नीतिमत्त्व मिळवण्याचा प्रयत्न केला. पण म्हणून त्यांच्या काळात सगळं दुःख आणि सगळ्या समस्या संपल्या असं म्हणता येणार नाही. मग ते कोणत्या अर्थाने सुरक्षित होते?

ज्या लोकांनी देवाच्या स्तरांकडे दुर्लक्ष केलं त्यांना समस्यांचा सामना करावा लागला. पण येशूचे शिष्य मात्र देवाच्या स्तरांनुसार जगले. आणि त्यामुळे त्यांचं बऱ्‍याच समस्यांपासून संरक्षण झालं. देवाचं राज्य येईल असा भक्कम विश्‍वास असल्यामुळे ते अतिशय कठीण समस्यांचा सामना करू शकले. आणि हे सगळं सहन करण्यासाठी देवाने त्यांना “असाधारण सामर्थ्य” दिलं.—२ करिंथकर ४:७-९.

तुम्ही आधी देवाचं राज्य मिळवण्याचा प्रयत्न कराल का?

आधी देवाचं राज्य मिळवण्याचा प्रयत्न करत राहा, ही येशूने दिलेली आज्ञा पहिल्या शतकातल्या त्याच्या शिष्यांनी पाळली. त्यांनी देवाच्या राज्याचा आनंदाचा संदेश जगात दूरदूरपर्यंत पोचवला. (कलस्सैकर १:२३) आज असं कोणी करत आहे का?

हो! यहोवाच्या साक्षीदारांनी हे ओळखलं आहे, की देवाचं राज्य लवकरच येईल आणि आजच्या या व्यवस्थेचा अंत करेल. म्हणून ते येशूने जे म्हटलं ते करण्यासाठी भरपूर मेहनत घेत आहेत. त्याने म्हटलं: “सर्व राष्ट्रांना साक्ष मिळावी म्हणून राज्याचा हा आनंदाचा संदेश सर्व जगात घोषित केला जाईल, आणि त्यानंतर अंत येईल.”—मत्तय २४:१४.

हा आनंदाचा संदेश ऐकल्यावर तुम्ही काय कराल? पहिल्या शतकात मासेदोनियाच्या बिरुया शहरातल्या लोकांनी जे केलं तेच करण्याची आम्ही तुम्हाला विनंती करतो. त्यांनी प्रेषित पौलकडून राज्याचा आनंदाचा संदेश ऐकला, तेव्हा त्यांनी तो “अतिशय उत्सुकतेने” स्वीकारला. ऐकलेल्या गोष्टी खऱ्‍या आहेत की नाही हे पाहण्यासाठी त्यांनी ‘शास्त्रवचनांचं काळजीपूर्वक परीक्षण केलं’ आणि शिकलेल्या गोष्टी जीवनात लागू केल्या.—प्रेषितांची कार्ये १७:११, १२.

तुम्हीही तसंच करू शकता. आधी देवाचं राज्य आणि त्याचं नीतिमत्त्व मिळवण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे आज तुमचं समस्यांपासून संरक्षण तर होईलच, शिवाय भविष्यात तुम्हाला कायम टिकणारी शांती आणि सुरक्षा मिळेल.