व्हिडिओ पाहण्यासाठी

प्रमुख स्वर्गदूत मीखाएल कोण आहे?

प्रमुख स्वर्गदूत मीखाएल कोण आहे?

बायबलचं उत्तर

 मीखाएल, ज्याला काही पंथांमध्ये “संत मीखाएल” असं म्हटलंय हे खरंतर येशूचं नाव आहे. हे नाव येशू पृथ्वीवर येण्याआधी आणि तो स्वर्गात परत गेल्यावर त्याच्यासाठी वापरण्यात आलंय. a बायबलमध्ये सांगितलंय की मोशेच्या मृत्यूनंतर मीखाएलचा सैतानासोबत वाद झाला. तसंच त्याने दानीएल संदेष्ट्यापर्यंत देवाचा संदेश पोहोचवण्यासाठी एका स्वर्गदूताला मदत केली असंही सांगितलंय. (दानीएल १०:१३, २१; यहूदा ९) मीखाएलच्या नावाचा अर्थ “देवासारखं कोण आहे?” असा होतो. मीखाएल आपल्या या नावाच्या अर्थाप्रमाणे नेहमी देवाच्या राज्याचं समर्थन करतो आणि देवाच्या शत्रूंशी लढतो.​—दानीएल १२:१; प्रकटीकरण १२:७.

 येशूच प्रमुख स्वर्गदूत मीखाएल आहे असा निष्कर्ष आपण का काढू शकतो हे आता आपण पाहू या.

  •   मीखाएलप्रमुख स्वर्गदूत” आहे. (यहूदा ९) “प्रमुख स्वर्गदूत” हे पद बायबलमध्ये फक्‍त दोन वचनांमध्ये वाचायला मिळतं. दोन्ही वचनांमध्ये हे पद एकवचनी वापरण्यात आलंय. त्यावरून समजतं की हे पद फक्‍त एकाच स्वर्गदूताला दिलंय. त्यांपैकी एका वचनात असं म्हटलंय, की पुनरुत्थान झालेला प्रभू येशू “प्रमुख स्वर्गदूताच्या वाणीने आज्ञा देत स्वर्गातून उतरेल.” (१ थेस्सलनीकाकर ४:१६) येशू “प्रमुख स्वर्गदूताच्या वाणीने” आज्ञा देतो, कारण तो स्वतःच प्रमुख स्वर्गदूत मीखाएल आहे.

  •   मीखाएल स्वर्गदूतांच्या सैन्याचं नेतृत्व करतो. बायबल म्हणतं की “मीखाएल आणि त्याचे दूत अजगराविरुद्ध (सैतानाविरुद्ध) लढले.” (प्रकटीकरण १२:७) मीखाएलला “प्रमुख अधिकाऱ्‍यांपैकी एक” आणि “महान अधिकारी” असं म्हटलंय. यावरून दिसतं की स्वर्गात मीखाएलकडे मोठा अधिकार आहे. (दानीएल १०:१३, २१; १२:१) नव्या कराराचे एक विद्वान, डेविड ओन यांच्या शब्दांत सांगायचं तर मीखाएल “स्वर्गदूतांच्या सैन्याचा सेनापती” आहे.

     बायबलमध्ये स्वर्गदूतांच्या सैन्यावर अधिकार असलेल्या फक्‍त आणखी एकाच व्यक्‍तीबद्दल सांगितलंय. त्यात म्हटलंय, की “प्रभू येशू स्वर्गातून आपल्या शक्‍तिशाली स्वर्गदूतांसोबत अग्नीच्या ज्वालेत प्रकट होईल.” (२ थेस्सलनीकाकर १:७, ८; मत्तय १६:२७) आपल्याला माहीत आहे की येशू “स्वर्गात गेला आणि स्वर्गदूत, अधिकार आणि सत्ता यांना त्याच्या अधीन करण्यात आलं.” (१ पेत्र ३:२१, २२) साहजिकच, देव एकाच वेळी स्वर्गदूतांच्या सैन्यावर येशू आणि मीखाएल असे दोन वेगवेगळे सेनापती नियुक्‍त करणार नाही. त्यामुळे येशू आणि मीखाएल ही दोन्ही एकाच व्यक्‍तीची नावं आहेत असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही.

  •   पूर्वी कधीही न आलेल्या अशा ‘संकटाच्या काळात’ मीखाएल “उभा राहील.” (दानीएल १२:१) दानीएलच्या पुस्तकात ‘उभं राहणं’ हे शब्द सहसा अशा राजाच्या संदर्भात वापरण्यात आले आहेत जो काही खास कारवाई करण्यासाठी पुढे येतो. (दानीएल ११:२-४, २१) येशू ख्रिस्ताला “देवाचा शब्द” असं म्हटलंय. भविष्यात तो “राजांचा राजा” म्हणून देवाच्या शत्रूंचा नाश करण्यासाठी आणि देवाच्या लोकांचं संरक्षण करण्यासाठी खास कारवाई करेल. (प्रकटीकरण १९:११-१६) ‘जगाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत आलं नाही अशा मोठ्या संकटाच्या’ वेळी तो ही कारवाई करेल.​—मत्तय २४:२१, ४२.

a बायबलमध्ये इतर व्यक्‍तींचाही एकापेक्षा जास्त नावांनी उल्लेख करण्यात आला आहे. जसं की, याकोब (याला इस्राएल असंही म्हटलंय), पेत्र (याला शिमोन असंही म्हटलंय) आणि तद्दय (याला यहूदा असंही म्हटलंय).​—उत्पत्ती ४९:१, २; मत्तय १०:२, ३; मार्क ३:१८; प्रेषितांची कार्यं १:१३.